‘खाविआ’ फुटू नये म्हणून चाललीय ‘तहा’साठी धडपड?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |

सभागृहात भाजपला विरोध, निवडणूक दिसताच युतीचा प्रस्ताव

जळगाव :
महापालिकेच्या सभागृहात वर्षानुवर्षे भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यायची आणि आता सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर दिसू लागताच युतीचे ‘तुणतुणे’ वाजवायचे. हा प्रकार म्हणजे खाविआच्या नेत्यांची युध्दापूर्वीच तहासाठी चालविलेली धडपड समजावी का? राज्यात भाजपचे मजबूत झालेले स्थान लक्षात घेता निवडणुकीपूर्वी खाविआ फुटून मातब्बरांनी भाजपचा रस्ता धरू नये यासाठी ही ‘बचावात्मक’ खेळी आहे का? असा रोखठोक प्रश्‍न भाजपमधील कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
 
 
खाविआच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपसोबत युती करण्याचा विचार बोलून दाखविला आहे. परंतु या प्रस्तावास भाजपच्या कार्यकर्त्यांचा प्रखर विरोध आहे. युती कशासाठी करायची? असा त्यांचा पहिला प्रश्‍न आहे. खाविआने कधीही भाजपला सहाय्यभूत भूमिका घेतली नाही. कायम विरोधात काम केले. भाजप नगरसेवकांच्या प्रभागात कामे होणार नाहीत याकडेच लक्ष दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विकासकामांसाठी २५ कोटी रुपये दिले. यातून कामे सुचविण्यासाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती व सभागृह नेता यांची समिती नेमण्यात आली होती. पोल शिफ्टिंग, दुभाजक, वाढीव भागात गटारी ही कामे करणे अत्यावश्यकच होते. पण त्यासाठी खाविआने स्वतःची टिमकी वाजवून घेऊ नये. भाजपच्या नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डात सुचविलेली किती कामे समितीने स्वीकारली, असा प्रश्‍न भाजपच्या एका नगरसेवकाने उपस्थित केला.
 
 
गेली साडेचार वर्ष जळगाव शहरात भाजपच्या मार्गात आडकाठी घालण्याचे काम खाविआने केले. पण भाजपने आपली स्थिती मजबूत केली आहे. शहराचा विकास कुणामुळे रखडला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशात पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या वास्तवाने खाविआचे नगरसेवक कमालीचे धास्तावले आहेत. भाजप बूथ रचनेच्या जोरावर महापालिका काबीज करण्याच्या तयारीला लागला आहे. खाविआचे मातब्बर नेते भाजपच्या संपर्कात आहेत. ते फुटू नयेत याची भीती खाविआच्या नेत्यांना सतावत असावी आणि यातूनच त्यांनी युतीचा प्रस्ताव दिला असावा, अशी शक्यता एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.
 
 
खाविआला स्वबळावर सत्ता मिळण्याची शाश्‍वती नाही. त्यांना भाजप, मनसे किंवा राष्ट्रवादी यापैकी एकाची सोबत लागणार असल्याचे दस्तुरखुद्द सभागृह नेते नितीन लढ्ढांनी मान्य केले आहे. याउलट भाजपचे कार्यकर्ते स्वबळावर लढण्यावर ठाम आहेत. यामुळेच खाविआचे धाबे दणाणले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही हा कार्यकर्ता म्हणाला. खाविआच्या नेत्यांना भाजपशी संघर्ष करणे भविष्यात अडचणीचे ठरू शकते. हे सत्य उमगले असावे. म्हणून आता त्यांची ‘युती’साठी शेवटची धडपड चालली असल्याचा दावा एका लोकप्रतिनिधीने केला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@