गँगस्टर संतोष आंबेकर न्यायालयात शरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |

 
 
-कारागृहात रवानगी

नागपूर, 
 
बाल्या गावंडे खून प्रकरणातील संशयित आरोपी कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर हा गुरुवारी प्रथमश्रेणी न्यायालयात शरण आला. त्यानंतर कळमना पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारागृहात जेरबंद केले.
 
 
संतोष आंबेकर आणि पॉपर्टी डीलर बाल्या गावंडे यांच्यात प्रॉपर्टीच्या कारणावरून वाद होता. दोघेही एकमेकांवर टपले होते. एकमेकांवर कुरघोडी करीत ते आपले वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करीत होते. बाल्याची ताकद वाढल्याने त्याने संतोषचा गेम करण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे संतोष संतापला होता. बाल्या केव्हाही आपला गेम करणार असल्याची भीती असल्याने संतोष शहरातून बेपत्ता झाला होता. त्यामुळे संतोषने योगेश कुंभारे यास बाल्याच्या खुनाची सुपारी दिली होती.
 
 
२२ जानेवारी २०१७ रोजी योगेशने कळमना हद्दीतील तुकारामनगर येथे आपल्या घरी पार्टी आयोजित केली होती. योगेशने बाल्याला या पार्टीत बोलविले होते. पत्नी आणि मुलीसह बाल्या योगेशच्या घरी आला होता. पार्टीत उशीर होत असल्याने बाल्याने पत्नी आणि मुलीला त्याच्या वाहनातून घरी जाण्यास सांगितले. बाल्याची पत्नी आणि मुलगी तेथून निघून गेल्यानंतर बाल्या हा दारू ढोसत होता. दारूच्या वादात त्याचा योगेशसोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, योगेश व त्याच्या साथीदारांनी बाल्याचा खून करून त्याचा मृतदेह झुडपात फेकून पळ काढला.
 
या प्रकरणी कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून १० जणांना अटक केली होती. १० मे रोजी कळमना पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यात संतोषचे देखील नाव होते. या घटनेनंतर संतोष शहरातून फरार झाला होता. न्यायालयाने देखील संतोषला फरार घोषित करून त्याच्याविरुद्ध अटक वारंट जारी केला होता. सबळ पुराव्याअभावी या प्रकरणातील सर्वच आरोपींची निर्दोष सुटका झाली होती. मात्र, संतोष फरारच होता.
 
 
गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास संतोष हा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ओ. जैन यांच्या न्यायालयात शरण आला. न्यायालयाने ही माहिती कळमना पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक खुशाल तिजारे हे आपल्या सहकाऱ्यांसह न्यायालयात आले. त्यांनी न्यायालयातून वारंट घेऊन संतोषची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. उद्या शुक्रवारी कळमना पोलिस प्रॉडक्शन वारंटवर संतोषला ताब्यात घेणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@