निसर्ग हाच गुरु!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 

 
वैज्ञानिक संशोधनातल्या प्रगतीची धुंदी पाश्चिमात्यांना चढली तर नवल. कारण, त्यांनी दीर्घोद्योगाने वैज्ञानिक संशोधन स्वतः केलं होतं. पण, इंग्रजी वाघिणीचे दूध प्यालेल्या आमच्याकडच्या कथित विचारवंतांना ती धुंदी जास्त चढली. ’वैज्ञानिक प्रगतीचे नवे नवे टप्पे गाठताना, यशाची नवी नवी शिखरे पादाक्रांत करत असताना, मानवाने निसर्गावर निर्णायक मात केलेली आहे,’ अशा प्रकारची दर्पोक्ती गेली ५०-६० वर्षं आपल्याकडे केली जात आहे. एका शालेय पाठ्यपुस्तकात जलचर प्राणी सदैव पाण्यात राहून कसे जगतात, त्यांचे जीवनव्यवहार कसे चालतात, याबद्दल माहिती देऊन अखेरीस म्हटलं होतं की, ’अशा प्रकारे विज्ञानाने या जलचर प्राण्यांबद्दल तपशीलवार माहिती आपल्यासमोर ठेऊन, ’जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे’ हे संतांचं म्हणणं खोटं ठरवलं आहे.’ म्हणजे या पाठ्यपुस्तक रचयित्याने विज्ञानाची महती गाता गाता तेवढ्यात संतांना एक चिमटा काढून घेतला. याचं कारण एवढंच की, संत बिचारे हिंदू होते. कुणीही उठावं आणि त्यांना काहीही म्हणावं! येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी सुमारे साडेचार हजार वर्षे, हे जगाचं वय आहे, असे बायबल म्हणतं. विज्ञानाच्या सध्याच्या अंदाजाप्रमाणे पृथ्वीचं वय ४.५ दशकोटी वर्ष एवढं आहे. ’मग बायबलचं म्हणणं विज्ञानाने खोटं ठरवलं आहे,’ असं म्हणण्याची कुणाची हिंमत का नाही? कारण साधं आहे. अशी हिंमत दाखवली, तर पुस्तक मंडळाकडून हकालपट्टी होईल, दौरे, चर्चासत्रं, सेमिनार्स वगैरे भौतिक फायदे मिळणार नाहीत.
 
तर ते कसंही असो. संत हे कोणत्याही भौतिक फायद्यासाठी काहीही करत नसून, जे सत्य आहे ते ठामपणे सांगत असतात. ’निसर्ग हाच माणसाचा खरा गुरू आहे. माणूस निसर्गाला जेवढा बिलगून राहील, निसर्गाशी जेवढी जवळीक साधेल, तेवढी निसर्गाची रहस्यं त्याला उलगडत जातील आणि त्याला चिरंतन सुख प्राप्त होईल,’ असं सगळ्या संताचं सांगणं आहे. ‘चिरंतन सुख म्हणजेच आत्मसुख’ हा व्यक्तिगत विकासाचा खूपच वरचा टप्पा झाला, पण वैज्ञानिकांचं म्हणणं असे आहे की, निसर्गाची सूक्ष्मनिरीक्षणं, अभ्यास केला तर अनेक भौतिक, व्यावहारिक सुखंदेखील आपल्याला मिळू शकतात. म्हणजे काय?
 
इंग्लंडमधल्या ’शेफिल्ड’ विद्यापीठातले संशोधक प्रा. फ्रान्सिस रॅटनिक्स यांनी मुंग्यांवर संशोधन चालवलं आहे. आपल्या वारुळापासून दूर असलेल्या खाद्यसाठ्याचा पत्ता मुंग्यांना कसा लागतो? यावर पूर्वीच संशोधन झालं आहे. पण, खाद्यसाठ्यांपासून वारुळापर्यंतचा जो मार्ग मुंग्या आखून घेतात, त्याबाबत प्रा. रॅटनिक्स यांनी अधिक संशोधन चालवले आहे. हजारो, लाखो मुंग्या अतिशय शिस्तबद्धपणे खाद्यावर तुटून पडतात आणि किंचितही गडबड-गोंधळ न करता कणाकणाने तो खाद्यसाठा आपल्या वारुळाकडे हलवतात. प्रा. रॅटनिक्स यांच्या मते, मुंग्यांच्या हालचालींच्या सखोल अभ्यासातून आपल्याला उत्तम ट्रॅफिक मॅनेजमेण्ट करता येईल. दररोज वाढणारी वाहनं आणि अपुरे पडणारे रस्ते ही जगातल्या सगळ्याच शहरांची डोकेदुखी आहे. मुंग्यांच्या वाहतूक व्यवस्थापनाच्या अभ्यासातून आपल्यालाही तसं सुविहित वाहतूक व्यवस्थापन करता येईल.
 
विमानाला आकाशात झेप घेण्यापूर्वी बराच मोठा स्टार्ट घ्यावा लागतो, हे आपल्याला माहीतच आहे. विमान जेवढं मोठं, तेवढा स्टार्ट आणखी मोठा. कमीत कमी स्टार्टमध्ये आकाशात झेप घेणारी विमानंही निघालेली आहेतच. विमानवाहू युद्धनौकांवर तीच विमानं असतात. पण, त्यांची इंजिनं अधिक शक्तीशाली बनवावी लागतात. आता मोठ्या शक्तीचं इंजिन म्हणजे जास्त ऊर्जा पाहिजे. जास्त ऊर्जा निर्माण व्हायला इंधनही जास्त पाहिजे. म्हणजे मामला फार खर्चिक बनतो. विमानवाहू युद्धनौकेवरून झेप घेणार्‍या विमानाच्या प्रत्येक उड्डाणामागे मोठ्या रकमेचा खड्डा सोसावा लागतो.
 
अमेरिकेतल्या ’पासादेना’ इथल्या ’कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधले संशोधक मायकेल डिकिन्सन यांना असं आढळलं आहे की, मधमाशा व गांधीलमाशा या चटकन झेप घेतात. कोणताही पक्षी झेप घेताना पंखांची हालचाल करत असतो. प्रत्यक्ष उडत असतानाही गती कमी जास्त करण्यासाठी वा तरंगत राहण्यासाठी त्यांना पंख हलवावे लागतात. उडणार्‍या कीटकांना हेच करावं लागतं, मधमाशा व गांधीलमाशा झेप घेताना व उडत असताना पंखांची कमीत कमी हालचाल करतात आणि तरीही त्यांचे उड्डाण सफाईदार असते. त्या वाटेल तेवढ्या अंतराचा पल्ला गाठू शकतात. म्हणजेच, कमीत कमी उर्जेचा वापर करून, त्या आपल्या हालचाली करतात. आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत उड्डाणशास्त्रातल्या या विशेष शाखेला ’एअरो डायनॅमिक्स’ असं म्हणतात. मधमाशांच्या या एअरोडायनॅमिक्सवर सखोल संशोधन करून, कमी उर्जेत चटकन झेप घेणारी हलकी विमानं बनवता येतील, असं मायकेल डिकिन्सनना वाटत आहे.
 
ताकानोरी इटो आणि किकुकात्सु इटो हे जपानी संशोधक एका विशिष्ट प्रकारच्या कोबीवर संशोधन करत आहेत. हा कोबी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला तरी त्याचं तापमान बदलत नाही. ते कायम २० अंश सेंटिग्रेड एवढंच राहतं, असं त्यांना आढळलं. अधिक संशोधनात त्यांना असंही आढळलं की, बाहेरचे तापमान कितीही खाली जाओ, अगदी गोठणबिंदूच्याही खाली गेलं, तरी हा कोबीचा गड्डा २० अंशांचा आपला तापमान बिंदू जराही सोडत नाही. तो, म्हणजेच ती वनस्पती हे कसं साध्य करते. हे जर समजलं तर हिवाळ्यातल्या अनेक समस्यांवर उत्तर सापडेल.
 
ही तीनही संशोधनं वेगवेगळे संशोधक वेगवेगळ्या ठिकाणी करत आहेत. पण, त्यांच्यातला समान धागा म्हणजे ते निसर्गाने निर्माण केलेल्या काही सजीव रहस्यांवर संशोधन करत आहेत आणि ते करताना आपण निसर्गावर मात वगैरे करायला निघालोय असा दिखाऊ अभिनिवेश त्यांच्यापाशी नाही. उलट, सगळ्यांच्या म्हणण्याचा आशय असाच आहे की, निसर्गाजवळ वेगवेगळ्या आधुनिक समस्यांचीदेखील उत्तरं आहेत. आपल्याकडच्या कथित विचारवंतांना हे लगेच पटेल, कारण सांगणारे गोर्‍या चामडीचे आहेत ना!’
 
पोर्तुगीज? की चिनी? की हिंदू?
 
ख्रिस्तोफर कोलंबस हा इटालियन दर्यावर्दी स्पेनचा राजा फर्डिनंड व राणी इसाबेला यांच्या आर्थिक मदतीवर हिंदुस्थान शोधायला निघाला आणि अपघाताने अमेरिकेत पोहोचला. ही घटना सन १४९२ सालची. ’अमेरिका खंडात पोहोचणारा पहिला युरोपियन किंवा पहिला परका दर्यावर्दी’ असं कोलंबसाला म्हटलं गेलं. पण, या सिद्धांतावर आता खुद्द अमेरिकेतही कोणी विश्र्वास ठेवत नाही. उत्तर अटलांटिक महासागरातल्या स्कँडिनेव्हियातले म्हणजेच आताच्या नॉर्वे, स्वीडन देशांमधले व्हायकिंग नावाचे लोक फार तरबेज दर्यावर्दी होते आणि युरोपियनांपूर्वी कित्येक शतक त्याचं अमेरिका खंडाशी उत्तमसमुद्री दळणवळण होतं, असं आता सिद्ध झालं आहे.
 
२००२ साली ब्रिटिश इतिहासकार गॅविन मेन्झीस यांचं ’१४२१ दी इयर चायना डिस्कव्हर्ड अमेरिका’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. आजही ते पुस्तक ’बेस्टसेलर’ यादीमध्ये आहे. या पुस्तकात मेन्झीसने असं प्रतिपादन केलं आहे की, ’’कोलंबसापूर्वी ७० वर्षं, म्हणजे सन १४२१ साली चीनच्या सम्राटाचा एक दर्यासारंग ऍडमिरल झेंगदेखील समुद्रमार्गे अमेरिका खंडात पोहोचला होता. मेन्झीसच्या या पुस्तकामुळे इतिहास-भूगोल संशोधन क्षेत्रात भरपूर वादविवाद, चर्चा चालू आहेत. नुकतीच त्यात भर पडली आहे ती १४१८ सालच्या एका नकाशामुळे. लिऊ गैंग हा चीनमधला एक वकील, त्याला नकाशे जमवण्याचा छंद आहे. मेन्झीसचं पुस्तकं वाचल्यावर लिऊच्या लक्षात आलं की, अरे आपल्या संग्रहात सन १४१८ चा जगाचा नकाशा आहे. त्याने तो काढून पाहिला, तर खरंच सन १४१८ साली बनवलेल्या त्या नकाशात अमेरिका खंड अगदी स्पष्टपणे दाखवलेला होता. लिऊने ताबडतोब संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला आणि राजधानी बीजिंगमधल्या एका भरगच्च पत्रकार परिषदेत तो नकाशा जागतिक प्रसारमाध्यमांना दाखवण्यात आला. आता नवीन विवाद सुरू झाला आहे. इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातील नकाशा तज्ज्ञ प्रा. सॅली चर्च यांनी तो नकाशा बोगस ठरवला आहे. सिंगापूर विद्यापीठाच्या ’एशिया रिसर्च इन्स्टिट्यूट’मधील तज्ज्ञ जेफ वेड यांनीही सॅली चर्च यांच्यासारखंच मत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, ’’हा कथित चिनी नकाशा म्हणजे १८व्या शतकातल्या एका युरोपियन नकाशाची भ्रष्ट नक्कल आहे.’’
 
तर आपल्या पुस्तकांतल्या पुराव्यांना चीनमधून बळकटी मिळाल्याने गॅविन मेन्झीस आनंदित झाले आहेत. ते म्हणतात, ’‘१४१९ सालचा पोर्तुगालमध्ये बनवलेला नकाशा तुम्ही खरा मानता. त्यातही अमेरिका खंड स्पष्टपणे दाखवलेला आहे. अर्थात त्यात काही चुकाही आहेत. शिवाय १४१९ साली वेगवेगळे सागरी मार्ग शोधण्याचं काम सुरूही झालेलं नव्हतं. तरीही तुम्ही पोर्तुगीज नकाशा खरा मानता. आणि जवळपास त्याच चुका असलेला १४१८ सालचा चिनी नकाशा मात्र बोगस, हे तर्कशास्त्र मोठं अजब म्हटलं पाहिजे!’’ आम्हीच काय ते मोठे दर्यावर्दी, आम्हीच वेगवेगळे सागरी मार्ग शोधून काढले अशी शेखी युरोपीय लोक गेली दोन शतकं मिरवत आहेत. ती खरी नाही, हे आता त्यांचेच लोक सिद्ध करत आहेत.
 
 
अमेरिकेत मेक्सिकोमध्ये अलीकडेच एक शिलालेख सापडला. अमेरिकन संशोधक बॅरी फेल यांनी त्याबाबत सविस्तर संशोधन करून, असं सिद्ध केलं आहे की, हा शिलालेख भारतीय-जावाई भाषेतला असून, त्यातील मजकुरावरून असं दिसतं की, एक भारतीय महानाविक वुषमुन याने व्यापारी जहाजातून शके ८४५ मधील आषाढ महिन्यात, म्हणजे इ. स. ९२३ मधील जुलैमध्ये या ठिकाणाला म्हणजे मेक्सिकोला भेट दिली होती. अर्थ स्पष्ट आहे. गॅविन मेन्झीसच्या ऍडमिरल झेंगने सन १४१९ मध्ये अमेरिका गाठली होती. भारताच्या महानाविक वुषमुन याने सन ९२३ मध्येच ती गाठली होती.
 
 
 
 
 
 
- मल्हार कृष्ण गोखले
 
 
@@AUTHORINFO_V1@@