टंचाईस्थितीत टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची आढावा बैठकीत माहिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
 
 
टंचाईस्थितीत टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना
 
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची आढावा बैठकीत माहिती
 
जळगाव, ९ एप्रिल
राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवणार नाही, यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे. तथापि, भविष्यात टंचाईची स्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे सूतोवाच राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
जळगाव जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक सोमवारी जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार ए. टी. नाना पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, माजीमंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, येत्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी संबंधित विभागांनी घ्यावी. त्याचबरोबर शेतकर्‍यांना कृषी विषयक मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक गावात जिल्हा परिषदेतील कृषी विभाग व शासनाच्या कृषी विभागातील एका कर्मचार्‍याचे नाव ग्रामपंचायत कार्यालयात असणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यात कापसाच्या बियाणांची टंचाई तसेच बोगस बियाणांची विक्री होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
 
बोगस बियाणे विक्रेत्यांवर
कठोर कारवाईचे निर्देश
बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी बियाणे निरीक्षकांनी आपल्या परिसरातील दुकानांची तपासणी करावी. तपासणी करताना दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. कारवाई करतांना बोगस विक्रेत्यांना शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरुन बोगस बियाणे विक्रीस आळा बसेल. राज्यात कापसाचे अंबिका देशी वाण विक्रीस परवानगी मिळण्याबाबत लोकप्रतिनिधींनी मागणी केली असता, पालकमंत्र्यांनी बैठकीतूनच कृषिमंत्री पांडुरग फुंडकर यांना दूरध्वनी करून चर्चा केली. तसेच बीटी बियाण्यांपासून स्वदेशी वाण वेगळे करण्याबाबत कृषिमंत्री व कृषी विभागाच्या प्रधान सचिवांशी तात्काळ चर्चा करणार असल्याचे बैठकीत सांगितले.
 
 
८० गावांमध्ये
४४ टँकर सुरू
जिल्ह्यात चालूवर्षी पीक कर्जासाठी ११०० कोटी रुपयांची मागणी आहे. त्यापैकी ५८५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती सहकार विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. तसेच जिल्ह्यात सद्यपरिस्थतीमध्ये ८० गावांमध्ये ४४ टँकर सुरु असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.
 
जिल्ह्यात १२ लाख मेट्रीक टन धान्य उत्पादन अपेक्षित 
तभा वृत्तसेवा
जळगाव, ९ एप्रिल
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ८ लाख ३४ हजार ४५० हेक्टर क्षेत्र इतका पेरणी लक्षांक ठेवण्यात आला आहे. यामध्ये तृणधान्य १९०५२० हेक्टर, कडधान्य ११३५२० हेक्टर, गळीतधान्य ३५८६० हेक्टर, कापूस ४८३००० हेक्टर, तर ऊस पिकाचे ११५५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्षांक आहे. या माध्यमातून जिल्ह्यात १२ लाख २१ हजार ४४७ मेट्रीक टन उत्पादनाचा लक्षांक आहे.
महाबीजकडून ६०२५ क्विंटल, राष्ट्रीय बीज निगमकडून ११०० क्विंटल, खाजगी कंपन्यांकडून ३९६१९ क्विंटल बीयाणे उपलब्ध होणार आहे. तसेच कापूस पिकासाठी २३ लाख १६ हजार १४५ पाकीट बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. ३ लाख ४० हजार मे. टन खतांची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
यावेळी आमदार स्मिता वाघ, आमदार संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, किशोर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@