Tech भारत : ब्लूटूथ हिअरिंग एड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018   
Total Views |




ब्लूटूथ हिअरिंग एड (ब्लूटूथ श्रवण सहाय्यक)
 
मित्रांनो दर आठवड्याला तंत्रज्ञानाबाबत नवनवीन माहितीच्या स्वरुपात आपली भेट होत आहेच, सोबत आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया फोन तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिळाल्यानंतर फार आनंद वाटतो, त्याचबरोबर नवीन लिहिण्याची प्रेरणा देखील मिळत असते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत या आठवड्यात आपण जाणून घेणार आहोत ब्लू-टूथ श्रवण सहाय्यक अर्थात ब्लू-टूथ हिअरिंग एडबद्दल. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर म्हणजे काय असतो हे आपल्याला ब्लू-टूथ हिअरिंग एडच्या माध्यमातून लक्षात येईल.
तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून समाजातील एखाद्या घटकाच्या समस्येवर काढलेला तोडगा म्हणजेच ब्लू-टूथ हिअरिंग एड. ज्या लोकांना कमी ऐकू येण्याचा आजार आहे अशांसाठी ब्लू-टूथ हिअरिंग एड हे उपकरण तयार केले गेले आहे. श्रवण यंत्राला ब्लू-टूथची जोड दिल्यामुळे कृत्रिम श्रवण पद्धतीत क्रांतिकारक परिणाम घडू शकला आहे. हिअरिंग एड उपकरण अशा सर्वांसाठी जणू वरदान ठरले आहे.
 
 
ब्लू-टूथ तंत्रज्ञानाबद्दल

ब्लू-टूथ तंत्रज्ञानाबद्दल आपण सर्वजण परिचित आहात. जवळपास सर्व मोबाईल फोन युजर्स ब्लू-टूथ तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. दोन इलेक्ट्रोनिक उपकरणांमध्ये संवादाचे माध्यम आहे ब्लू-टूथ. हे एका प्रकारचे वायरलेस तंत्रज्ञान आहे. रेडीओ ध्वनी लहरींमध्ये उच्च फ्रिक्वेन्सी जोडून यामाध्यमातून माहिती आदानप्रदान करता येते. शिवाय यात कुठल्याही सुरक्षिततेची फिकीर नसते. मोबाईल फोन, कम्प्यूटर, टी.व्ही. तसेच इतर उपकरणांना यामाध्यमातून सहज जोडता येते.
 
 
श्रवण सहय्याकात ब्लू-टूथचा वापर

ब्लू-टूथ सारख्या प्रसिद्ध वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर करून ब्लू-टूथ हिअरिंग एड विकसित केले गेले. जुन्या पद्धतीच्या श्रवण सहय्याकात केवळ आसपासचा आवाज ऐकू येण्याची तरतूद होती. मात्र फोन संवाद, मोबाईल, कम्प्यूटर, संगीत यातील नवनवीन उपकरणाद्वारे आवाज ऐकण्याच्या मर्यादा ब्लू-टूथ हिअरिंग एडच्या माध्यमातून संपल्या आहेत. यामाध्यमातून टी.व्ही, स्मार्टफोन, कम्प्यूटर इत्यादी उपकरणातील ध्वनी कॅप्चर करणे सहज शक्य आहे.
 
 
ब्लू-टूथ हिअरिंग एड हे अनेक उपकरणांशी जोडता येऊ शकते. त्याचबरोबर इतर आवाज ऐकू येण्यासाठी मायक्रोफोन देखील उपयुक्त ठरतो. मायक्रोफोनच्या माध्यमातून बाहेरील आवाज यात कॅप्चर होत असतो. अशावेळी खिशाला, शर्टला, किंवा नेकलेसच्या माध्यमातून देखील मायक्रोफोन बाळगण्याची सुविधा आज बाजारपेठेत उपलब्ध आहे. जेव्हा मुंबईसारख्या प्रचंड गर्दी असलेल्या शहरात एखादी अशी व्यक्ती फिरते जिची श्रवण क्षमता कमी आहे, अशावेळी मायक्रोफोन असलेले ब्लू-टूथ हिअरिंग एड सोबत बाळगल्यास अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. अशा वेळेला स्टेशनवरील येणाऱ्या गाडीची अनाउन्समेंट असो अथवा लोकलमधील स्टेशनचे नाव पुकारणारी माहिती असो, अगदी कुणाचीही सहाय्यता न घेता कळण्यासारखी होते. त्याचबरोबर एकाच वेळी स्मार्टफोनला देखील कनेक्ट करता येत असल्यामुळे मोबाईल संभाषण, तथा इतर ऑडीओ सुविधांचा लाभ घेता येईल. थोडक्यात कुणीही दिव्यांग व्यक्ती परावलंबी असणार नाही.
 
 
ब्लू-टूथ हिअरिंग एडबद्दल अनेक शास्त्रज्ञ, तसेच तज्ञ व्यक्तींनी समाधान व्यक्त केले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातून मेडिकल क्षेत्रासाठी तयार केलेले प्रभावी उपकरण म्हणून आज याची ओळख बनली आहे. यामाध्यमातून अनेकांना मुख्यप्रवाहात जोडण्यासाठी मदत मिळू शकली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सशक्त समाज उभा करणे म्हणजे त्यातील कमजोर घटकाला देखील सशक्त करणे हा सिद्धांत ब्लू-टूथ हिअरिंग एडने प्रत्यक्षपणे सिद्ध करून दाखवला आहे.
 
 
- हर्षल कंसारा
@@AUTHORINFO_V1@@