समर्थ रामदासांची ध्येयनिश्चिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |
 

 
 
संत रामदास स्वामींचे चरित्र ढोबळमानाने सर्व मराठी घरांतून माहीत असते. रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर. स्वतःच्या लग्नसमारंभातून पुरोहितांनी ‘सावधान’ म्हणताच रामदास पळाले. त्यावेळी रामदासांचे म्हणजेच नारायणाचे वय अकरा वर्षांचे होते. त्यांच्या या कृतीवर, तसेच इतर अनेक बाबतीत आक्षेप घेण्यात आले. त्यावरून आरोपांचे निराकरण यथावकाश पुढील लेखांतून होईल. रामदासांचे बालपणीचे चरित्र अवलोकन करीत असताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे, रामदासांची ध्येयनिश्चिती, जी त्यांच्या बालवयातच झाली असावी. त्यांच्या लहान वयातच असा एक चमत्कारिक प्रसंग घडला की, त्यामुळे ठोसर घराणेच उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. अशा प्रसंगाला रामदासांना फार लहान वयात सामोरे जावे लागले. या प्रसंगाचा उल्लेख श. दा. पेंडसे यांनी लिहिलेल्या समर्थ चरित्रात आला आहे. हा प्रसंग, ही घटना समर्थशिष्य दिनकर गोसावी यांनी लिहिलेल्या ‘स्वानुभव दिनकर’ या समर्थचरित्रग्रंथात सविस्तरपणे निवेदन केली आहे.
 
हे घडले त्यावेळी रामदासांचे, म्हणजेच त्या काळातील नारायणाचे वय सात-आठ वर्षांचे असावे. खावे, प्यावे, सवंगड्यांबरोबर खेळावे असे मजेचे दिवस चालले होते. त्यांचे वडील सूर्याजीपंत आणि बंधू गंगाधरपंत हे जांब गाव व त्याच्या आसपासचे कुलकर्णीपण सांभाळीत होते. असे म्हणतात की, रामदासांच्या पूर्वजांनीच हे ’जांब’ गाव वसवले होते. छोट्या छोट्या वस्त्या एकत्र आणून, रामदासांच्या पूर्वजांनी त्या कुटुंबांना शेती व व्यवसायास लावून दिले. ही कुटुंबे ’जांब’ गावी व आसपास स्थिरावली. साहजिकच त्या गावांचे कुलकर्णीपण ठोसर घराण्याकडे आले. एक दिवस सूर्याजीपंत व गंगाधरपंत घरी नसताना, दूतवेषाने कोणीतरी ठोसरांचे घर शोधत आला. त्याने नारायणाला दरडावून विचारले, ‘‘सूर्याजीपंत कोठे आहेत?’’ वडील आणि बंधू कोणीच घरी नसल्याने, नारायणाने तसे सांगितले. त्यामुळे चिडून त्याने नारायणाला धक्के मारीत, फरफटत गावाबाहेर नेले. या सर्व प्रकाराने नारायण अतिशय घाबरला होता. गावाबाहेर एका शिबिकेत स्त्री-पुरुषाची जोडी बसली होती. ते उत्तर हिंदुस्थानी हिंदी भाषेत बोलत होते. त्यातील पुरुषाने नारायणाला जवळ बोलावले आणि त्याच्या हिंदीत दरडावून विचारले, ‘‘तुझा बाप कोठे आहे ते बर्‍या बोलाने सांग!’’ घाबरलेल्या, गांगरलेल्या त्या सात-आठ वर्षांच्या नारायणाला काही सुचत नव्हते. तो काही बोलत नाही हे पाहिल्यावर त्या शिबिकेतील माणसाने नारायणाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एक पत्र त्याच्या हातात कोंबले. त्या अनपेक्षित प्रसंगाने नारायणाची स्थिती पालटली. तो थरथर कापू लागला, त्याची बोबडी वळली, त्याला घाम फुटला. रडावे, बोलावे अशी भ्रमिष्टासारखी त्याची स्थिती झाली. हातातील कागद तसाच पकडून तो विमनस्क अवस्थेत गावाबाहेरच भटकत राहिला. गावाचा रस्ता त्याला सापडेना. अशा स्थितीत असताना त्याला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. रामाने महावाक्य उपदेशून व एक बाण हातात देऊन नारायणाला मारुतीच्या स्वाधीन केले आणि नारायणाच्या रक्षणाची जबाबदारी मारुतीवर टाकली. या सर्व दृश्याने नारायण अवाक् झाला होता. त्याला काही सुचत नव्हते.
 
दिनकर गोसावी यांनी ‘स्वानुभव दिनकर’ ग्रंथात लिहिले आहे की, ‘नारायणासी पडिले अंधारे| वाचा सावध होऊनी एक संवस्तरे| नीज समाधी तटस्थ।।’ नारायण घरी आला नाही म्हणून त्याचा शोध सुरु झाला. नारायणाचा शोध घेऊन, त्याला घरी आणण्यात आले. त्याच्या हातातील पत्र काढून वाचल्यावर सूर्याजीपंत बेशुद्ध झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. नारायणाचे वडीलबंधू गंगाधरपंत यांनी कुलकर्णीपण सोडून दिले. नारायणाची वाचा स्तब्ध झाली होती. त्याचे हे मौन किंवा ही अवाक् अवस्था वर्षभराने सुटल्याचे दिनकर गोसाव्यांनी म्हटले आहे. एकंदरीत पाहता कुलकर्णीपणाच्या कामावरून सूर्याजीपंतांवर व ठोसर घराण्यावर अस्मानी-सुलतानी ओढवली होती. जुलमी राजसत्तेचे धागेदोरे या कथेतून सहजपणे उलगडता येतात. बालपणी घडलेल्या घटनेने नारायणाच्या बालमनावर मोठा आघात झाला होता. नारायणाच्या अंतर्मनाने त्याचवेळी ठरवून टाकले की, आपण आजन्म ब्रह्मचारी राहून रामाची भक्ती करायची आणि हनुमंतांचे साहाय्य घेऊन, या जुलमी सुलतानशाहीचा नाश करायचा. हेच या पुढे आपले जीवित कार्य राहील. राम व मारुतीच्या भक्तीचा प्रसार करून, लोकजागृती करण्याची ध्येयनिश्चिती त्यावेळी झाली. राम आणि मारुतीच्या साक्षात्काराचा भाग त्यांना प्रेरक ठरला. या जुलमी सत्तेला राम आणि हनुमानभक्तीच्या साहाय्याने हादरा देण्याचा मनोमन निश्चय झाला. याचा उपयोग पुढील आयुष्यात रामदासांना कसा झाला तो इतिहास सर्वांना माहीत आहे.
 
असे असले तरी रामदास मुळात संत आहेत. इकडे धर्मरक्षणार्थ आणि स्वाभिमानरक्षणार्थ स्वातंत्र्य संपादनाचे ध्येय लोकांसमोर ठेवून, शिवाजी महाराजांच्या प्रभावी नेतृत्वाने अलौकिक धैर्य दाखवून, मराठ्यांच्या राजकीय आकांक्षांना साकार करण्याचे महान कार्य केले. या आकांक्षांना रामदासांनी ‘दासबोध’ ग्रंथरुपाने व काही स्फुट प्रकरणे लिहून प्रभावी तत्त्वज्ञान मिळवून दिले. संघटनाचातुर्य, राष्ट्रधर्म, क्षात्रधर्माचे उद्दीपन अशा क्रांतिकारक विचारांमुळे व रामदासांच्या राजकीय सहभागामुळे वारकरी संप्रदाय रामदासांना संत मानायला हात आखडता घेतो. परंतु, हिंदू धर्माच्या पडत्या काळात रामदासांनी महाराष्ट्रातील हिंदू धर्माला महाराष्ट्र धर्माची दिशा दाखवण्याचे कार्य केले, हे नाकारता येत नाही.
 
 
 
 
- सुरेश जाखडी 
@@AUTHORINFO_V1@@