सांस्कृतिक मार्क्सवाद भाग १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018   
Total Views |




'सांस्कृतिक मार्क्सवाद' हा अगदी असाच आहे. सबव्हर्जनच्या थिअरीत जितक्या नकळतपणे एखादी व्यक्ती सबव्हर्ट होऊन जाते तितक्याच अलगदपणे आपण सांस्कृतिक मार्क्सवादाचा भाग झालेलो असतो आणि हे कळेस्तोवर त्या मार्क्सवादाने त्याचा अपेक्षित परिणाम साधलेला असतो.
 
मागच्या वेळेस 'सबव्हर्जन' ह्या विषयावर एक सविस्तर लेख लिहिला होता. सबव्हर्जनशी निगडित असे काही पैलू त्यानंतर हाती लागत गेले. त्याच संदर्भात एक विषय समोर आला. त्याचं नाव 'कल्चरल मार्कसिझम' अर्थात 'सांस्कृतिक मार्क्सवाद'!

सर्वसाधारणपणे कोणतीही घटना ही आपसूक घडत नसते. त्या त्या घटनेमागे ठराविक असं काही कारण असतं. अगदी त्याचप्रकारे आपल्या समाजात आणि पर्यायाने देशात ज्या काही घटना घडतात त्यामागे काहीना काहीतरी कारण जरूर असतं. मात्र सर्वसामान्य माणूस त्यामागचं कारण शोधायच्या भानगडीत पडत नाही. आपण त्या घटनांचं एक अंग बनून जातो आणि सहजरित्या त्या घटनांच्या मागच्या विचारांचाच एक भाग होऊन जातो.

'सांस्कृतिक मार्क्सवाद' हा अगदी असाच आहे. सबव्हर्जनच्या थिअरीत जितक्या नकळतपणे एखादी व्यक्ती सबव्हर्ट होऊन जाते तितक्याच अलगदपणे आपण सांस्कृतिक मार्क्सवादाचा भाग झालेलो असतो आणि हे कळेस्तोवर त्या मार्क्सवादाने त्याचा अपेक्षित परिणाम साधलेला असतो.

ह्या आणि पुढच्या लेखात सांस्कृतिक मार्क्सवाद काय आहे हे समजून घेऊयात.

नक्की काय आहे हा सांस्कृतिक मार्क्सवाद ? काय आहे त्याचा इतिहास ?


एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मार्क्सवादाचा प्रसार झाला. जगभरातल्या कामगारांनी एकत्र यावं आणि मालकशाहीविरुद्ध लढा द्यावा, अशी मार्क्सवादाची अपेक्षा होती. जिकडे आर्थिकदृष्ट्या उच्च आणि नीच असे दोनच वर्ग होते तिकडे हे मार्क्सवाद रुजला. रशियासारख्या काही देशात मार्क्सवाद पसरला देखील. मात्र युरोपात किंवा जिथे संस्कृतीत मुळं घट्ट रोवली होती आणि जिकडे 'मध्यमवर्ग' ही पायरी अस्तित्वात होती तिथे मार्क्सवाद तग धरू शकला नाही.

जर्मनीच्या फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटीत सामाजिक अभ्यासाच्या नावाखाली मार्क्सवाद्यांनी तळ ठोकला. लयाला लागलेल्या मार्क्सवादाला, कम्युनिझमला तारायचं असेल तर त्याचं रुप बदलायला हवं, हे ह्या लोकांच्या लक्षात आलं आणि त्यानुसार त्यांनी कामाला सुरवात केली. मात्र हिटलरच्या उदयानंतर ह्या लोकांना जर्मनीतून गाशा गुंडाळावा लागला आणि मग त्यांनी अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीत बस्तान बसवलं. ह्या युनिव्हर्सिटीत विभाग चालू करताना कम्युनिझमचा अभ्यास करणारा विभाग हे नाव न देता त्याला ' इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्च' असं गोंडस नाव देण्याची लबाडी त्यांनी केली.

समाजातल्या दोन वर्गांमधला संघर्ष हा मार्क्सवादाचा पाया आहे. मूळ कम्युनिझमध्ये मालक आणि नोकर / कामगार हे दोन वर्ग असतात. पहिल्या महायुद्धात जगातील सर्व कामगारांनी एकत्र येऊन भांडवलशाही विरुद्ध लढा उभारावा, अशी कम्युनिस्टांची मनीषा होती. पण त्यांच्या दुर्दैवाने असं झालं नाही. प्रत्येक देशातला कामगार वर्ग हा आपापल्या देशासाठी सैनिक बनून लढला. अपेक्षित सामाजिक संघर्ष न झाल्यामुळे मार्क्सवाद कुचकामी ठरायला लागला. हे अपयश दिसायला लागल्यावर 'सांस्कृतिक मार्क्सवादा' चा उदय झाला. मालक ह्या वर्गाची जागा बहुसंख्याने घेतली तर नोकर ह्या जागी अल्पसंख्याक आले.

वरकरणी हे कितीही न्याय्य वाटत असलं तरी त्यात कोणाच्याही भल्याची कल्पना कधी नव्हती. समाजात वेगवेगळ्या प्रकारे भिंती उभ्या करणं, त्यांना एकमेकांच्या विरोधात उभं करणं, हीच कल्पना त्यांची होती. दडपशाही करणारे आणि दडपले जाणारे असे सरळ दोन वेगळे गट त्यांनी पाडले.

भिन्नलिंगी, बहुजन, पुरुष ह्यांना सोयीस्कररित्या 'दडपशाही करणारे' ह्या गटात त्यांनी टाकलं गेलं. मग ह्याच्या दुसऱ्या बाजूला असणारे समलिंगी, फेमिनिस्ट, अल्पसंख्यांक ह्यांना 'दडपले जाणारे' ह्या गटात टाकून त्या सर्वांना कायम खोटा पाठिंबा दिला.

कोण आहेत सांस्कृतिक मार्क्सवादाचे उद्गाते ? काय आहेत त्यांचे विचार ?


जर्मनीतून हाकलपट्टी झाल्यावर कम्युनिस्टांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात सामाजिक शास्त्र विभागात आसरा घेतला. त्यातल्या काही जणांचा कामात थेट सहभाग होता तर काहींची वक्रबुद्धी ह्यामागे होती.

अँटोनियो ग्रामशी नावाचा एक इटालियन महाभाग ह्या विचारांचा अग्रणी होता. वेगवेगळ्या संस्थांमधून बदलाचे वारे वाहल्याशिवाय समाजात हवा तो मोठा बदल होणं शक्य नसल्याचं त्याला फार वाटत असे. बदल कोणता तर अर्थातच डाव्यांना हवा तो. विचार हे कधी लोकांच्या ताब्यात नसतात तर लोक हे विचारांच्या ताब्यात असतात, असं त्याचं म्हणणं होतं. संस्कृती ही गतानुगत प्रकारची संकल्पनाच मुळी सत्ता टिकवण्यासाठी उदयाला आलेली आहे, असं त्याने लिहून ठेवलं आहे. थोडक्यात सत्ता बुडवायचा असेल तर संस्कृती बुडवा हा सोपा उपाय त्याने देऊन ठेवला.

थिओडोर आडोर्नो हा एक अजून अग्रणी मनुष्य. कलाक्षेत्रात सांस्कृतिक आणि भांडवलदारांचं वर्चस्व त्याने शोधलं. त्याच्या मते संगीत हेही भांडवलशाहीच्या दावणीला बांधलं गेलं होतं. लोकं तथाकथित चांगल्या संगीताच्या आहारी गेले होते आणि त्यांना त्यातून बाहेर काढायची गरज होती. आडोर्नोच्या आवडत्या संगीताच्या क्लिप्स यु ट्यूब वर आहेत. मी त्या ऐकल्या आहेत, एका वाद्याच्या दुसऱ्याशी मेळ नसलेलं ते संगीत आहे. काहीही अर्थ नाहीये.



आडोर्नोने 'अथोरीटीरियन पर्सनॅलिटी' नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्यात त्याने कुटुंब व्यवस्थेचा अभिमान, पालकत्व, धर्म, भिन्नलिंगी असणं आणि राष्ट्रप्रेम हे सर्व मानसिक आजार आहेत असं म्हंटलं आहे.

हर्बर्ट मारकुज हा एक त्यांच्यातलाच. युरोपात जिथे जिथे डावी चळवळ उभी राहिली, जिथे जिथे निदर्शनं झाली, जिथे जिथे विद्यार्थ्यांच्या चळवळी झाल्या तिथे तिथे हर्बर्ट मारकुज उपस्थित होता. त्या सर्व चळवळींच्या मागचा मास्टर माइंड मारकुझा होता.
तो स्वतः ला ग्रेट रीफ्युजर ऑफ कल्चरल व्हॅल्यूज म्हणून घेत असे.

जॉर्ज लुकास नावाचा एक मनुष्य ह्या चळवळीचा महत्वाचा भाग होता. सामाजिक मान्यता किंवा संस्कृती म्हणून जे काही अस्तित्वात आहे ते उद्ध्वस्त केल्याशिवाय समाज नवीन काहीही स्विकारणार नाही, असं त्याचं स्पष्ट मत होतं.
ओलेन्सकी, फ्रॉम वगैरे नावाची इतरही मंडळी ह्यात होती ज्यांचे विचार फारसे काही वेगळे नव्हतेच.

जगात संस्कृतीपासून तंत्त्वांपर्यंत सर्वकाही नष्ट करायची तातडीची गरज ह्या सर्वांना जाणवली होती आणि त्या सर्वाची सामुदायिक जबाबदारीच त्यांनी जणू स्वतः च्या खांद्यावर घेतली होती.

भारताशी आणि आपल्या समाजाशी ह्या सर्वांचा किती जवळचा संबंध आहे हे उत्तरार्धात बघुयात.

संदर्भ -


आंतरजालावरील विविध संकेतस्थळे आणि यु ट्यूब वरील विविध व्हिडीओज.

(पूर्वार्ध)
- सारंग लेले
@@AUTHORINFO_V1@@