चारकोप, गोराईमधील २५ हजार कुटुंबांना मिळणार गॅस पाईपलाईन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 

 
मुंबई : गेली कित्येक वर्षे चारकोप व गोराई क्लस्टर आणि बंगलोमधील नागरिक महानगर पाईप लाईन गॅस जोडणीच्या प्रतीक्षेत होते. आधीच्या काँग्रेसच्या काळात तत्कालिन खासदारांनी फक्त आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्ष काहीच केले नाही. भाजपचे सरकार आल्यानंतर याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापर्यंत हा विषय पोहचविण्यात आला व त्यानंतर महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनीही जलदगतीने कार्यवाही केली. यामुळे चारकोप, गोराई परिसरातील क्लस्टर आणि बंगल्यात राहणाऱ्या हजारो कुटुंबियांच्या लाखो नागरिकांचे गॅस पाईप लाईनचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होऊ शकेल, असेही शिक्षण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
 
चारकोप, गोराई येथील क्लस्टर गृहनिर्माण संस्था व बंगले यांना महानगर गॅस पाईपलाईन जोडणीचा भूमिपूजन चारकोप येथील सेक्टर ६ व गोराई सेक्टर १ येथे शिक्षण मंत्री व मुंबई उपनगर जिल्हयाचे पालकमंत्री विनोद तावडे व खासदार गोपाल शेट्टी यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी तावडे बोलत होते.
 
खासदार गोपाल शेट्टी यांनीही या विषयात पाठपुरावा करीत हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचे तावडे यांनी नमूद केले. महानगर गॅस पाईप लाईनमुळे चारकोप- गोराई परिसरातील सुमारे ८०० गृहनिर्माण संस्था आणि ६०० बंगल्यांमधील सुमारे २५ हजार कुटुंबामधील लाखो सदस्यांना फायदा होणार आहे. भूमिपूजन झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष लाखो कुटुंबियांना महानगर गॅसचा लाभ मिळणार आहे. पाईपलाईन गॅस जोडणी ही एक सुरवात असून याचा फायदा आता क्लस्टर मध्ये राहणारे मुंबईतील इतर म्हाडाच्या वसाहतींमधील रहिवाशांना होणार आहे. विशेष करून महिला वर्गाला या पाईप गॅसची जोडणीचा दिलासा मिळणार असून गॅस सिलेंडर संपल्यावर दुसरा कधी येईल याची वाट पहावी लागणार नाही, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@