संविधानाचा जागर हाच भारताच्या उत्कर्षाचा राजमार्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |
 

 
भारताची नैतिक आणि भौतिक दोन्ही स्तरांवरील प्रगती केवळ संविधानाने आखून दिलेल्या मार्गानेच होऊ शकते. त्यामुळे संविधानाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अतीव श्रद्धा आणि अभिमान असणे अत्यंत स्वाभाविक आहे आणि तो असायलाच हवा.
 
ब्रिटिशांनी भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी केल्यानंतर दोन्ही देशांनी आपापल्या पद्धतीने स्वतंत्र राज्यघटना बनवून, देशाचा कारभार सुरू केला. तेव्हापासून आजपर्यंत अनेक वेळा पाकिस्तानात लष्करी राजवट आली. जितके वेळा लोकनियुक्त सरकार स्थापन झाले, त्या प्रत्येक वेळी देशाची संपूर्ण घटना बदलण्यात आली. पण, भारतात मात्र आजपर्यंत घटना बदलण्याची वेळ ना कधी आली ना कधी येईल. याचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ घटनाच इतकी परिपक्व आणि परिपूर्ण बनवली आहे की तिचा मूळ साचा कालातीत आहे. त्यात बदल करण्याची गरज नाही आणि तशी तरतूददेखील नाही. फक्त कलम ३६८ प्रमाणे गरज पडल्यास सरकार घटनादुरुस्ती करू शकते. आजपर्यंत ७१ वर्षांच्या काळात, फक्त १०१ वेळा घटनादुरुस्ती झाल्या. शेवटची (१०१) घटनादुरूस्ती जीएसटीच्या रूपाने सर्वपरिचित आहे. आपल्या संविधानाचे मूल्य यावरूनदेखील ध्यानात येते की, आजपर्यंत आणीबाणीचा २१ महिन्यांचा कालावधी सोडला, तर भारताची वाटचाल ही कायम विकासाभिमुखच राहिली आहे. भारतात अनेक विरोधी विचारसरणीचे पक्ष असूनदेखील प्रत्येक निवडणुकीनंतर होणारे सत्तांतर शांततेच्या मार्गाने व हिंसामुक्त असे होत आले. भारताच्या प्रगतीत कुठेही कुणाचीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आडवी आली नाही आणि याचे श्रेय फक्त भारताच्या संविधानाला जाते. ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितमुक्तीचा लढा संवैधानिक मार्गांनी लढण्यास सुरुवात केली, त्याचवेळी त्यांनी संविधानाचे बीज रोवले होते आणि त्याच वेळी स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, यावर त्यांचे विचारमंथन चालू झाले होते. त्यासाठी आवश्यक ज्ञानार्जनालादेखील त्यांनी सुरुवात केली होती. सायमन कमिशनबरोबर संविधानावर चर्चा करण्याच्या निमित्ताने त्यांनी अनेक देशांच्या घटना अभ्यासल्या. स्वतःला आठ दिवस एका खोलीत कोंडून घेऊन, विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास ते करत होते. समाजाचा सर्वांगीण उत्कर्ष केवळ संविधानाद्वारेच साध्य होऊ शकतो, हे त्यांनी तेव्हाच ताडले होते. मग पुढे गोलमेज परिषदा असतील किंवा दरम्यानच्या काळात ज्यावेळी ब्रिटिशांनी अनेक कारणांनी अनेक वेळा घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू केली, त्या प्रत्येक वेळी बाबासाहेबांचा त्यामध्ये सहभाग होता. त्यातूनच बाबासाहेबांचे ‘राज्यघटना’ या विषयावर प्रावीण्य निर्माण झाले. त्यांची संविधानाविषयी असलेल्या ज्ञानाची कीर्ती देशविदेशातही पसरली. जेथे जेथे संविधान हा विषय यायचा, तेथे तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समीकरणच तयार झाले. पुढे ते एवढे घट्ट झाले की, जेव्हा स्वातंत्र्यानंतर पूर्व बंगाल पाकिस्तानात गेला आणि बाबासाहेब पूर्व बंगालमधूनच निवडून घटना समितीवर आले असल्या कारणाने त्यांचे घटना समितीतले सदस्यत्व रद्द झाले. तेव्हा त्यांच्या सहभागाशिवाय घटनानिर्मितीचे काम होऊ शकत नाही, याची जाणीव कॉंग्रेस नेत्यांना असल्याने, भारताचे प्रंतप्रधान पंडित नेहरू आणि सरदार पटेलांनी गांधीजींशी चर्चा करुन बाबासाहेबांना मुंबई प्रांतातून कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आणले आणि घटना समितीतले त्यांचे सदस्यत्व कायम राखले. इंग्रज असो वा भारतीय नेते, संविधानाच्या संदर्भात दोघांचाही बाबासाहेबांच्या ज्ञानावर, त्यांच्या कर्तृत्वावर ठाम विश्वास होता आणि आज आपण बघतो की, खरोखरच भारताचे संविधान हे भारताला एक राष्ट्र म्हणून अमरत्वाकडे नेणारा जीवनमार्गच ठरत आहे. ते भारताची ‘लाईफलाईन’ होऊन गेले आहे. भारताची नैतिक आणि भौतिक दोन्ही स्तरांवरील प्रगती केवळ संविधानाने आखून दिलेल्या मार्गानेच होऊ शकते. त्यामुळे संविधानाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अतीव श्रद्धा आणि अभिमान असणे अत्यंत स्वाभाविक आहे आणि तो असायलाच हवा. पण, शंका अशी आहे की, आपल्यापैकी कितीजण संविधान साक्षर असतात? सर्वसामान्य माणूस सोडाच, पण अनेक वकिलांनासुद्धा संविधानाबद्दल फारशी माहिती नसते, हे वास्तव आहे आणि ते स्वाभाविक आहे. कारण, संविधानाचा जास्तीत जास्त संबंध हा फक्त उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातच येतो. पण आपल्या संविधानाचे वैशिष्ट्य असे की, भारतीय संविधानाची मूळ रचना इतकी स्वयंपूर्ण आहे की, आपला संपूर्ण देश स्वयंचलित मोडवर आहे की काय, असे अनेक वेळा वाटून जाते. ‘‘रोजच्या जीवनात संविधानाबद्दल माहिती नसल्याने काय फरक पडतो?’’ असं म्हणणारेही अनेकजण आहेत आणि खरं सांगायचं तर इथेच आपण चुकतो. ‘अज्ञानात सुख असतं,‘ या म्हणीप्रमाणे आपली अवस्था आहे. कारण, संविधान माहीत नसल्याने आपले काही अडत नाही, हा आपला केवळ एक भ्रम आहे आणि हे आपल्याला तेव्हा कळते, जेव्हा आपल्याला ‘संविधान काय आहे‘ हे माहीत होते. जेव्हा आपल्याला शोध लागतो की किती ज्ञानरत्ने आपल्या संविधानात दडलेली आहेत, तेव्हा संविधानाची ताकद आपल्याला कळते. जेव्हा आपल्याला हे कळते की, संविधानाने हजारो वर्षांपासून चालत आलेली जातीयता, अस्पृश्यता, मुळापासून उखडून टाकण्याचे काम एका क्षणात करुन दाखवले, तेव्हा संविधानाच्या भव्यतेचा, व्यापकतेचा परिचय येतो. भिन्न परंपरा, भिन्न विचारधारा असणार्‍या अनेक संस्थानांचा एक अखंड लोकशाहीयुक्त भारत देश निर्माण करण्याची रक्तविहीन क्रांती फक्त भारतीय संविधानानेच करुन दाखवली आणि हे करत असताना ब्रिटिश वसाहतवादाच्या पायाभूत तत्त्वांची नाळदेखील कायम राखली. आपले संविधान एक अत्यंत परिपूर्ण, आणि प्रचंड सामर्थ्य असलेला राष्ट्रग्रंथ आहे. असे असले तरी त्याचा वापर किती परिणामकारक होऊ शकतो हे, तो वापर करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तीला, घटनेच्या सामर्थ्यात किती प्राण आहे, किती समज आहे, यावर अवलंबून असते आणि जर सर्वसामान्य नागरिकही संविधान साक्षर असतील, तर मग संविधानाची ताकद शंभर पटींनी वाढेल. जर आपण टी. एन. शेषन मुख्य निवडणूक आयुक्त होण्यापूर्वीच्या निवडणुका आणि नंतरच्या निवडणुका यांच्यातल्या फरकाचा अभ्यास केला, तर हा क्रांतिकारी बदल निश्चितच लक्षात येईल.
 
 
आजचा तरुण हा उद्याच्या भारताचा चेहरा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिशांनी तयार केलेला आणि फक्त कारकून बनवणारा अभ्यासक्रमच आपण स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे आपल्या शाळांमधून शिकवत गेलो आणि संपूर्ण देशाला वाढत्या बेरोजगारीच्या रुपाने त्याचे परिणाम भोगावे लागले. पण, संविधानाने मात्र पहिल्या दिवसापासूनच व्यवसाय स्वातंत्र्य देऊन, प्रत्येकाला व्यवसाय करण्याच्या समान संधी उपलब्ध करुन दिल्या होत्या. कौशल्य विकास योजनेसारख्या व्यवसायाभिमुख शिक्षणानेच आपण संविधानाच्या ताकदीचे खरे दर्शन जनतेला करुन देऊ शकतो, हे आपल्याला फार उशिरा कळले. गेल्या काही वर्षांपासून आपण मूल्याधिष्ठित अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात केली आहे. त्यामागचा उद्देशही हाच आहे की, भारताचे भविष्य असणार्‍या या मुलांना असे शिक्षण मिळावे, त्यांच्यात अशी सारी मूल्ये रुजवावीत, जी फक्त रुक्ष, व्यावसायिक भावना असणारे, पुढारलेले नागरिक बनवण्याऐवजी, प्रेमभावनेने युक्त, देशनिष्ठा, सेवाभाव आणि थोरांचा आदर, अशा उच्च मूल्यांचा अंतर्भाव असलेल्या व्यवसायिक तरुणांनी हा देश भरुन जावा. अनेक शिवाजी, अनेक संभाजी, अनेक शाहू, फुले, आंबेडकर, अनेक टिळक, अनेक सावरकर, या मातीतून फुलावेत. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांचे वारस इथल्या मातीत तयार व्हावेत. त्याबरोबरच रतन टाटा, धीरुभाई अंबानींची स्वप्ने पाहण्याचे धाडसही इथल्या तरुणांमध्ये आपसूकच यावे. भारत एक प्रजासत्ताक देश असल्याने, देशाच्या नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून राष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि देश चालवण्यासाठी जी मूल्ये भारतीय नागरिकांमध्ये असणे अपेक्षित आहे, ती सर्व मूल्ये रुजवण्याची ताकद आणि त्या ताकदीची व्यक्तिमत्वे तयार करण्याची गुणवत्ता फक्त एकट्या संविधानात आहे, याची आपल्याला जाणीव असायला हवी. या अशा काही गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर प्रत्येक भारतीय नागरिकाला माहीत असायलाच हव्यात.
 
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक राज्य आहे. आपल्या संविधानाने फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून, भारतीय नागरिकांस, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, तसेच आचार, विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन दिलेले आहे. याची जाणीव जर प्रत्येक नागरिकाला झाली, तर घटनाकारांना अपेक्षित समाजमूल्ये भारतीय नागरिकांमध्ये रुजण्यास आणि वाढण्यास मदत होईल. पण, आपल्या देशबांधवांसाठी प्रत्येकाच्या मनात एक प्रकारची सन्मानाची आणि बंधुत्वाची भावना वाढीस लागेल. आजची परिस्थिती लक्षात घेता, हे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्राची एकात्मता व बंधुता प्रवर्धित होण्यासाठी आपले संविधान काय आहे, हे माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. चिकाटी, संयम, यांना एकत्र जोडून ठेवण्यासाठी राष्ट्रनिष्ठा कशी काम करते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीसाठी केलेल्या आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आणि म्हणूनच, संविधान निर्मितीचा इतिहाससुद्धा आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठीच ’संविधान अभ्यास वर्ग’ एक चळवळ व्हावी असे मला व माझ्यासारख्या अनेक राष्ट्रभक्तांना वाटते. त्यातूनच ‘सामाजिक समरसता मंचाने‘ संविधान अभ्यास मंडळाच्या अंतर्गत ‘संविधान अभ्यास वर्गा’ची कल्पना प्रत्यक्षात आणली आणि गेली वर्षभर ‘स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन, पुणे,‘ येथे ‘संविधान अभ्यास वर्गात’ भारतीय संविधानाची सर्वांगीण माहिती देणारी व्याख्यानमाला, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी अखंड चालवली, त्याचा लाभ पुण्यातील अनेक विचारवंत, वकील, न्यायाधीश, कायद्याचे विद्यार्थी, आम्ही सर्व कार्यकर्ते आणि अनेक सामान्य नागरिकांना झाला. या अभ्यास वर्गाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून, अशा अनेक कार्यशाळा देशाच्या कानाकोपर्‍यात व्हाव्यात, अशी भावना अनेक नागरिकांनी आम्हाला बोलून दाखवली. तोच धागा पकडून हा उपक्रम सर्वदूर जावा, या उदात्त हेतूने ‘सामाजिक समरसता मंचा’तर्फे संविधान अभ्यास वर्गांचे आयोजन करण्यात येते. तेव्हा, संविधानाप्रती जनजागृती आणि संविधानाप्रती असलेली निष्ठा दृढ व्हावी, हीच यामागची आम्हा सर्व कार्यकर्त्यांची खरी तळमळ आहे.
 
आज पुण्यात ‘भारतीय संविधान गौरव’ सोहळा
‘सामाजिक समरसता मंचा‘तर्फे आज, गुरुवार दि. १२ एप्रिल रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे ‘भारतीय संविधान गौरव‘ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारत सरकारचे कायदा व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर कर्मवीर भिकूजी तथा दादा इदाते हे अध्यक्षीय मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्ताने ‘सामाजिक समरसता मंचा‘तर्फे संविधान अभ्यास वर्गात झालेल्या व्याख्यानांवर आधारित ‘भारतीय संविधान गौरव‘ या पुस्तकाचे प्रकाशन रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते होणार आहे.
 
 
 
 
- काशीनाथ पवार 
 
@@AUTHORINFO_V1@@