रोज अर्धा किलो माती खाऊनही तंदुरुस्त!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |

 

 
60 वर्षीय वृद्धाची सवय
माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जिवांचे मिश्रण असते. माती हे मिश्रण पृथ्वीवरच्या जीवनास साह्यभूत ठरत असते. माती सर्व सजिवांच्या वाढीचे मुख्य माध्यम आहे. वनस्पतींची वाढ या मातीच्या आधाराने होत असते. परंतु, वणी येथील एका व्यक्तीने या मातीलाच आपल्या आरोग्याची किल्ली बनवली आहे.
या जगात ऐकावे ते नवलच असते. अनेक व्यक्ती त्यांच्या सवयीमुळे, त्यांच्यात असलेल्या विविध गुणांमुळे, वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. अशा व्यक्तींमध्ये जन्मजात काही वैशिष्ट्ये असतात, तर काहींमध्ये परिस्थितीनुसार निर्माण झालेल्या सवयी असतात. असेच एक व्यक्तिमत्त्व सध्या वणी येथे राहात आहे. मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील नागाळा येथील 60 वर्षीय रमेश बाविस्कर हे मागील 45 वर्षांपासून दररोज अर्धा किलो माती खात असल्याची बाब नुकतीच प्रकाशात आली आहे.
 
 
नागाळा येथे अगदी लहान असताना रमेश नदीकाठी गुरे चारण्यासाठी जात होता. तेव्हा नदीकाठी असलेली गाळाची माती एक दिवस रमेशने चाखून पाहिली. ती चवीला चांगली लागली. त्यामुळे दुसर्‍या दिवसापासून तो दररोज नदीकाठावरील गाळाची माती न चुकता रोज खायला लागला. ही सवय त्याच्या नित्यक्रमाचा भाग होऊन बसली.
सुरुवातीला थोडी थोडी माती खाणारा रमेश नंतर रोज अर्ध्या किलोपर्यंत माती खायला लागला. या त्याच्या सवयीमुळे त्याच्या प्रकृतीवर कोणताही दुष्परिणाम झाला नाही व आतापर्यंत त्याला कोणताही आजार न झाल्यामुळे थोडीफार विचित्र वाटणारी त्याची ही सवय त्याच्या जीवनातील अविभाज्य घटक होऊन बसली.
रोजगाराच्या शोधात अनेक वर्षांपूर्वी तो वणी येथे येऊन राहिला. पण त्याच्या माती खाण्याच्या सवयीमुळे त्याने गावावरून पोत्याने माती भरून आणून खायला सुरुवात केली. मध्यंतरी कामाच्या व्यापामुळे त्याला गावाला जाऊन माती आणणे शक्य न झाल्यामुळे तो अतिशय अस्वस्थ झाला होता.
 
 
अशात एक दिवस त्याने तो ज्या कोळशाच्या प्लॉटवर काम करतो त्या कोळशातील मातीचा एक खडा उचलून सहज खाऊन पहिला. त्याला त्याचीही चव चांगली वाटली. पण कोळशाचा खडा खाल्याने काही अपाय होईल काय, या भीतीने त्याने काही दिवस कोळशातील खडे खाऊन पाहिले. कोणताही अपाय किंवा त्रास न झाल्यामुळे त्याने आता कोळशामध्ये जे मातीचे खडे येतात ते खाणे सुरू केले आहे.
रमेश बाविस्कर यांना आता कोणत्याही गावाला जायचे असेल किंवा तिकडे मुक्काम करायचा असेल तर ते इतर सामानासोबत पुरेल इतके मातीचे खडे घेऊन जातात. विशेष म्हणजे माती खाताना ते कोणाचीही भीड बाळगत नाही. ही माती खात असताना ते नियमित जेवणही करतात, हे विशेष.
----
गजानन कासावार
वणी,
@@AUTHORINFO_V1@@