अमितभाईंच्या देशव्यापी दौर्‍याचे फलित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018
Total Views |

भारतीय जनता पक्षाने ६ एप्रिल २०१८ रोजी पक्षाचा ३८ वा वर्धापन दिन साजरा केला. आतापर्यंतच्या सर्वच राष्ट्रीय अध्यक्षांचे पक्षाच्या वाढीत आपापल्या पद्धतीने योगदान राहिले आहे. विद्यमान अध्यक्ष अमितभाई शाह यांचा कार्यकाळ म्हणजे पक्षाच्या इतिहासातील सुवर्णकाळ आहे. भाजप जगातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष झालेला असताना २२ राज्यांत सरकार स्थापन करणारा हा पक्ष पक्षाची चौफेर वाढ होत असताना पक्षासाठी, पक्षवाढीचा दिवसरात्र ध्यास घेतलेल्या राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शाह यांच्या कार्यपद्धतीला दाद द्यावीच लागेल. त्यांनी नुकताच राष्ट्रव्यापी दौरा केला. नाशिकची युवा कार्यकर्ती पूर्वा लक्ष्मण सावजी हिने अमितभाई शाह यांनी केलेल्या देशव्यापी दौर्‍याचा घेतलेला हा वेध...

सन २०१६-१७ हे वर्ष भाजपने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले. याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशाच्या कानाकोपर्‍यात भाजपला मजबूत करण्यासाठी एप्रिल २०१७ पासून सप्टेंबर २०१७ हा ९५ दिवसांचा देशव्यापी दौरा केला होता. या कार्यक्रमांतर्गत अमित शाह यांनी पार्टीचे बूथ, जिल्हा, मंडल आणि प्रदेश स्तरावरील पदाधिकारी, त्याचबरोबर पक्षाच्या विविध १८ आघाड्या आणि ७ मोर्चे यांच्याशी जोडले गेलेले पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

उत्तर प्रदेशसह देशाच्या अन्य २१ राज्यांमध्ये भाजपप्रणित सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने पूर्व आणि दक्षिण भारताकडे आपला मोर्चा वळविला आहे. आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून भाजपने मोर्चेबांधणीस सुरुवात केलेली दिसत आहे. भारतातील उर्वरित राज्यांमध्ये भाजप आणखी मजबूत करण्यासाठी हा अजेंडा आखण्यात आला. या उपक्रमाचे फलित म्हणजे पक्षाला बूथ स्तरापर्यंत पोहोचता आले आणि कार्यकर्त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेता आल्या. स्वतः अमित शाह यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून हा दौरा केल्यामुळे ठिकठिकाणच्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला. राजकीय इतिहासात असे प्रथमच घडताना दिसून आले. पक्षाच्या अध्यक्षाने बूथ स्तरावर जाऊन संघटनेचे कार्य करणे आणि पक्षाला मजबूत करणे अशा प्रकारचे अभियान हे आत्तापर्यंतचे सगळ्यात मोठे अभियान आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या अभियानात सरकारचे विविध केंद्र आणि राज्यातील कॅॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, पक्षाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, राज्यांचे मुख्यमंत्री या सर्वांचा सहभाग तेवढाच महत्त्वपूर्ण होता.

अमित शाह यांनी पश्चिम बंगालपासून पंडित दीनदयाळ कार्य विस्तारक योजनेचा शुभारंभ २५ एप्रिलपासून केला. आजपर्यंत नक्षलवाद्यांच्या हिंसक आंदोलनाच्या जन्म स्थळाच्या रूपात नक्षलबारी हे क्षेत्र ओळखले जायचे. त्या ठिकाणी अमित शाह यांनी सरकारच्या नीतीनियमांनुसार जनकल्याणासाठीचा लढा सुरू केला. त्याचबरोबर नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ आणि गरिबांच्या कल्याणाचादेखील संदेश या माध्यमातून देण्यात आला. माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी या योजनेंतर्गत १५ दिवसांत पश्चिम बंगाल, तेलंगण, लक्षद्वीप, गुजरात आणि ओडिशा या पाच राज्यांत प्रवास केला.

यानंतर २९, ३० एप्रिल आणि १ मे २०१७ रोजी जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने विस्तारक प्रवास सुरू झाला. त्यांनी जम्मू येथील कार्यालयात नानाजी देशमुख पुस्तकालय म्हणजेच ई-पुस्तकालयाचे उद्घाटन केले. ज्यामुळे कार्यकर्त्यांना पक्षाचा इतिहास, साहित्य यांचा अभ्यास करण्यासाठी मदत होईल आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल. बौद्धिक आणि वैचारिक स्तरावर पक्षाला मजबूत करण्याच्या उद्देशाने ही एक मोठी उपलब्धी आहे. विकासाचं मॉडेल हे सर्वसमावेशक असावं आणि मोदी सरकार याच मॉडेलवर कामकरत आहे. या ठिकाणी अनेक योजनांचा शुभारंभ नरेंद्र मोदींनी केला. राज्यात दोन एम्स, पाच मेडिकल कॉलेजेस त्याचबरोबर ८० हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्यात आले. जन-धन योजनेच्या माध्यमातून २० लाखांहून अधिक लोकांचे बँक अकाऊंट उघडण्यात आले. जम्मू आणि काश्मीरनंतर अमितभाई दि. ३ आणि ४ मे २०१७ ला हिमाचल प्रदेशकडे वळले. या दौर्‍यादरम्यान हिमाचल प्रदेशातील अत्यंत गंभीर आणि मुख्य विषय जाणून घेऊन त्यासाठी तेथील कार्यकर्ते, अधिकारी यांना विशेष सूचना दिल्या व एकजुटीने कामकरण्याचा संदेश देऊन पक्षाला अधिक बळकटी देण्याचे कामराष्ट्रीय अध्यक्षांनी केले.

पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश यानंतर अमित शाह हे त्रिपुराच्या विस्तारक प्रवासाला निघाले ते ६ मे रोजी. तेथे त्यांचा दोन दिवसीय दौरा होता. खरंतर त्रिपुरा हे खूप लहान राज्य आहे, पण तेथे कम्युनिस्टांविरुद्ध निवडणूक लढवणं खूप कठीण होतं. या ठिकाणी आदिवासी, दलित आणि आणखी खालच्या वर्गातील मतदारांना पक्षाबरोबर जोडण्यावर जास्त भर दिला गेला. स्वतः अमित शाह यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सरकारकडून योग्य मदत मिळेल, असे आश्वासन देऊन भाजपशी जोडण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. त्याचबरोबर मोदी सरकारने तेथे केलेले कामआणि भविष्यात होणारी कामं याबद्दल अमित शाह यांनी तेथील लोकांशी संवाद साधला.

त्रिपुरानंतर राज्य होते महाराष्ट्र. अमित शाह महाराष्ट्रात १६, १७ आणि १८ जून या तीन दिवसीय दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये संघटनेबाबत एक नवी उमेद निर्माण केली. महाराष्ट्राप्रती असलेली मोदी सरकारची संवेदनशीलता अधोरेखित करून सामान्य जनतेला एक मजबूत संदेश दिला. राजकीय आणि सामाजिकच नव्हे, तर सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांशी भेटून त्यांच्या मुद्द्यांना ग्राह्य धरून त्यांना यथायोग्य आश्वासनही दिले. यानंतर २६ आणि २७ जूनला अमित शाह पॉंडिचेरीला गेले. या छोट्या केंद्रशासित प्रदेशात संघटनात्मक दृष्टीने अमित शाह यांचा तीन वर्षांतील हा तिसरा दौरा होता. सर्व संघटनात्मक बैठकांमध्ये बूथ स्तरावर पक्षाला मजबूत करण्यावर भर देण्याबरोबरच अमित शाह यांनी अनेक योजनादेखील बनवल्या. ज्यातील प्रमुख योजना ’दीनदयाळ विस्तारक योजना’ आहे. अमित शाह यांनी विस्तारकांना स्वतः प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली. पॉंडिचेरीमधील विश्वविख्यात योगी अरविंद यांच्या आश्रमात जाऊन जगभरातील अरविंदांच्या अनुयायांवर एक चांगला प्रभाव पाडला. पॉंडिचेरीनंतर १ आणि २ जुलैला विस्तारक प्रवास गोव्याकडे वळला. गोव्यामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर प्रदेशाच्या वरिष्ठ नेतृत्वासाठी जनसंपर्काची एक योजना आखण्यात आली. ज्यामुळे गोव्यातील प्रत्येक कानाकोपर्‍यात एका विशिष्ट कार्यक्रमाच्या माध्यमातून विस्तृत जनसंपर्क होईल आणि पक्षाला मजबुती मिळण्यास नक्कीच फायदा होईल. प्रदेश सरकार आणि प्रदेश संघटनेच्या वरिष्ठ प्रतिनिधींबरोबर संवाद साधून सरकार आणि पक्ष यांच्यातील समन्वय त्यांनी अधिक सुदृढ केला. यामुळे सरकारचे कामआणि राबविण्यात येणार्‍या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यास गती मिळाली.

यानंतर अमित शाह यांनी ३ जुलैला ओडिशाकडे प्रयाण केले. हा त्यांचा दौरा चार दिवसांचा होता. भारत सरकारने ओडिशाला २५ वर्षांत जेवढं बजेट दिलं, तेवढं मोदी सरकारने तीन वर्षांत देण्याचे काम येथे केले आहे. या विस्तारक प्रवासादरम्यान अमित शाह यांनी तीन ग्रामीण बूथवर जाऊन विस्तारकाचे दायित्व निभावले. ओडिशानंतर अमित शाह १४ जुलै रोजी राजधानी दिल्ली येथे गेले. तेथे ते म्हणाले की, ’’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने देशाच्या विकासासाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी जवळजवळ १०६ योजनांची सुरुवात केली आहे आणि यात एकही योजना अशी नाही की, जी एका वर्गासाठी बनवली आहे. या सर्व योजना सर्वसमावेशक आहेत. भाजपला मागील पाच विधानसभा निवडणुकांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसल्याने या दोन दिवसीय दौर्‍यात अमित शाह यांनी यावर सूक्ष्मपातळीवर जाऊन विचारमंथन केले. यानंतर त्यांनी भविष्यातली रणनीती आखली, ज्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि प्रत्येक नेता यांच्यासाठी ध्येय निश्चित करून दिले आणि याची एक रूपरेषा बनवली गेली.’’ राजधानी दिल्लीनंतर हा प्रवास २१ जुलै २०१७ ला राजस्थानमध्ये आला. राजस्थानमध्ये पुन्हा सरकार स्थापण्यासाठी विविध मंचावरून अमित शाह कार्यकर्त्यांना आश्वस्त करत होते. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून मिळणार्‍या धनादेशात अडीच पट वाढ झाल्याचे सांगून ते राजस्थानच्या विकासाबद्दल केंद्र सरकारची संवेदनशीलता सतत रेखांकित करत होते. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकार हे दोघंही मिळून देशात आणि प्रदेशात विकासाचे इंजिन म्हणून कामकरत आहेत, असे दिसले. यानंतर होता उत्तर प्रदेशचा दौरा. हा दौरा २९, ३० आणि ३१ जुलै २०१७ असा तीन दिवसीय होता. खरंतर भारतीय जनता पक्ष आधीपासूनच उत्तर प्रदेशवासीयांबरोबर होता, परंतु सपा सरकारच्या निष्क्रियतेमुळे केंद्र सरकारच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत आणि आज योगी सरकार गरीब कल्याण योजना सामान्यांतल्या सामान्य व्यक्तीपर्यंत कशा पोहोचतील यासाठी काम करत आहेत. येथे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात आले. आत्तापर्यंतच्या इतिहासात जवळजवळ ३८ लाख टन गहूची खरेदी करून एक नवीन रेकॉर्ड बनविण्यात सरकारला यश आले. योगी सरकारच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशचा विकास वेगाने करू आणि देशात सर्वोत्तमराज्य उत्तर प्रदेश बनवू, असे आश्वासन अमित शाह यांनी तेथील जनतेला दिले.

अमित शाह यांचा प्रवास २ ऑगस्टला हरियाणाकडे वळला. सुशासन आणि संघटनात्मक विस्तार याबरोबरच अमित शाह यांनी तेथील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अशा सामाजिक आणि भौगोलिक क्षेत्रात अधिक लक्ष देण्यास सांगितले, ज्या ठिकाणी मागील दोन निवडणुकीत फारसे यश मिळाले नव्हते. या प्रवासात पक्षाच्या सामाजिक विस्तारात दलित समाज जोडण्यासाठी बूथ समितीमध्ये कमीत कमी २० दलित जोडण्यावर अमित शाह यांनी भर दिला. हरियाणातील भाजप सरकार फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सरकार नसून हरियाणातील प्रत्येक व्यक्तीचे सरकार आहे. मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली हरियाणातील राजकीय संस्कृती बदलण्याचे कामभाजप सरकारने केले आहे, असे अमित शाह यांनी आपल्या भाषणातून सांगितले. दि. १२, १३ आणि १४ ऑगस्ट रोजी अमित शाह यांचा विस्तारक प्रवास कर्नाटकमध्ये आला. ’’कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकार सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. मोदी सरकारने कर्नाटकच्या विकासासाठी संपुआ सरकारच्या तुलनेत अडीच पट निधी दिला आहे. तरीदेखील कर्नाटकचा हवा तेवढा विकास झालेला नाही.’’ अमित शाह यांच्या या वक्तव्यामुळे येथे स्पष्ट झाले की, भाजप पुढील विधानसभा निवडणूक भ्रष्टाचार आणि कुशासन हे दोन मुख्य मुद्दे बनवून लढणार. या विस्तारक प्रवासात पूर्णवेळ विस्तारक म्हणून असलेल्या कार्यकर्त्यांबरोबरच संसद, विधान परिषद आणि मंडल स्तरावरील पदाधिकार्‍यांना एक निश्चित योजना बनवून दिली आणि त्याप्रमाणे समन्वय राखून कामकरण्यास सांगितले. या संपूर्ण दौर्‍याचा वेध घेतला असता असे लक्षात येते की, आजवरच्या राजकीय इतिहासात जे कोणी केलं नाही ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलं. पक्षाच्या गौरवशाली इतिहासात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कामकेलेल्या अमित शाह यांच्या कार्याची नोंद ठळकपणे सुवर्णाक्षरांनी नोंदवावीच लागेल.


- पूर्वा लक्ष्मण सावजी
@@AUTHORINFO_V1@@