ही संस्कृती कुणी रूजविली ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018
Total Views |


नगरमध्ये जे झाले ते मती गुंग करणारे होते, यात काही शंका नाही. मात्र, राजकीय वर्चस्वासाठी खून करण्याची संस्कृती महाराष्ट्रात कुणी आणली, याच्याही जरा तपशीलात जायला हवे. पद्मसिंह पाटील, कृष्णा देसाई, विठ्ठल चव्हाण असे कितीतरी अनुत्तरित खटले महाराष्ट्राच्या राजकारणात नोंदविलेले आहेत.
‘‘माणूस हा मुळातच राजकीय प्राणी आहे,’’ असे ऍरिस्टॉटलचे प्रसिद्ध वाक्य आहे. यातील ‘माणूस’, ‘प्राणी’ आणि ‘राजकीय’ या तिघांची युती झाली की काय घडू शकते, हे महाराष्ट्राने नगर जिल्ह्यात झालेल्या हत्याकांडातून पाहिले. ज्या मंडळींना अटक झाली आहे त्यात कॉंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीचे लोक आहेत. यात सत्ताधारी भाजपचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांना अटकही झाली आहे. खरे तर सत्तेची म्हणून एक जमात असते. पक्षांतर करण्यात या मंडळींचा हात भटकेही धरू शकत नाहीत. ज्या कुठल्याही पक्षात सत्तेची ऊब मिळेल तिथे जाऊन पोहोचायचे आणि आपला रुबाब कायमराखायचा, असा या मंडळींचा शिरस्ता. यांच्यात सत्तेची पदेही कुटुंबात वाटलेली असतात आणि विवेक शून्य कार्यकर्त्यांची फौज पाठीमागे उभी असते. कोकीळ जशी निरनिराळ्या घरट्यांत आपली पिले घालून पळून जाते, तशी ही मंडळी सगळ्याच पक्षात आपली अंडी घालून ठेवतात. ज्यातून पिले आली ती आपलीच. आता अटक झालेले सगळेच या जमातीतले आहेत. नगरच्या हत्याकांडामुळे महाराष्ट्रात ‘अंधेर नगरी’ वगैरे अवतरल्याचा भास काही लोकांना व्हायला लागला आहे. भास एवढ्यासाठीच की, यापूर्वीचे बरेचसे वास्तव त्यांनी नजरेआड केले आहे किंवा त्यांना ते पाहायचे नाही. राजकीय वैमनस्यातून झालेल्या हत्या महाराष्ट्राला नवीन नाहीत. याचे बीजारोपण महाराष्ट्रात कुणी केले आणि विरोधकांचे खून पाडायची संस्कृती महाराष्ट्रात कुणी रूजविली याच्या जरा तपशीलात जायला हवे.


१९८६ ते १९८८ साली महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपसभापती होते डॉ. पद्मसिंह पाटील. अत्यंत थंडगार नजरेने लोकांकडे पाहाणारे पद्मसिंह पाटील शरद पवारांचे नातेवाईक. रगेल राजकारणासाठी ते ओळखले जायचे. सत्ता घरात नांदत असताना पद्मसिंह पाटलांनी डोक्यात खूळ घेऊन जे केले ते काल परवा नगरला घडले त्यापेक्षा निराळे नव्हते. आपल्याच चुलत भावाच्या खुनाच्या आरोपाखाली पद्मसिंह पाटलांना अटक झाली होती. आपल्या मतदारसंघात घोड्यावर बसून रपेट करणारे पद्मसिंह पाटील तुरुंगात हेडफोन लावून ट्रॅक सूट घालून जॉगिंग करताना मीडियाच्या कॅमेर्‍यात कैद झाले आणि एकच गदारोळ झाला होता. उस्मानाबादच्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा जो काही गवगवा त्यावेळी झाला, तो अनेकांना आजही आठवत असेल. पुढे पद्मसिंह जामिनावर सुटले व अद्याप तो खटला सुरू आहेच. तुरुंगात असताना पद्मसिंहांना अशी वागणूक कुणाच्या जिवावर मिळाली, हे काही वेगळे सांगायला नको. हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी या दोघांना तिकीट देण्याची व त्यांना निवडून आणण्याची किमयाही पवारांनीच घडवून आणली होती. पत्रकार निखील वागळे यांनी पवारांच्या पंच्याहत्तरीनिमित्त मुलाखत घेतली होती. पंच्याहत्तरी निमित्त त्यांनी अशा घाऊक मुलाखती अनेकांना दिल्या होत्या. यावेळी वागळेंनी पवारांना राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर स्मितहास्य करून ‘‘राजकारणात तुम्हाला प्रॅक्टिकल व्हावे लागते आणि परिस्थितीनुसार वागावे लागते,’’ असे उत्तर पवारांनी दिले होते. राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक झाल्यावर आमच्या माणसाला यात गोवण्यात आल्याचा कांगावा आज अजित पवार करीत आहेत. वस्तुत: ही सगळी त्यांचीच माणसे आहे. सात पिढ्यांना पुरून उरेल व नंतर कुजेलसुद्धा इतका पैसा. साखर कारखाने, दूध संघ यांच्या माध्यमातून निर्माण केलेले साम्राज्य आणि मग कुठल्याही राजकीय पक्षाला स्वत:च्या नादाला लावण्याचे कसब हीच या मंडळींची खासियत मानावी लागेल. या असल्या मंडळींनी सध्या भाजपलाही स्वत: च्या नादी लावले आहे.

५ जून १९७० साली परळचे आमदार कृष्णा देसाई यांचा खून झाला. या खुनानंतर सीपीआयच्या गिरणी कामगार युनियनचे परळ इथले कार्यालय जाळून टाकण्यात आले होते. धारदार चाकूने भोसकून कृष्णा देसाईंची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ज्यांना ज्यांना अटक झाली, ते सगळेच शिवसेनेशी संबंधित होते. प्रसिद्ध कायदे तज्ज्ञ राम जेठमलानी यांनी हा खटला लढविला होता. बाळासाहेब ठाकरेंचा यातला प्रत्यक्ष संबंध कुठेही समोर आला नाही. सत्ताधारी कॉंग्रेसला त्यावेळी मुंबईतला डाव्यांचा कामगार चळवळीतला सहभाग त्रासाचा विषय झाला होता. गिरणी कामगारांपेक्षा गिरण्यांच्या जागेचे प्रकरण अधिक महत्त्वाचे होते. त्यामुळे या हत्येकडे अत्यंत काळजीपूर्वक दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. नगरला जे घडले ते संतापजनक आहेच, पण त्याचबरोबर राजकीय बेदरकारपणा म्हणजे काय त्याचेही दर्शन घडविणारे आहे. राष्ट्रवादीच्या आमदाराला यावेळी अटक करण्यात आली आहे, तर भाजपच्या तिकिटावर यावेळी निवडून आलेल्या कर्डिलेंनाही अटक झाली. ती अटक पोलीस अधीक्षक कार्यालयावर केलेल्या हल्ल्यामुळे झाली आहे. शिवसेनेने केलेल्या षड्‌यंत्राचा आपण बळी ठरलो असल्याचा कांगावा आता कर्डिले करीत आहेत. शिवसेना काय आणि राष्ट्रवादी काय, या दोघांचेही हात या प्रकरणात स्वच्छ नाहीत. महाराष्ट्रात एकाच तारखेला निवडणुका घेतल्या जातात. टप्प्या-टप्प्यातून मतदान घेतले जात नाही, कारण कायदा-सुव्यवस्था उत्तमअसते. बिहार, उत्तर प्रदेशात जे घडते ते इथे घडत नाही, असा एक समज तरी आहे. आता जे काही झाले आहे. त्यामुळे नगर दहशतीखाली आहेच, पण त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रही सुन्न झाला आहे. या असल्या राजकारणामुळे महाराष्ट्र कुठे जाईल. हीच सर्वांसमोरची चिंता आहे. कायदा-सुव्यवस्था वगैरे ठीक आहे, पण जोपर्यंत अशी मंडळी निवडून येणार तोपर्यंत राजकारण सुधारण्याची शक्यता कमी आहे. एकाच राजकीय पक्षाने इतकी वर्षे केलेले राज्य त्यातून निर्माण झालेली ही गणिते बदलायला वेळ लागेल हे खरे, पण त्याने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत प्रतिमेचा बळी घेऊ नये एवढेच!


@@AUTHORINFO_V1@@