महाडच्या 'चवदार तळ्या'चे जलशुद्धीकरण होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चवदार तळ्याच्या साक्षीने सामाजिक क्रांतीची सुरुवात केली त्या रायगड जिल्ह्यातील महाड येथील 'चवदार तळ्या'तील गाळ उपसून पाण्यात जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात येणार आहे. रायगड जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली.
 
या ऐतिहासिक चवदार तळ्याला गेल्या काही वर्षात धार्मिक महत्वही प्राप्त झाले आहे. या तळ्याला भेट द्यायला जगभरातून आंबेडकर अनुयायी येतात व इथले पाणी श्रद्धेने पितात. म्हणूनच इथे येणाऱ्या भाविकांना या ऐतिहासिक तळ्यातील पाणी शुद्ध स्वरूपात मिळावे, यासाठी तळ्यातील गाळ काढणे, आजुबाजूच्या सांडपाण्याचा शिरकाव थांबवणे, पाणी शुद्धीकरणाकरता प्रेशर सॅण्ड फिल्टर व कार्बन फिल्टर यंत्र बसवणे, पाण्यातील आक्सिजन वाढवण्यासाठी तरंगते एरियेटर बसविणे, भाविकांना शुद्ध पाणी नळाद्वारे मिळेल याची व्यवस्था करणे आणि तलावात मासे व कासवे सोडणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
 
चव्हाण म्हणाले की, चवदार तळ्यातील पाण्याचे नमुने अणुजीव शास्त्रज्ञ यांच्याकडे जैविक आणि रासायनिक तपासणीकरिता पाठवले असता तपासणी अहवालात हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आढळले होते. या पाण्यावर योग्य ती प्रक्रिया करणे आवश्यक होते. या तळ्यावर २० मार्च रोजी महाड सत्याग्रहाच्या वर्धापन दिवशी, बुद्ध पौर्णिमेला, १४ एप्रिल आंबेडकर जयंतीला, ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाला आणि २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवसाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित होत असतो. या भाविकांची संख्या लक्षात घेता त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व त्यांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. या कामासाठी सुमारे एक कोटी ३७ लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाकडून हे काम करण्यात येणार असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@