लिंगायत बांधवांनो, सावधान ! महात्मा बसवेश्वरांचा इतिहास बदलला जातोय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018   
Total Views |

 
 
 
सर्वच महापुरुषांनी आयुष्यभर खस्ता खाऊन त्या त्या काळात समाजाच्या आवश्यकतेनुसार कठोर परिश्रम व प्रचंड त्यागातून एकेका क्षेत्रात आपले काम उभे केले आहे. त्यांची माहिती आजच्या तात्कालिक राजकारणासाठी आपल्याला हवी तशी बदलणे याला क्षमा नाही. कर्नाटकची निवडणूक महिनाभरात संपेलही पण बसवेश्वरांच्या या गुन्हेगारांना कठोर शासन कधी व कसे मिळणार?
 
 
कर्नाटक निवडणुका जवळ आल्या आणि काँग्रेसने पुन्हा एकदा जातीजातींत फूट पाडायची आपली खेळी खेळली. लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे त्यासाठी शिफारस केली. त्यावरून व्हायचा तो गदारोळ झालाच. लिंगायत समाजाचे म्हणणे काय आहे हे ऐकून घ्या अशी भूमिका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली तर हा हिंदू धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली. राज्यातील लिंगायत समाजानेही त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. नाही म्हणायला निरनिराळ्या स्तरावर निवेदने देऊन, लिंगायत कसे हिंदूच आहेत हे सांगून, पंचाचार्यांच्या निवेदनातून आवश्यक तेवढा विरोध या सगळ्याला केला. पण एकंदर समाजातील वातावरण ढवळून निघाले आहे, गढूळ झाले आहे अशी मात्र परिस्थिती नाही. निवडणुकांचा खेळ हा फारतर आणखी महिनाभर चालेल पण दुर्दैवाने काँग्रेसच्या व डाव्यांच्या प्रचाराला बळी पडून लिंगायत समाजातीलच काही तरुणांनी चक्क महात्मा बसवेश्वरांची इंटरनेटवरील माहिती बदलण्याचा प्रयत्न चालवला आहे. 
 

 
 
 
 
लिंगायत हा खरंच वेगळा धर्म आहे हे ठसवण्यासाठी महात्मा बसवेश्वर व लिंगायत इतिहासाविषयी इंटरनेटवर विखारी लिखाण करून खोटी माहिती लिहिण्यास काही तरुणांनी सुरुवात केली आहे. विकिपीडिया, फेसबुक, व्हॉट्सॅपसारख्या माध्यमांतून वेगळ्या लिंगायत धर्माचा प्रचार सुरु केलेला दिसतो. प्रामुख्याने यात डाव्या विचारांकडे झुकलेल्या विद्यार्थी संघटनांशी संबंधित मुलांचा सहभाग अधिक असल्याचे दिसते. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडसारख्या संघटना व ब्रिगेडस् समाजात दुही पेरण्याचे काम करतात त्याचप्रमाणे बसवेश्वरांच्या विचारांचा आपल्याला हवा तसा प्रसार करण्यासाठी बसव ब्रिगेड नावाची एक संघटनाही स्थापन करण्यात आली आहे. बसवेश्वर कसे हिंदू धर्मातील नव्हते तर ते नव्या धर्माचे संस्थापक होते हे सिद्ध करणे हाच यांचा एककलमी कार्यक्रम आहे.
 

 
 
 
 
विकिपीडियावरील महात्मा बसवेश्वरांशी संबंधित माहितीतही नुकताच फेरफार करण्यात आला आहे. केवळ इतकेच नाही तर लिंगायत, वीरशैव या शब्दांचेही संदर्भ बदलण्यात आले आहेत. महात्मा बसवेश्वर हे हिंदू लिंगायत होते असे जिथे जिथे उल्लेख येतात तिथे तिथे ते बदलून केवळ लिंगायत करण्यात आले आहेत. बसवेश्वर वैदिक परंपरा मानत होते असे उल्लेख ते वेदांना नाकारत होते असे बदलण्यात आलेले आहेत. वीरशैव व लिंगायत म्हणजे एकच आहेत या ऐवजी ते एक कसे नाहीत याची खोटी माहिती व खोटे दाखले देण्यात आले आहेत. हे सर्व बदल फार जुने नसून अगदी अलिकडच्या काळातील म्हणजे गेल्या एक-दोन महिन्यातील आहेत हे विशेष. मराठी आणि इंग्रजी पानांवरील हे बदल पाहिल्यावर कोणालाही हे कळून येईल की काँग्रेसने वेगळ्या धर्माच्या शिफारशीची घोषणा केल्यानंतरच हे सर्व सुरु झाले आहे.
 

 
 
 
 
महात्मा बसवेश्वर म्हणेज भगवान शंकराचे निस्सीम भक्त. त्यामुळे बसवेश्वरांची यापूर्वीची चित्रे भगवान शंकर-पार्वती यांच्या पार्श्वभूमीवर किंवा त्यांच्या सोबत काढलेली असत, मात्र ती ही आता बदलली जात आहेत. त्यांनी सांगितलेली उपसना शिवलिंग धारण करून करण्याची होती. मात्र हे शिवलिंग नसून केवळ आत्मलिंग आहे व त्याचा शंकराशी काहीही संबंध नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. बसवेश्वरांचा सर्वांत मोठा संदेश म्हणजे ‘कायकवे कैलास’ अर्थात ‘कर्मातच कैलास आहे’. मात्र त्याचाही अर्थ बदलून ‘कर्मातच स्वर्ग आहे’ असे सांगण्याचा प्रयत्न सुरु आहे. बसवेश्वरांनी हिंदू धर्मामतील त्रुटी दूर केल्या त्यामुळे ते पुन्हा तोच धर्म कसा स्वीकारतील असा बालिश तर्क देऊन त्यांच्या वेगळ्या धर्माचे समर्थन केले जात आहे. या सर्वामुळे महात्मा बसवेश्वरांचे प्रतिमाहनन होत आहे याचा जराही विचार न करता कोणत्याही नियंत्रणाशिवाय एका राष्ट्रपुरुषाविषयीची इंटरनेटवरील माहिती बदलली जात आहे हे फार भयंकर आहे.
 
 
 
ही मंडळी केवळ एवढेच करून थांबली नाहीत तर लिंगायत समाजातील तरुणांची माथी भडकवण्यासाठी निरनिराळी संकेतस्थळेही सुरु करण्यात आली आहेत. त्यातून महात्मा बसवेश्वर, लिंगायत धर्म, अंधश्रद्धा याविषयी विकृत लिखाण केले जात आहे. बसवेश्वरांच्या साहित्याचा चुकीचा अर्थ लावून त्यांना हिंदू धर्मापासून वेगळे दाखवणाऱ्या, बसवेश्वरांच्या पत्नी व मुलीबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या एम.एम.कलबुर्गींवर तसेच त्यांच्या साहित्यावर गौरवपर लेख लिहिले जात आहेत. वादग्रस्त लेखिका गौरी लंकेश यांच्याविषयी, त्यांच्या खुनाविषयी वादग्रस्त लिखाण केले जात आहे. ठिकठिकाणी झालेल्या लिंगायत मोर्च्यांचे अतिरंजित वर्णन केले जात आहे. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हे काम सुरु असून लिंगायत तरुणांची माथी भडकवण्याचेच हे उद्योग असल्याचे जाणवते.
 
 
 
गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटच्या वापरकर्त्यांसाठी विकिपीडियाला माहितीचा एक प्रमुख स्त्रोत म्हणून समजले जात आहे. कोणत्याही विषयावरील अधिकृत माहिती मिळवण्यासाठी युवकांची पहिली पसंती विकिपीडियाला असते. विकिपीडियावरील माहितीसोबत अशी छेडछाड करून महापुरुषांच्या इतिहासाची मोडतोड करणे हा भारतीय दंड विधानाप्रमाणे गुन्हा असेल किंवा नसेलही परंतु नैतिक गुन्हा मात्र नक्की आहे. या सर्वच महापुरुषांनी आयुष्यभर खस्ता खाऊन त्या त्या काळात समाजाच्या आवश्यकतेनुसार कठोर परिश्रम व प्रचंड त्यागातून एकेका क्षेत्रात आपले काम उभे केले आहे. त्यांची माहिती आजच्या तात्कालिक राजकारणासाठी आपल्याला हवी तशी बदलणे याला क्षमा नाही. कर्नाटकची निवडणूक महिनाभरात संपेलही पण बसवेश्वरांच्या या गुन्हेगारांना कठोर शासन कधी व कसे मिळणार?
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@