मार्कचा माफीनामा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018   
Total Views |

''Behind every success there is crime.'' अर्थात, प्रत्येक यशामागे काही गुन्हा असतो, असे म्हटले जाते. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग हाही याला अपवाद नाही. नुकतीच ‘केंब्रिज ऍनालिटिका’ प्रकरणी अमेरिका सिनेटसमोर त्याला माफी मागावी लागली. मुळात फेसबुकची सुरुवात मार्कनेही लांड्या लबाड्या करून केली आहे. झुकेरबर्गच्या तीन मित्रांनी त्याला फेसबुकची संकल्पना सांगितली. पुढे मार्कने या तिघांच्या अपरोक्ष या संकल्पनेवर आधारित वेबसाईट सुरू केली. फार उशिरा या तिघांना कळल्यावर त्यांनी कायदेशीर कारवाई केली आणि या तिघांना भरपाई देऊन हा वाद मार्कने मिटवला. आताही मार्कने फेसबुक वापरकर्त्यांची माहिती ‘केंब्रिज ऍनालिटिका’ या त्रयस्थ संस्थेला विकून पैसा कमावला. यात ‘केंब्रिज ऍनालिटिका’ ही मूळची ब्रिटनची आणि ही संस्था ट्रम्प यांच्या प्रचारात होती. यांनी ही माहिती वापरून २०१६ साली झालेल्या अमेरिकन निवडणुकीत जनमत प्रभावित केले. खरंतर हा प्रश्न जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत घडला. अमेरिकेत अशी माहिती फोडण्याची परंपराच आहे की काय, अशी शंका येते. त्यात काही देशाच्या हितासाठीही असतात यात शंका नाही. शीतयुद्धाच्या काळात ’व्हिएतनामपेपर’ म्हणून व्हिएतनामयुद्धातील माहिती फोडण्यात आली. नंतर वॉटरगेट प्रकरणातही तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी लोकांचे संभाषण रेकॉर्ड केले गेले, मोठ्या प्रमाणात हेरगिरी केली गेली. हे प्रकरणही ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने बाहेर आणले आणि राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना राजीनामाही द्यावा लागला. ‘विकीलिक्स’च्या स्नोडेनची कथाही फार वेगळी नाही. अमेरिकेच्या ‘सीआयए’सारख्या संस्थेत कामकरून त्यानेही तिथली माहिती फोडली आणि त्याला मायदेशाला पारखे व्हावे लागले. सध्या तो रशियात आश्रित आहे.

मार्कच्या या पराक्रमामुळे अमेरिकन सिनेटसमोर त्याला माफी मागावी लागली. माफीनाम्यात मार्क म्हणतो की, ’’या प्रकरणात सगळी चूक माझी असून मी माफी मागतो. फेसबुक मी सुरू केलं होतं, मीच ते चालवतो आणि या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी माझी आहे.’’ ही चूक तशी गंभीर म्हणायला हवी. त्याचे कारण बर्‍याच जणांना वाटत असेल की, फेसबुकची माहिती फुटली म्हणजे नेमकं काय झालं? तर फेसबुकवर जो ईमेल आयडी तुम्ही दिलेला असतो, त्यावरून तुमच्या सवयी, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या, त्याची माहिती आणि तुमचे आर्थिक व्यवहार गुगलच्या आयडीवर तुमच्या डेबिट कार्डची माहिती बर्‍याच वेळेला समाविष्ट असते. ही माहिती त्रयस्थ व्यक्तींच्या हाती लागली तर तुम्हाला आर्थिक फटकाही बसू शकतो. पण, असे काही या प्रकरणात आढळून आले नाही. ही चूक तर झाली आहे. याचे प्रायश्चित्त म्हणून मार्कने आता खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्याने ’एआय’ नावाचे टूल विकसित केले आहे. त्या टूलमुळे जी खोटी अकाऊंट आहेत ती ओळखून ते डिलीट केली जातील. तसेच ज्या काही राजकीय जाहिराती असतील आणि मोठ्या फेसबुक पेजचे ऍडमिन म्हणजेच त्यांचे चालक यांची शहानिशा केली जाईल. ज्या काही जाहिराती फेसबुकवर प्रसिद्ध होतील त्यासाठी ‘ऍड ट्रान्सपरन्सी’ टूल सुरू करून जाहिरातींचीही शहानिशा करण्यात येईल. याशिवाय एक स्वतंत्र निवडणूक संशोधन आयोगाची स्थापना केली जाईल. ही संस्था लोकशाहीमधील समाजमाध्यमांची भूमिका काय असेल यावर संशोधन करेल. हे करण्यामागे मार्कची दोन उद्दिष्टे आहेत. एक म्हणजे ‘केंब्रिज ऍनालिटिका’सारख्या समस्यांत जाणकार आणि तज्ज्ञांची मदत होईल आणि दुसरी बाब अशी की, फेसबुकच्या माध्यमातून निष्पक्ष निवडणुकींची प्रतिमा त्यांना कायमराखायची आहे. मार्क अमेरिकेतल्या अनेक संस्थांची मदत या कामी घेणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपक्रमराबविले जातील. हे पाऊल उचलण्यामागे मार्कने सांगितले की, पुढील काही वर्षांत अमेरिका, नेपाळ, भारतासारख्या देशांत निवडणुका होतील. त्या निष्पक्ष होण्यासाठी फेसबुक बांधील आहे. तसेच २०१६च्या अमेरिकेन निवडणुकीत जो रशियन हस्तक्षेप झालात्यातील सर्व अकाऊंट डिलीट करण्यात आली आहे. या आठवड्यात मोठ्या प्रमाणात संशयित आणि दोषी रशियन अकाऊंट डिलीट केली जातील, असे आश्वासन मार्कने दिले आहे. खरंतर माहिती चोरीप्रकरणी एकटा मार्क जबाबदार नाही. असे किती ऍप्स आहेत जे आपण कुठलीही खातरजमा न करता सढळ हस्ते डाऊनलोड करतो. आपली बरीच माहिती बिनदिक्कतपणे त्यात समाविष्ट केली जाते. नियम, अटी आपण वाचतच नाही. जर भविष्यकाळात अशी समस्या उद्भवू नये यासाठी आपणही जागरूक असणे गरजेचे आहे.



- तुषार ओव्हाळ
@@AUTHORINFO_V1@@