कशासाठी? स्वतःसाठी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
 
 
''Your children are not your children. They are the sons and daughters of Life's longing for itself. They come through you but not from you, and though they are with you yet they belong not to you.’’ सुप्रसिद्ध लेखक-कवी खलिल जिब्रान यांचे हे वाक्य पालकांची भूमिका योग्य शब्दात विशद करते. मुलांवर जीवापाड प्रेम करत, त्यांच्यात आपले सर्वस्व गुंतवून, आपली सगळी कल्पकता वापरून, त्यांना अतिशय सबल बनवणे; जेणेकरून एक दिवस ती आपला हात सोडून इतकी उंच भरारी घेतील की जिथे आपली नजरदेखील पोहोचू शकणार नाही, असा हा पालकत्वाचा प्रवास पालकांनाही खूप शिकवणारा आणि समृद्ध करणारा असतो. पण, या प्रवासात वारंवार परीक्षा द्याव्या लागतात. प्रेयस आणि श्रेयस चा समतोल साधावा लागतो. मुख्य म्हणजे काय ’लावून धरायचे’ आणि काय ’सोडून द्यायचे’ याचे भान सातत्याने ठेवावे लागते. ‘‘आमच्या लग्नाच्या आधीपासून आणि त्यानंतरही, आमच्यामधले समानतेवर आधारलेले मित्रत्वाचे नाते हा आमच्या आप्तेष्टांमध्ये खूप कौतुकाचा विषय होता. लोक आमच्या नात्याचे उदाहरण ‘आदर्श’ म्हणून द्यायचे नेहमी. आम्हीही आमच्यामधलं बॉण्डिंग मनापासून अनुभवत होतो. आमच्या मुलीच्या जन्मानंतर आणि ती जशीजशी मोठी होत गेली तसे मात्र आम्हा दोघांमधले सूर बिघडू लागले...’’ आजच्या या परिस्थितीची बीजे तिथेच कुठेतरी असणार. लग्नाला २५ वर्षे झाल्यानंतर विभक्त होण्याचा विचार करणार्‍या जोडप्यामधली ती स्त्री मला आमच्या समुपदेशनाच्या आठव्या सत्रात सांगत होती. त्यांच्या या विभक्त होण्याच्या निर्णयाचा त्यांच्या एकुलत्या एक मुलीवर खूप परिणाम झाला होता आणि ती नैराश्याने ग्रस्त झाली होती. मुलीच्या या अवस्थेचा ताण या त्रिकोणी कुटुंबाला हतबल करणारा होता. आमचे नाते बिनसायला सुरुवात झाली ती आमच्या दोघांच्या पालकत्वाबद्दल असणार्‍या पूर्णपणे भिन्न कल्पनांपासूनच. बोलण्याच्या ओघात तिच्याकडून हा उल्लेख झाल्यानंतर मला काही बाबी अधिक स्पष्ट झाल्या. माझ्या मनात विचार आला की, पालक होण्याआधी त्याबद्दल काळजीपूर्वक विचार या जोडप्याने केला असता तर आज परिस्थिती वेगळी असती कदाचित.
 
इतर पशुपक्ष्यांसाठी अत्यंत नैसर्गिक असणारी संगोपनाची प्रक्रिया ही माणसासाठी मात्र अधिक जटील होते. याचे कारण माणसाला मिळालेली विशेष बुद्धिमत्ता आणि भावना; त्यातून निर्माण होणार्‍या अनैसर्गिक अपेक्षा. ’म्हातारपणाची काठी’ म्हणून मुलांना जन्म द्यायचा (मग तो मुलगाच हवा हा हट्ट तर आलाच), असा विचार सुसंस्कृत समाजामध्ये आता मागे पडत चाललेला दिसतो खरा. पण, तरीही आजदेखील किती जोडपी मूल होऊ देण्याचा निर्णय खूप जाणीवपूर्वक घेतात हे सांगता येणार नाही. पालकत्वाची सुरुवात केवळ मूल जन्मल्यानंतर नव्हे; गर्भधारणेपासूनही नव्हे, तर मुलाला जन्म देण्याचा निर्णय विचारपूर्वक एकत्रितपणे घेण्यापासून होते. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने आपल्याला ’मूल हवे का?’ आणि ’मूल का हवे?’ या दोन प्रश्नांचा विचार प्रामुख्याने करणे फार गरजेचे आहे. हा विचारच, आई-बाबा दोघांनाही गरोदरपणाबद्दल, प्रसूतीबद्दल आणि बाळाच्या वाढीबद्दल शास्त्रीय माहिती मिळवायला प्रेरणा देतो. त्यातून पुढे बहुतांशाने बदलून जाणार्‍या त्यांच्या आयुष्यात ते जास्त तयारीनिशी पाऊल ठेवू शकतात. मध्यंतरी ‘प्रेगा-न्यूज’चा जागतिक महिला दिनानिमित्त प्रसारित झालेला व्हिडिओ पहिला, पोस्ट पोर्टमडिप्रेशन म्हणजेच बाळंतपणातील नैराश्याबद्दल. आपल्या देशात या समस्येचा स्वीकार अजूनही निर्विवादपणे होताना दिसत नाही. खरेतर अशा समस्या सोडवण्यासाठी जोडप्यांमध्ये सुरुवातीपासून पालकत्वाबद्दल होत असणारा सुसंवाद आणि कुटुंबातले आश्वासक वातावरण महत्त्वाचे ठरते.
 
पालकत्व हा खरंतर रोज नव्याने शिकत जाण्याचा विषय आहे; आपले विचार व कृती यात समतोल साधत राहण्याचा सराव आहे; ’स्व’च्या पलीकडे पाहण्याची दृष्टी आहे; आपला अहंकार दूर सारून मुलांच्या स्वाभिमानाला आकार देण्याचे कौशल्य आहे. व्यापक दृष्टीने पाहिले तर मानवाला आत्मोन्नती साधता यावी यासाठी निसर्गाने आखलेली ही योजना आहे.
 
 
 
 
- गुंजन कुलकर्णी 
(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)
 
@@AUTHORINFO_V1@@