युगनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |
 
 

 
 

शाश्‍वत विकासासाठी केले प्रयत्न

महिलांमध्ये सामाजिक न्यायाचे पर्व

बाबासाहेब होते उत्कृष्ट संसदपटू

जलनितीचे जनक

‘मन की बात’मध्ये योगदानाचा उल्लेख
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमात महान युगनिर्माते, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकांच्या अव्दितीय योगदानाचा उल्लेख केला. त्यांचे सामाजिक परिवर्तन व योगदानाची दखल घेतली. राजकीय सत्तेच्या माध्यमातून समाजातील वंचित व उपेक्षित वर्गाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि पर्यायाने शाश्‍वत विकासासाठी सरकार कटिबध्द राहील, असे सांगितले. महिला सक्षमीकरणाचे धोरण, महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता अत्यंत महत्वपूर्ण ठरले आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्त्रीमुक्तीचा संदेश रुजविला.
 
युगनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व हे तळपत्या सूर्याप्रमाणे होते. अंधार दूर करणारे जगातील ‘तेजस्वी’ व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. भारतातील वंचित समाजाला न्याय, हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी महान कार्य केले. महिलांना सामाजिक न्याय, जलनिती, विकासाचा आराखडा अशा विविध शाश्‍वत विकासाचे धोरण त्यांनी मांडले. त्यावर या लेखात विविध पैलूंनी प्रकाश टाकला आहे.
 
 
 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील गरीब, दलित, पीडित, कामगार, महिला आणि सर्व वंचितांना घटनात्मक सामाजिक न्याय देण्याचे महान कार्य केले आहे. संविधान निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. जगातील अव्दितीय व सामर्थ्यवान राज्यघटना त्यांनी निर्माण केली. देश उभारणी व राष्ट्रीय विकासात त्यांचा लक्षणीय वाटा आहे. मुला-मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अव्दितीय कार्य केले. 
 
 

महिलांमध्ये सामाजिक न्यायाचे पर्व
 
 
प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते. एप्रिल १९४८ ला हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार केला. हिंदू कोड बिलामुळे हिंदू महिलांना हक्क आणि अधिकार मिळाले. भारतीय राज्यघटनेमध्ये स्त्रियांकरिता संरक्षणात्मक तरतुदी करण्यात आल्या. त्यामुळे महिलांमध्ये सामाजिक न्याय व सक्षमीकरणाचे पर्व सुरू झाले. स्त्री मुक्ती संदर्भात डॉ.आंबेडकरांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली. त्यामुळेच भारतीय स्त्रियांमध्ये जागृती निर्माण झाली. स्त्री व पुरुष यांना समान हक्क मिळाला. महाराजा सयाजीराव गायकवाड व शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळ व सामाजिक न्यायाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. याबाबत इतिहास साक्षीदार आहे. त्यांनी भावी इतिहासाचा अचूक वेध घेतला आणि सामाजिक आंदोलनाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यामुळे महिला नेतृत्व उदयास आल्या.

 
 
नवी उर्जा 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून साहित्याची नवी ऊर्जा नव्या पिढीला मिळाली. त्यांचे विचार हे नव्या पिढीला प्रेरणादायी आहेत. त्यांनी वृत्तपत्र लेखनातून सामाजिक समस्यांचा आढावा घेतला. दलित, वंचित समाजासमोरील आव्हाने व त्यावरील चिंतन त्यांनी ग्रंथ लेखनातून केले. लोकशाहीची मूल्ये रुजविण्यासाठी प्रयत्न केले. गौतम बुध्दांच्या स्वप्नातील भारताची निर्मिती व जडणघडणीचे यथार्थपणे आकलन त्यांनी केले आहे. आधुनिक प्रगत राष्ट्राचे स्वप्न त्यांनी पाहिले. पाणलोट क्षेत्र विकसित करावे हे व्यावहारिक शहाणपण त्यांनी मांडले. हिराकुड धरण हे देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून साकारले गेले. सर्वांगीण विकासात पायाभूत सुविधांवर त्यांनी भर दिला. त्यामुळे ऊर्जा शक्तीला चालना मिळाली. 
 
 

जलनितीचे जनक
 
 
आज भारतात प्रत्येक राज्यात पाणी प्रश्‍न पेटला आहे. पाणी हा नैसर्गिक स्त्रोत आहे. पाणी मानवी जीवनात आवश्यक आहे. डॉ. आंबेडकरांनी जमीन व पाणी हे दोन घटक मानवी जीवनासाठी आवश्यक असल्याबाबत आपली भूमिका मांडली व जलसाक्षरतेचे महत्त्व स्पष्ट केले. भाकरा नांगल धरण, दामोदर नदीवरील धरण हे बाबासाहेबांमुळेच झाले. 
उत्कृष्ट संसदपटू डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक उत्कृष्ट संसदपटू, वक्ता आणि उत्तम प्रशासक होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे तेजस्वी सूर्याप्रमाणे बहुआयामी होते. हे प्रकर्षाने नमूद करावे लागेल.
 
 
लोकशाहीतील मार्गदर्शक तत्वे
 
 
स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यांना भारतीय राज्यघटनेत मूलाधार आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ही तत्त्वे मांडली. समाजात समताधिष्ठीत व्यवस्था निर्माण करण्यासाठी उपव्यवस्था आवश्यक आहे. साहित्यातून त्यांनी ही तत्त्वे रुजविली. फे्रंच क्रांतीतून समता, बंधुता व न्याय ही तत्त्वे आली. पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत ही तत्त्वे उतरविली. भारतातील विषमता दूर करण्यासाठी ती पोषक ठरली. यामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात रुजली. भारतामध्ये ‘एकतेमध्ये विविधता’ हे सूत्र विकसित झाले. कल्याणकारी राज्यांचा पुरस्कार करतांना राज्यात सामाजिक न्यायासाठी समता महत्त्वाची असते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणी व तत्त्वज्ञानातून सामाजिक समतेचा सिध्दांत विकसित झाला. सामाजिक न्यायासाठी सर्व तत्त्वे आवश्यक ठरतात. आज भारतीय समाजातील प्रत्येक क्षेत्रात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चतु:सूत्रीचा अग्रक्रमाने विचार केला जातो. ही माहिती युगाची गरज आहे हे प्रकर्षाने नमूद करावे लागेल.
 
 

विकासाचा आराखडा भारताला स्थैर्य मिळण्यासाठी
 
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विकासाचा आराखडा मांडला. त्यामध्ये अर्थनितीही मांडली. थोर अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्री, तत्त्ववेत्ता, शिक्षणतज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी देशाच्या आर्थिक विकासाबाबत सखोल अभ्यास करुन महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांनी उद्योग व औद्योगिकरणाचे समर्थन केले. औद्योगिकरण हे देशातील आवश्यक गरजा आणि देशातील नैसर्गिक स्त्रोत यावर आधारलेले असले पाहिजे. १९४२-४६ च्या काळात शाश्‍वत विकासावर डॉ.आंबेडकर यांनी भाष्य केले होते. शेती हा राष्ट्रीय उद्योग असावा आणि शेतीला उद्योग म्हणून दर्जा आवश्यक आहे. शेती ही राष्ट्राची संपत्ती असेल आणि सरकारने बी-बियाणे यांचा पुरवठा करावा. शेतकर्‍यांकडे पुरेसा पैसा आल्यानंतर तो परत करेल हा विचार डॉ. आंबेडकर यांनी मांडला. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. देशाच्या विकासात शेेती हा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरू शकते, असे त्यांना वाटत होते. देशात वीज क्षेत्रातील विकास हा आवश्यक आहे. भारतामध्ये वीज स्वस्त असावी, असा विचार त्यांनी मांडला. जल प्रकल्पातून ऊर्जा अर्थात वीजनिर्मिती करावी आणि विजेचा प्रश्‍न सोडवून औद्योगिकीकरण करावे. त्यासाठी राष्ट्रीय धोरण असावे. त्यामुळे देशाला आर्थिक स्थैर्य लाभेल.त्यामुळे देशाचा योग्य विकास साधता येईल. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविता येईल. म्हणून सूर्याप्रमाणे तेजस्वी विचारांचे व्यक्तिमत्व नव्या पिढीने जाणून व समजून घेणे ही सध्याच्या युगातील समाजाची गरज आहे. 
 
 
- डॉ.तुकाराम दौड
 
@@AUTHORINFO_V1@@