होमिओपॅथीला हवाय राजाश्रय !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
वैद्यक शास्त्रातील अस्तित्त्वात असलेल्या उपचार पद्धतींपैकी आधुनिक आणि प्रभावी असे होमिओपॅथी हे एक शास्त्र होय. ज्याचा शोध डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी लावला. रोगांचा समूळ नायनाट, नैसर्गिक प्रतिकार शक्तीत वाढ, औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नसणे, अशी होमिओपॅथीची ख्याती आहे. पूर्वी केवळ महानगरापर्यंत सीमित असलेली ही पॅथी आता छोट्या पाड्यांवरही पोहोचली आहे.
 
एका अर्थी आरोग्यसेवेचा ‘कणा’ बनली आहे.
आज १० एप्रिल... होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांची जयंती... समचिकित्सा पध्दतीद्वारे रूग्णांना आजारातून बरे करतानाच त्यांना पुन्हा तो आजार होऊ नये, याचीही काळजी घेणारा हा सर्वार्थाने धन्वंतरी...मात्र अन्य पॅथींच्या तुलनेत आज होमिओपॅथीचा हवा तसा प्रचार-प्रसार झालेला दिसत नाही. तिला लोकाश्रय मिळाला पण आज खरी गरज आहे ती होमिओपॅथीला राजाश्रय मिळण्याची. डॉ. हॅनिमन यांच्या आजच्या २६३ व्या जयंतीदिनी असा संकल्प करूया...होमिओपॅथीला सुवर्णयुग आणूया.... सर्वार्थाने तिला सर्वांची विश्‍वासाची ‘पॅथी’ बनवूया...!
 

 
 
 
फार्माकॉलॉजीच्या  जागा वाढल्या
 
सुमारे एक-दीड वर्षापूर्वी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी फार्माकॉलॉजीच्या जागा वाढवण्याची घोषणा करून त्या ५०० वरून १२०० केल्या. त्याबद्दल त्यांचे आणि सरकारचेही अभिनंदन करायला हवे. मात्र केवळ एवढ्यावर हा प्रश्‍न सुटणारा नाही. या जागांचा लाभ कोण घेतो आहे? हे पाहणेही गरजेचे आहे.
 
प्रगत विचार करा
 
काळ बदलतो आहे. त्यामुळे प्रगत विचार करण्याची गरज आहे. होमिओपॅथीद्वारे रूग्णसेवा करणार्‍या डॉक्टरांचे अनेक प्रश्‍न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आहे. काही सुटले तर काही ‘प्रोसेस’मध्ये आहेत. येत्या काळात अधिक मोठा लढा द्यावा लागू शकतो. मात्र होमिओपॅथीला अधिक सन्मान, विश्‍वासार्हता मिळवून देत रूग्णसेवेचे घेतलेले हे व्रत अधिक जबाबदारीने निभावण्याचा प्रयत्न करूया...
 
‘ब्रिज कोर्स’ची गरज
 
खरे तर, सहा महिने वा एक वर्ष कालावधीचे ‘ब्रिज कोर्स’ करून होमिओपॅथीच्या डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून डॉक्टरांअभावी बंद पडलेल्या पीएचसीमध्ये त्यांचा उपयोग करून घ्यायला हवा. मध्यंतरी, केंद्र सरकारने तसा प्रस्ताव देवून प्रयत्नही सुरू केले होते. मात्र आयएमएच्या आडमुठ्या धोरणाने आणि दबावतंत्राने सरकारला त्यांनी हा प्रस्ताव मागे घ्यायला लावला. ‘आयएमए’ स्वत:ही तेथे डॉक्टर पाठवत नाही किंवा होमिओपॅथीच्या डॉक्टरांनाही जाऊ देत नाही. रूग्णांच्या जिविताशी खेळण्याचा त्यांना अधिकार नाही हे त्यांना सांगण्याची वेळ आली आहे हे नक्की.
 

 
गेल्या २५० वर्षांहून अधिक काळापासून अत्यंत विश्‍वासार्ह आणि हमखास गुण देणारी उपचार पध्दती म्हणून होमिओपॅथीकडे पाहिले जाते. लक्षणांवर आधारित औषध योजनेमुळे या उपचारपध्दतीत थेट आजारावरच लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याने रूग्णांना त्याचा लाभ होतो. त्याशिवाय होमिओपॅथीमध्ये देण्यात येणारी औषधे ‘साईडइफेक्ट’ विरहित असल्याने लहान मुले व महिला रूग्णांचा याकडे अधिक कल असतो.
 
 
आजवरच्या या उपचारपध्दतीच्या प्रवासाकडे पाहिले तर एक गोष्ट अत्यंत ठळकपणे लक्षात येते की, ‘खूप सुलभ, सोपी, सुरक्षित आणि गुणकारी असलेल्या होमिओपॅथीला आज समाज मान्यता, लोकमान्यता मिळाली असली तरी तिला खरी गरज आहे ती राजमान्यता, राजाश्रय मिळण्याची. राजदरबारात प्रतिष्ठा अधिक वाढण्याची.’ आज सर्वत्र ऍलोपॅथीचाच अधिक बोलबाला होतांना जाणवतो. केवळ गाव, तालुका वा जिल्हाच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही असेच चित्र दिसते. त्या झगमगाटात अन्य ‘पॅथी’ कुठेतरी अंग चोरून उभ्या असलेल्या जाणवायच्या. मात्र गेल्या काही वर्षातील एकूणच सामाजिक स्थित्यंतरानंतर हे चित्र बदललेले दिसते. होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी आणि निसर्गोपचार आदी उपचारपध्दतींनीही आता समाजमनात स्थान मिळवलेले दिसते. ही चांगली लक्षणे असली तरी त्याची गती वाढण्याची गरज आहे. ज्या गतीने जग बदलते आहे, संकल्पना बदलत आहेत त्याच गतीने आता आरोग्याचे प्रश्‍नही मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. नवनवे आजार डिटेक्ट होत आहेत. तशी उपचारपध्दतीही बदलत आहे. त्यात होमिओपॅथीने आजतागायत अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे मात्र, त्याकडे शासन आणि प्रशासनही गांभीर्याने पाहत नाहीत असेच सध्याचे चित्र आहे.
 
 
आरोग्य रक्षण क्षेत्राने नेहमीच सर्वांना भुरळ घातली आहे. या क्षेत्रात काम करणार्‍यांना समाजाकडून जो मान-सन्मान दिला जातो तसा अन्य क्षेत्रात मिळत नाही. डॉक्टर मग तो कुठल्याही पॅथीचा असो-ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद वा अन्य कुठलीही पॅथी - रूग्णांसाठी तो ‘देवदूत’च असतो, ‘प्राणरक्षक’ असतो. याच भावनेतून आज संपूर्ण महाराष्ट्रभर ६८ हजार डॉक्टर्स होमिओपॅथीच्या माध्यमातून रूग्णसेवा करीत आहेत. त्यासाठी मेडिकल कौन्सिलद्वारे मान्यताप्राप्त असलेले बीएचएमएस, डीएचएमएस, डीएचबी, एलसीईएच आदी अभ्यासक्रम शासनमान्य संस्थांमधून यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांनी पदवीही संपादन केली आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार करता, होमिओपॅथीची प्रॅक्टीस करणारे ३२०० डॉक्टर्स कार्यरत आहेत. यातही केवळ होमिओपॅथीची प्रॅक्टीस करणारे १०० ते १५० च्या आसपास असावे. याचाच अर्थ असा की, अनेक होमियोपॅथस् हे मिश्रपॅथी वापरतात. ते जसे शहरात आहेत तसेच ग्रामीण भागातही आहेत. उलट ग्रामीण भागातील त्यांची संख्या अधिक आहे. एकाअर्थी ग्रामीण भागातील डॉक्टरांचे सर्वांनी आभारी असायला हवे की, ते अनेक अडचणी, अव्यवस्था सहन करून तेथे रूग्णांना सेवा देतात. त्यांचा उपयोग जर डॉक्टरांअभावी बंद पडलेल्या वा बंद ठेवण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियुक्ती देऊन करण्यात आला तर त्यांच्या ज्ञानाचा सर्वांना लाभ मिळू शकेल. जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांवरील रुग्णांचा ताण कमी होवू शकेल. मात्र यासाठी होमिओपॅथीकडे सन्मानाने पाहण्याची गरज आहे.
 
- डॉ.रितेश पाटील 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@