मराठी बेकरी किंग - गोविंद धारगळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |
 

काही उद्योगक्षेत्रांची नावे घेतली की, एका विशिष्ट समाजाचीच आठवण येते. कारण, या समाजाने परंपरेने तो व्यवसाय सांभाळलेला असतो. हॉटेल म्हटलं की शेट्टी, इराणी वा पारशी समाज आठवतो, स्टेशनरी किंवा तत्सम कार्यालयीन वस्तूच्या उद्योगव्यवसायात राजस्थानमधील एका विशिष्ट समाजाचं प्राबल्य आहे. बेकरी व्यवसायावर सुद्धा पूर्वी इराणी आणि नंतर मुस्लीम समाजाचं प्राबल्य राहिलेलं आहे. पूर्वीच्या काळी कित्येकांची सकाळ इराण्यांच्या बेकरीमधील पाव किंवा खारी बिस्कीट आणि चहाने होत असे. दिवाळीच्या काळात अनेक गृहिणी नानकटाई तयार करुन बेकिंगसाठी बेकरीत जातात. या बेकरीमध्ये काम करणारे अधिकांश हे उत्तर भारतीय आहेत, तर त्यांचे मालक मात्र मुस्लीम. अशा या व्यवसायात एक मराठी माणूस उतरतो आणि हा हा म्हणता बेकरी उद्योग क्षेत्रात स्वत:चं साम्राज्य उभं करतो. ही मराठी व्यक्ती म्हणजे गोविंद सीताराम धारगळकर. प्रसाद बेकरीचे मालक.
 
१९२७ साली गोव्यातील डिचोली येथील सीताराम धारगळकरांच्या घरी गोविंदचा जन्म झाला. गावातील ओळखीच्या मदतीने गोविंद आणि त्याचा भाऊ मुंबईत आले. गोविंद त्यावेळी अवघ्या १३ वर्षांचा होता. सुरुवातीला सायकलवरुन तो खारी बिस्कीटे विकू लागला. हा काळ होता १९४० च्या आसपासचा. याच काळात स्वातंत्र्य चळवळ जोरात होती. मुंबईतच ‘चले जाव’ आंदोलनाची सुरुवात झालेली. संपूर्ण मुंबई या आंदोलनाने पेटली होती. इंग्रजांनीदेखील हे आंदोलन चिरडण्याचा निर्धार केलेला. अशाच एका आंदोलनात गोळीबार झाला होता आणि एक गोळी गोविंदच्या कानशिलाजवळून निघून गेली. निव्वळ दैव बलवत्तर म्हणून गोविंद बचावला. जरा बस्तान बसल्यावर त्याने गिरगावमध्ये ‘बेबी बिस्कीट मार्ट’ नावाचं दुकान सुरु केलं. त्यानंतर हळूहळू ‘प्रभात बेकरी’ सुरु झाली. दोन दुकानं चालू झाली. आयुष्याला जरा स्थिरता मिळाली होती, मात्र समाधान नव्हतं. कारण, गोविंदला उत्पादनामध्ये रस होता. दरम्यान, गोविंदचं लग्न झालं. प्रकाश आणि प्रसाद अशी दोन मुले सुद्धा झाली. गोविंदच्या भावाने माहिमला ‘विजय बेकरी’ सुरु केली. १९७० साली गोविंद यांनी ‘विद्या बेकरी’ सुरु केली. बेकरीमधल्या ज्ञानाची पोतडी आता पुरेपूर भरली होती. त्याच जोरावर १९८१ साली तीन लाख रुपयांच्या भांडवलावर प्रसाद बेकरी उभी राहिली. आता ‘प्रसाद बेकरी’ हा ब्रॅण्ड निर्माण झाला. हिंदुजा रुग्णालयाच्या बाजूच्या गल्लीत बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या बाजूला ही बेकरी कित्येक दशकं दिमाखात उभी आहे. बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या कितीतरी पिढ्या या बेकरीतील उत्पादनांच्या चवीने तृप्त झालेल्या आहे. आजदेखील या शाळेतील माजी विद्यार्थी सध्या याच शाळेत शिकत असणार्‍या आपल्या मुलांना या बेकरीत घेऊन येतात आणि कौतुकाने आपण या बेकरीत कशा प्रकारे पेस्ट्रीज, केकचा फडशा पाडायचो ते सांगतात. खारी बिस्किटांसह या बेकरीमध्ये कुकीज, स्नॅक्स, टोस्ट, खारी इतकचं काय तर अगदी केळफूल आणि फणसाची भाजीसुद्धा मिळते.
 
गोविंदरावांना त्यांच्या दोन्ही मुलांनी उत्तम साथ दिली. मोठा मुलगा प्रकाश विक्री विभाग पाहतो, तर प्रसाद उत्पादन आणि दर्जा या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देतो. प्रसाद यांनी बीएस्सी केली आणि सोबतच दादर केंटरिंगमधून बेकरी विषयक अभ्यासक्रमपूर्ण केला. गोविंदरावांनी उभारलेल्या या बेकरी उद्योगाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या बेकरी उत्पादनांमध्ये कसल्याही प्रकारचं रसायन वापरलं जात नाही. तसंच ही उत्पादने जतन करुन ठेवली जात नाही.
 
गोविंदरावांच्या या बेकरी समूहाने आठ उद्योजक घडविले आहेत. ‘‘कमालीची शिस्त, प्रामाणिकपणा, ग्राहकांची अपेक्षापूर्ती, कुटुंब म्हणून सहकार्‍यांना सन्मानाची वागणूक या गुणांच्या जोरावर हा बेकरी समूह टिकून आहे,’’ असे प्रसाद धारगळकर सांगतात. गोविंद धारगळकरांनी वयाची ऐंशी ओलांडली तरीदेखील ते दरदिवशी बेकरीत येतात. सर्व गोष्टी नीट आहेत का ते तपासतात. कर्मचार्‍यांशी संवाद साधतात. त्यांची आपुलकीने विचारपूस करतात. ग्राहकांसोबतदेखील तितकंच अदबीने वागतात. या गुणांमुळेच त्यांच्याप्रती सर्वांनाच एक आदरयुक्त प्रेमआहे आणि दरारासुद्धा आहे. त्यांची तिसरी पिढी जरी या उद्योगसमूहाची धुरा सांभाळत असली तरी त्यांना देखील लाजवेल, अशी ऊर्जा आणि कार्यतत्परता गोविंदरावांच्या ठायी आहे. खरं तर अशा अनेक गोविंद धारगळकरांची आज मराठी समाजाला गरज आहे. कारण, त्यांच्यामुळेच मराठी समाज एक उद्योजकीय समाज म्हणून घडणार आहे.
 
 
 
 
 
- प्रमोद सावंत 
 
@@AUTHORINFO_V1@@