पालिका रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |

शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन

 
  
 
 
 
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक व नायर रुग्णालयामध्ये राज्यातील विविध भागातून हजारो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा असून महत्वाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सुट्टींच्या दिवसांमुळे तब्बल अडीच महिने कमतरता जाणवेल, अशी माहिती सुत्रांनी दिली.
 
या रुग्णांना रक्त वेळेत मिळावे यासाठी प्रत्येक रुग्णालयात रक्तपेढ्या उभारण्यात आल्या आहेत. रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताचा साठा करण्याचे प्रयत्न रुग्णालय प्रशासनाकडून होतो. प्रतिदिन २५० ते ३०० बाटल्यांची आवश्यकता असते. मात्र एप्रिल ते जून या महिन्यांत शाळा, महाविद्यालयांना सुट्टया पडल्याने अनेकजण गावी जातात. त्यामुळे या कालावधीत रक्तदान शिबिरांना अल्प प्रतिसाद मिळतो. गेल्या काही दिवसांपासून रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मे महिन्यात हे प्रमाण अधिक असते, असे पालिकेचे म्हणणे आहे. रक्ताच्या बाटल्या अगदी कमी उपलब्ध होत आहेत. आतापासूनच रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने काही शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. रुग्णांचे यामुळे प्रचंड हाल असल्याची माहिती, सुत्रांनी दिली.
 
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
 
सध्या रुग्णांना हवे तेवढे रक्त मिळणे कठीण जात आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत रक्तदान शिबिरांना तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रोजच्या पुरवठ्यामध्ये रक्ताच्या बाटल्या कमी उपलब्ध होतात. परंतु, सुट्टीचा कालावधी संपला की आवश्यक पुरेसे रक्त उपलब्ध होते. मात्र रुग्णालयांकडून सातत्याने रक्तदान शिबिरे आयोजित केली जात असून रक्तदानासाठी सर्वांनी पुढे यायला हवे, असे आवाहन पालिका रुग्णालय अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@