जागतिक होमियोपॅथी दिनाच्या निमित्ताने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 

 
आज १० एप्रिल. हा दिवस ‘जागतिक होमियोपॅथी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या भागात आपण या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊयात.
१० एप्रिल हा होमियोपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनेमान यांचा जन्मदिवस. या महान विभूतीला मानाचा मुजरा करण्यासाठी संपूर्ण जगभरात आजचा दिवस हा ‘जागतिक होमियोपॅथिक दिवस’ म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगभरात विविध वैद्यकीय कार्यक्रम आयोजित करुन, डॉ. हॅनेमान व होमियोपॅथीला मानवंदना दिली जाते. संपूर्ण भारतातही प्रत्येक राज्यात हे कार्यक्रमआयोजित केले जातात. इतका मान, सन्मान व आदर संपूर्ण जगातून डॉ. हॅनेमान यांना दिला जातो, याचे कारण त्यांचे आभाळाएवढे अफाट कार्य, ज्यामुळे संपूर्ण मनुष्यजातीवर उपकार झाले आहेत. डॉ. हॅनेमान यांचा जन्म १० एप्रिल १७५५ रोजी जर्मनीत झाला. सामान्य अशा पेंटरच्या घरी जन्मलेल्या सॅम्युएल हॅनेमान यांनी स्वत:च्या मेहनतीने व असामान्य बुद्धिमत्तेने वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊन पारंपरिक वैद्यकशास्त्रात एम. डी. ची पदवी घेऊन वैद्यकीय सेवा करण्यास सुरुवात केली. पारंपरिक वैद्यकशास्त्रातील त्रुटी व अघोरी उपाय व तरीही आजार मुळापासून जात नाही व रुग्ण आयुष्यभर आजारीच राहतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यावेळच्या वैद्यकीय व्यवसायावर ते नाराज होते व संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अजून काही करता येईल का; जेणेकरुन रोगी हा पूर्णपणे रोगमुक्त होऊन निरोगी आयुष्य जगू शकेल, यासाठी त्यांनी संशोधन करण्यास सुरुवात केली.
 
हे संशोधन करतानाच त्यांनी पूर्णपणे नैसर्गिक तत्त्वांवर आधारित, सुरक्षित व अत्यंत गुणकारी अशा होमियोपॅथीचा शोध लावला. याचबरोबर त्यांनी ९९ नवीन औषधे सिद्ध करुन जगाला दिली. होमियोपॅथी लोकप्रिय होऊ लागल्यावर पारंपरिक वैद्यकीय वर्तुळातून तिला प्रचंड विरोध झाला. होमियोपॅथीच्या उपयुक्ततेवर अनेक प्रश्र्न उपस्थित केले गेले, होमियोपॅथीला संपवण्यासाठी त्यावेळच्या औषध कंपन्यांनी फार कारस्थाने केली. आजही होमियोपॅथीच्या यशामुळे त्यांच्याविरुद्ध कारस्थाने चालूच आहेत. परंतु, हॅनेमान यांनी नैसर्गिक सिद्धांतावर होमियोपॅथीची बैठक ठेवल्यामुळे जोपर्यंत निसर्ग आहे, तोपर्यंत होमियोपॅथी राहणारच. हॅनेमान यांनी या प्रचंड विरोधाला न जुमानता आपले कार्य चालूच ठेवले व याचा परिणामम्हणून लवकरच होमियोपॅथी जगप्रसिद्ध झाली. ’ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन’ नावाचा जगप्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला. हा ग्रंथ इतका सत्यावर आधारित आहे की, या ग्रंथाचे पालन करणारा चिकित्सकच खरी होमियोपॅथी जाणू शकतो व वापरु शकतो. या शिवाय त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की, होमियोपॅथी फक्त रोगाला घालवत नाही, तर रोगी माणसालाही पूर्णपणे बरे करते.
 
चैतन्यशक्तीचा अद्भुत व सत्याला अनुसरुन असलेला सिद्धांत (theory of vital force) त्यांनी संपूर्ण जगाला दिला. अनेक भाषांवर प्रभुत्व असल्या कारणाने डॉ. हॅनेमान यांनी अनेक पुस्तकांचे भाषांतरही केले. तत्कालीन औषधशास्त्रातील चुकीच्या गोष्टींवर असूड ओढण्याचे धैर्य त्यावेळी त्यांनी दाखविले. ’मटेरीया मेडिका प्युरा’, ’क्रॉनिक डिसीजे’ यांसारख्या पुस्तकांचे व त्यांच्या खंडांचे लिखाण डॉ. हॅनेमान यांनी केले. ‘ऑरगॅनॉन’च्या सहा आवृत्ती त्यांनी लिहिल्या. या अशा प्रचंड उपकारक कार्यामुळे डॉ. सॅम्युएल हॅनेमान हे होमियोपॅथीचे एक दैवतच मानले जाते. तसेच, संपूर्ण जगतामध्ये त्यांचे अढळ असे मानाचे स्थान आहे. डॉ. हॅनेमान यांच्या या कार्याला नंतर अनेक ऋषितुल्य व मेहनती होमियोपॅथिक डॉक्टरांनी पुढे नेले. याचाच परिणामम्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, होमियोपॅथी ही जगात दुसर्‍या क्रमांकाची औषध प्रणाली ठरली आहे. पारंपरिक प्रणाली तर पूर्वीपासून होतीच, पण आज बहुतांश लोक होमियोपॅथीकडे वळले आहेत आणि याचे श्रेय डॉ. सॅम्युएल हॅनेमान व त्यांच्या सहकार्‍यांना जाते. आज जागतिक होमियोपॅथी दिनाच्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा आणि मास्टर हॅनेमान यांना विनम्र अभिवादन...
 
 
- डॉ. मंदार पाटकर 
(लेखक एम. डी. होमियोपॅथी आहेत.)
 
@@AUTHORINFO_V1@@