कणकवलीत भाजप खासदार जिंकला, 'त्यांचा' पक्षही जिंकला आणि काँग्रेस आमदारही जिंकला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |

 

 
 
 
 
मालवणी दशावताराचो नमुनो..

ऐतिहासिक निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल, सोशल मीडियावर विनोदांना उधाण

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कणकवलीच्या नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानने स्पष्ट बहुमत व नगराध्यक्षपद जिंकत राणेंचा बालेकिल्ला अद्याप मजबूत असल्याचे दाखवून दिले. मात्र, या महाराष्ट्र स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे भाजपचे राज्यसभा खासदार असल्याने व महाराष्ट्र स्वाभिमानने भाजपच्या विरोधात निवडणूक लढत विजय मिळवलेला असल्याने कणकवलीतील हा विजय नेमका कुणाचा आणि पराभव नेमका कुणाचा यावरून काहीसा तांत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे. याच गोंधळामुळे अर्थातच सोशल मीडियावरही विनोदांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांची भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमानचे राणे खासदार मात्र भाजपचे बनले. महाराष्ट्र स्वाभिमान हा पक्ष राणेंनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (रालोआ) सामीलही केला. दुसरीकडे कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मात्र, राणेंच्या स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली तर या आघाडीविरोधात भाजपने शिवसेनेसोबत युती केली. स्वाभिमानच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे नारायण राणे यांचे पुत्र, आमदार नितेश राणे हे आमदार मात्र काँग्रेसचे. मात्र, काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. या सगळ्या उलट्यासुलट्या तिढ्यामुळे नेमके कोण कोणाच्या विरोधात आणि समर्थनार्थ लढत आहे, हेच लोकांना समजेनासे झाले.

अखेर या निवडणुकीत राणे यांनी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाने राणे यांना खासदारकी देणाऱ्या भाजपचा राष्ट्रवादीच्या साथीने पराभव केला. यामुळे नारायण राणे यांचे कणकवलीवरील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मात्र, भाजप खासदार राणे यांनी हे वर्चस्वा सिद्ध करण्यासाठी आपल्याला खासदारकी देणाऱ्या पक्षाचाच पराभव केला. दुसरीकडे, महाराष्ट्र स्वाभिमानच्या या विजयाचे श्रेय दिले जाणारे आमदार नितेश राणे हे मात्र काँग्रेसचे. त्यामुळे एकाअर्थाने 'भाजपचा खासदार जिंकला, मात्र भाजप पराभूत झाला. भाजपप्रणीत रालोआतील घटकपक्ष जिंकला तोही, राष्ट्रवादीच्या साथीने, मात्र भाजप पराभूत झाला. भाजपप्रणीत महाराष्ट्र स्वाभिमानचा काँग्रेस आमदाराच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादीच्या साथीने विजय झाला, मात्र काँग्रेस पक्षाचा धुव्वा उडाला.' अशी काहीशी विचित्र परिस्थिती या निवडणुकीच्या निमित्ताने उद्भवली आहे. या सगळ्यातून 'मालवणी दशावणारा'चा एक आगळावेगळा नमुना पाहायला मिळाल्याचीच भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@