होमिओपॅथीचे वैशिष्ट्य, ‘आजाराचे समूळ उच्चाटन!’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
होमिओपॅथी ही उपचार पध्दती पूर्णपणे नैसर्गिक तत्त्वावर आधारित असून, यात कोणत्याही रुग्णावर उपचार करताना आजाराचे मूळ कारण लक्षात घेऊन व रुग्णाच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून नंतरच औषधयोजना केली जाते. त्यामुळे आजाराचे समूळ उच्चाटन होण्यास मदत होते.
 
 
आज १० एप्रिल, जागतिक होमिओपॅथी दिन. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. होमिओपॅथी ही अत्यंत लोकप्रिय उपचारपद्धती म्हणून ओळखली जाते. सध्या जगभरात ५० कोटी नागरिक या उपचार पद्धतीचा लाभ घेत आहेत. ऍलोपॅथीनंतर होमिओपॅथीचा वापर जगात सर्वत्र होत असल्याचा अभिप्राय जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
 
 
वैद्यकशास्त्रात अस्तित्त्वात असलेल्या उपचार पद्धतींपैकी आधुनिक आणि प्रभावी अशा होमिओपॅथीचा शोध डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी लावला. त्यांनी होमिओपॅथीमधील औषधांचा स्वत:वर आणि इतरांवर प्रयोग करून त्यामुळे होणारा परिणाम अभ्यासला आणि निष्कर्ष काढला की, ‘निरोगी माणसात आजाराप्रमाणे लक्षणे निर्माण करणारी औषधे दिल्यास ती आजार बरा करू शकतात’. सहा वर्षांच्या संशोधनानंतर डॉ. हॅनिमन यांनी होमिओपॅथी चिकित्सा पद्धती आणि त्याचे तत्त्वज्ञान जगासमोर मांडले. होमिओपॅथीच्या गुणकारी औषधामुळे रुग्ण बरे होऊ लागले. त्यामुळे या पॅथीचा प्रचार व प्रसार होऊ लागला. 
 
 
 
होमिओपॅथीमुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते, आजार आपोआप समूळ नष्ट होतो. यात औषध निवडताना सर्वप्रथम रुग्णाची वैयक्तिक माहिती घेतली जाते. यात रुग्णाची शारीरिक व मानसिक लक्षणे, विचार, सवयी, आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना व या घटनांचा रुग्णाच्या मनावर कोणकोणत्या स्वरुपात परिणाम झाला व रुग्ण घटनेचा कसा विचार करतो यासारखी बरीच लक्षणे विचारात घेतली जातात. होमिओपॅथी ही खूप लवकर आणि कमी वेळात रुग्णाला बरी करणारी उपचार पद्धती आहे. बरे होण्यास लागणारा वेळ हा त्या आजारावर अवलंबून आहे. (उदा. थंडी, ताप, जुलाब, पोटदुखी अशा अवस्थेत होमिओपॅथीने थोड्याच वेळात आजार संपूर्णपणे घालविता येतो. परंतु आजार जुना झाल्यावर अथवा आजाराचा  गुंता वाढल्यावर  रुग्ण आल्यास हा गुंता सोडविण्यास थोडा वेळ लागतो.) होमिओपॅथीने आज अनेक शस्त्रक्रिया करावे लागणारे आजार कोणतीही शस्त्रक्रिया न करता बरे केले जातात. या उपचार पद्धतीत अगदी लहान बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वांना सर्व आजारांवर औषध घेण्यास सोपे आहे. आज सर्दी, खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत आजार असलेले रुग्ण होमिओपॅथी उपचार घेत आहेत. केवळ रोग बरा करायचा नसून रुग्णाला बरे करायचे हे होमिओपॅथीचे मूलभूत तत्त्व आहे. होमिओपॅथीचे औषध सुरू केल्यानंतर रुग्णाला उत्साही व ताजेतवाने वाटते का, याचाही विचार केला जातो.
 
 
होमिओपॅथीबद्दल गैरसमजही आहेत. यात जुनाट आजारच बरे होतात किंवा होमिओपॅथी औषधांनी रोग अधिक वाढतो किंवा ही औषधे सुरू असताना इतर कोणतीही औषधे घेतलेली चालत नाहीत, सर्व औषधे गोड असल्याने मधुमेहींना रक्तशर्करा वाढण्याची भीती वाटते इ. परंतु असे काहीही नसून संपूर्ण अभ्यासांती रुग्णास औषध दिले तर होमिओपॅथीचा फायदा रुग्णांना नक्कीच होतो. होमिओपॅथी ही पूर्णपणे नैसर्गिक तत्त्वावर आधारित असून, कोणत्याही रुग्णावर उपचार करताना आजाराचे मूळ कारण लक्षात घेऊन व रुग्णाच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून नंतरच औषधयोजना केली जाते. त्यामुळे आजाराचे समूळ उच्चाटन होण्यास मदत होते. अधिकाधिक रुग्णांनी उपचार घेताना होमिओपॅथीचा पर्याय नक्की विचारात घ्यावा.
 
- डॉ. विश्वनाथ सोमाणी  
 
@@AUTHORINFO_V1@@