जीवनमूल्ये जोपासणारी पिढी घडवा : चंद्रकांत पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : ’’शाळा-महाविद्यालयांमधून जीवनमूल्ये जोपासणारी ज्ञानवान पिढी शिक्षकांनी घडवावी,’’ असे आवाहन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. सिन्नर तालुक्यातील मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उद्योजक राधाकिसन चांडक, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ शतक महोत्सवी समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनायकराव गोविलकर आदी उपस्थित होते.
 
यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ’’प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे आणि संस्कारांचे बीज रोवण्याचे काम शिक्षक करीत असतात. विद्यार्थ्यांवर घडविले जाणारे संस्कार त्यांच्या यशस्वी जीवनाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे शाळेची इमारत सुंदर असण्यासोबतच त्यातून जीवनाचे मूल्य जोपासणारी पिढी घडविण्याचे कार्य होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांवर नम्रता व मोठ्यांविषयी आदराचे संस्कार शाळेतून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला शिक्षित बनविण्यासाठी जो पाया रचला, त्यामुळे आज अनेक पिढ्यांना विकास साधणे शक्य झाले आहे. आजच्या गतिशील व व्यवहारी जगात टिकण्यासाठी इंग्रजी भाषा आवश्यक आहे, त्याप्रमाणेच खाजगी आयुष्यातील भावविश्व जपण्यासाठी मातृभाषादेखील महत्त्वाची आहे’.
 
तर गोविलकर म्हणाले, ’’विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लावण्यासाठी लहानपणापासूनच त्यांच्या कोमल व निरागस मनावर संस्कार करण्याचे काम शिक्षक करत असतात. प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यभरासाठी विद्यार्थ्याच्या भूमिकेत असते. आयुष्यातील प्रत्येक प्रसंग व परिस्थिती हे माणसाला शिकविण्याचे काम करीत असतात.’’ कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाटील यांच्या हस्ते विद्यालयाच्या नूतन इमारतीचे कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. त्यांनतर मान्यवरांनी नूतन वास्तूची पाहणी केली. तसेच महात्मा जोेतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
देवस्थान जमिनीबाबत तक्रारीवर कारवाई करू : पाटील
’’त्र्यंबकेश्वर येथील देवस्थान जमिनीबाबत दाखल झालेल्या तक्रारींबाबत कारवाई करू,’’ असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. उटीच्या वारीनिमित्त येथे आले असता ते बोलत होते. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी श्री निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय धोंडगे हेदेखील उपस्थित होते. दरम्यान उटीच्या वारीसाठी मोठ्या प्रमाणावर दिंड्या शहरात दाखल झाल्या असून भाविकांनी आज दर्शन घेतले.
 
@@AUTHORINFO_V1@@