अवास्तव अपेक्षांच्या ओंजळीत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
 
 
आजकालच्या पालकांनी जमिनीवर पाय ठेवून चालणे आवश्यक आहे. वास्तवाचे पूर्ण भान ठेवायला पाहिजे. आपण असामान्य पालक आहोत आणि आपले मूल जणू एक राजकुमार आहे व त्याने पुढे भविष्यात राजाच व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा ठेवून चालणार नाही. मुलं काही काळानंतर पालकांच्या सुरक्षाकवचातून बाहेर पडतात व त्यांना पंख फुटतात हे सत्य आहे.
 
अगदी अर्जंट भेटायचे आहे,’’ असे कळवत, खाडे दाम्पत्य माझ्या क्लिनिकमध्ये आले. गेले कित्येक महिने खाडे दाम्पत्य मनातून खूप धास्तावलेले व अस्वस्थ झाले होते. दोघांचीही झोप उडाली होती. सौ. खाडेंचे अलीकडे कशातही लक्ष लागत नव्हते व त्या खूपच चिडचिड करत होत्या. श्री. खाडे ऑफिसमधून घरात शिरताच त्यांची चिडचिड सुरु होत असे. अलीकडे ऑफिस सुटले आणि घराच्या दिशेने जायची वेळ आली की, खाडेंचा थरकाप व्हायचा, घसा कोरडा पडायचा. एरवी आनंदी आणि शांत असणार्‍या त्यांच्या पत्नी अत्यंत संतप्त व्हायच्या, त्यांना त्यांच्या भावना नियंत्रणात ठेवणे जमत नव्हते. अतिशय संयमी, प्रेमळ व सुखीसमाधानी असणारे खाडे दाम्पत्य हल्ली असे चिडकेरडके कसे झाले व का झाले याचा विचार, त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळीसुद्धा करु लागली होती.
 
हे असे का होते, हे कळायला खाडे कुटुंबाची पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या लग्नाला जवळजवळ पंधरा वर्षे झाली होती. त्यांना १३ वर्षाचा एकुलता एक मुलगा. अधीर त्याचे नाव. अधीर जन्माला आला तेव्हा पतीपत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपल्याला एकच मूल असावे, ही त्या दोघांचीच इच्छा. आपल्या एकुलत्या एका मुलाला अत्यंत प्रेमाने वाढवताना त्याने संस्कारक्षम व्हावे याचीही शक्यतो दोघांनी काळजी घेतली होती. त्याच्या भविष्याची सुंदर सुंदर स्वप्ने पाहत पतीपत्नी अगदी रंगून जात असत. त्यांच्या स्वप्नातला अधीर एक उच्चशिक्षित सुजाण व सुसंस्कृत व्यक्ती म्हणून जगत होता. या जगात अनेक लोक असे आहेत की, ज्यांना त्यांच्या आयुष्यात त्या त्या क्षणाला, इतरांना सहज मिळत असणार्‍या, अनेक सुखदायक गोष्टी मिळाल्या नव्हत्या. त्या अगदी खेळणी, कपडे, आईस्क्रीम, चॉकलेट यांसारख्या साध्या गोष्टी होत्या. अशावेळी त्यांना खूप वाईट वाटले होते. आपण दुर्दैवी आहोत असे वाटले होते. घरच्या परिस्थितीचा राग येणे व असहाय वाटणे, अशावेळी साहजिकच होते. श्री व सौ. खाडेंची व्यक्तिगत आयुष्यात बालपणी अशीच काहीशी परिस्थिती होती. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे फाजील लाड न करता, त्यांच्या शिक्षणावर भर दिला होता. त्यामुळेच शिक्षणाचे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्व त्यांना कळले होते. खाडे दाम्पत्य आपापल्या ऑफिसमध्ये खूप कष्ट करुन, प्रगतिपथावर आले होते. दोघांचे प्रमोशन व्यवस्थित होत होते. स्वबळावर त्यांनी दोन बेडरुमचा फ्लॅट घेऊन छान सजवला होता. अधीरला उत्तम व महागड्या शाळेत घातले होते, जेणेकरुन त्याची पुढची प्रगती सुकर व्हावी. घरात सगळ्या सुखसोयी होत्या. अधीरचा वावर सुखवस्तू व श्रीमंत कुटुंबातील मुलांबरोबर होत होता. त्याचे आधुनिक जीवनशैलीत रमणारे खूप मित्र होते. अधीर मित्रांच्या घरी व हॉटेलमध्ये त्यांचे बर्थडे साजरे करायला जाणार, ते एकमेकांबरोबर काही ना काही कारणांनी पार्टी साजरी करणार यात वावगे वाटण्यासारखे वा खटकण्यासारखे काही नव्हते. कारण हॉटेलिंग, पार्टी या गोष्टी आजच्या तथाकथित ’कूल’ जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहेत. आजकालच्या तरुण पिढीला सकाळी झोपेतून उठल्यावर रात्री पुन्हा झोपेपर्यंत आणि झोपेतही सगळे कसे ’कूल’ हवे असते. ते तसे असण्यावर त्यांचा भर असतो. बरे ‘कूल’ म्हणजे काय? तर डोक्याशी जराही कटकट नसलेली लाईफस्टाईल! मग सगळे इशारे कसे? तर मित्रं कूल, आई कूल, डॅडी कूल. अशा ‘कूल’ अधीरच्या मम्मी-पप्पांना आजकाल अजिबात ‘कूल’ वाटत नव्हते. अधीरच्या आयुष्याचे एक तप आता संपत आले होते. या नेमक्या वळणावर आज घडणार्‍या गोष्टीमुळे, खाडे पतीपत्नींनी अधीरसाठी स्वप्नांत बांधलले मनोरे उद्या उभे राहणार होते. पण, या उद्याच्या मनोर्‍याचा पाया तरी आज उभा राहणार आहे की नाही? अशी शंका खाडे पतीपत्नींना वाटायला लागली होती. का त्यांना असं वाटत होतं? नक्की काय झालं होतं?
 
अधीर आजकाल सुजाण राहिला नव्हता. शिस्तीचा पार चक्काचूर झाला होता. अलीकडे तो अभ्यास करायचे नाव घेत नव्हता. सारखा घराबाहेर मित्रांबरोबर असायचा. शाळेचा रिपोर्ट आजकाल चांगला नव्हता. तो स्वतंत्रपणे विचार करायला लागला होता. विचारांत जबाबदारी नव्हती. आईबाबांचे तो काहीच ऐकत नव्हता. अभ्यासाची आठवण करुन दिली की, ‘’करतो ना!’’ असे भुरकावत तो आपल्या रुममध्ये जाऊन, दरवाजा बंद करुन बसायचा. पूर्वी अधीरला आपल्या मम्मी-पप्पांबरोबर बसून होमवर्क करायला आवडत असे. पण, अलीकडे आईबाबांचे आपल्याजवळ असणेसुद्धा त्याला उपद्रव वाटू लागला. खाडे मम्मी-पप्पा आता खूप उदास व्हायला लागले होते. आपल्याकडून काही चुकत तर नसेल ना? अशी शंका त्यांना यायला लागली होती. अपराधी वाटत होते. आपण इतका जीव ओतून, स्वतःकडेही न पाहता याच्याकडे लक्ष देतो, तरी हा आपला पोटचा लेक इतका बेजबाबदार कसा झाला? म्हणून त्यांना खूप रागही येत होता. आपण पालक म्हणून सपशेल अपयशी होत आहोत, या त्राग्याने त्यांना सारासार विचार करणेही जमत नव्हते. या वयातल्या मुलांच्या व मुलींच्यासुद्धा पालकांची अशीच उद्रेकी स्थिती होते. अशा वेळी रागाच्या भरात भावनेच्या भरात मुलांशी संवाद तुटतो व आणखी समस्या निर्माण होते. यासाठी खरंच काय करायला पाहिजे? तर मुलांसाठी काही विचार करताना पालकांचे डोके मुळात शांत व संयमी व्हायला पाहिजे.
 
त्यासाठी आपण अधीरसारख्या वेगवान चालणार्‍या युगातल्या मुलांचे पालक आहोत, हे मुळात लक्षात घेणे आवश्यक आहे. पालक तरी कोण आहेत? शेवटी ती माणसंच आहेत. चुका करणारी व चुकांतून शिकणारी. ‘परिपूर्ण पालक’ ही संकल्पना मानवी जगात असूच शकत नाही. म्हणून आपल्याकडून काही चमत्कार घडेल वा जादू होईल, ही अपेक्षा नसावी. आजकालच्या पालकांनी जमिनीवर पाय ठेवून चालणे आवश्यक आहे. वास्तवाचे पूर्ण भान ठेवायला पाहिजे. आपण असामान्य पालक आहोत आणि आपले मूल जणू एक राजकुमार आहे व त्याने पुढे भविष्यात राजाच व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा ठेवून चालणार नाही. मुलं काही काळानंतर पालकांच्या सुरक्षाकवचातून बाहेर पडतात व त्यांना पंख फुटतात हे सत्य आहे. या परिस्थितीला सामोरे जायची तयारी पालकांनी ठेवायला हवी. जेणेकरून आपल्या व पाल्याच्या नात्यात मोकळेपणा येईल. मुलांनी आपल्याला विरोध करणे व आपल्या अपेक्षांच्या विरोधात वागणे ही शक्यता स्वीकारली, तर पालकांचा आत्मविश्वास ढळणार नाही. शेवटी पालकांचा स्वतःवरचा व पाल्यावरचा आत्मविश्वास खूप मोलाचा आहे.
 
 
 
 
- डॉ. शुभांगी पारकर 
(क्रमशः)
 
@@AUTHORINFO_V1@@