पेशवा साम्राज्य भाग -२

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
 
 
दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगश जेव्हा छत्रसाल बुंदेल्यांवर चालून आला तेव्हा त्याच्यासमोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगशने ८० वर्षांच्या छत्रसालाला छावणीत बंदिस्त केले. मात्र, छत्रसालाने हेरांमार्फत बाजीरावांना पत्र लिहून मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर ३५-४० हजारांची फौज घेऊन खुद्द बाजीराव मोहम्मद खान बंगशवर चालून गेले. ही हालचाल इतकी वेगवान, इतकी त्वरेने केली की, बाजीराव धडकेपर्यंत बंगश गाफीलच राहिला. बेसावध बंगश एका गढीत अडकला. बाजीरावाने मुघल सैन्याला पुरते बेजार करून सोडले. या मदतीने खुश होऊन छत्रसालने वार्षिक ३२ लाखांचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावांस नजराणा म्हणून दिला. तसेच त्याची मुलगी मस्तानी हिच्याबरोबर त्यांचा विवाह लावून दिला. मराठ्यांचे व बुंदेल्यांचे रक्तसंबंध जुळावेत हाच त्यामागचा हेतू असावा. बाजीरावांचा हा दुसरा विवाह होता. काशीबाई ही त्यांची प्रथम पत्नी होती. थोरले बाजीराव अतिशय देखणे होते. ६ फूट उंच, गौर वर्ण, निकोप शरीरयष्टी, कोणीही मोहित व्हावे असा चेहरा, उमदे व्यक्तिमत्त्व, न्यायनिष्ठूर स्वभाव, असे असले तरी त्यांची राहणी साधी होती. त्यांनी कधीही देवाधर्माचे अवडंबर केले नाही. बहुजनांबरोबर राहून ते त्यांच्याबरोबर जेवत असत, त्यांच्यात रमत असत. त्यामुळे ‘पुण्यात धर्म बुडाला, अभक्ष्य भक्षण केले,’ असे आकांडतांडव तत्कालीन पंडितांनी केले. पण थोरल्या बाजीरावाने त्याकडे दुर्लक्ष केले.
 
पुण्यात शनिवारवाडा पहिल्या बाजीरावांनीच बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. त्यांनी आपली प्रिय पत्नी मस्तानी हिच्याकरिता मस्तानी महाल ही बांधला. चिमाजी आप्पा हा बाजीरावांचा धाकटा भाऊ. यांनीदेखील कोकण किनार्‍यावर मराठी सत्तेचा भगवा फडकावला होता. बाजीरावांनी दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगीजांकडून सात शहरे, चार बंदरे, दोन लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख आढळतो. वसईच्या लढाईमुळे त्यांची ख्यातकीर्ती वाढली. याची जाणीव ठेऊन चिमाजीने वसईजवळ वज्रेश्वरी देवीचे मंदिर बांधले. बाजीराव आणि चिमाजी अप्पा यांच्यामुळेच मराठी साम्राज्याचा भारतात दबदबा निर्माण झाला. साम्राज्य विस्तारले. इ. स. १७४० मध्ये नासीर जंगाविरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासीर जंगने हंडिया व खरगोण हे प्रदेश बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी बाजीराव खरगोणला गेले. मात्र या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. नर्मदा तीरावर रावेरखेडा या गावी विषमज्वराने २८ एप्रिल, १७४० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा नानासाहेब म्हणजेच बाळाजी बाजीराव पेशवेपदी नियुक्त झाले. नानासाहेब कुशल राजकारणी तर होतेच पण सुसंस्कृत आणि मृदूभाषीदेखील होते. वयाच्या ११ व्या वर्षी थेट शाहू छत्रपतींकडूनच राजकारणाचे धडे घेतलेल्या नानासाहेब पेशव्यांनी मराठी राज्याला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले. नानासाहेबांच्या कारकिर्दीतच साताराऐवजी पुणे हे शासकीय केंद्र बनले. त्यांनीच पुणे शहराची नवीन नगररचना केली. पाणी योजना तसेच अनेक सुधारणा केल्या. पुणे नगररचना करत असताना अठरापगड जातीच्या लोकांना त्यांनी घरपट्टी माफ केली. त्यांचा चुलतभाऊ आणि चिमाजी आप्पांचा मुलगा सदाशिवराव भाऊ हेही थोर पराक्रमी होते. त्यांनी पश्चिम कर्नाटकावर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. मुघलांकडून माळवा हस्तगत केले. त्यांनी उद्गीरमध्ये निजामाला नेस्तनाबूत केले. पण अहमदशाह दुर्राणी याने भारतावर आक्रमण करून दत्ताजी सिंधियांच्या बलाढ्य सैन्याला हरवले. ही मराठा साम्राज्यावरील पुढच्या भयंकर संकटाची नांदी ठरली. त्यानंतर झालेल्या पानिपताच्या घनघोर लढाईत मराठ्यांचा भीषण पराभव झाला. हा पराभव नानासाहेबांच्या वर्मी बसला. हा आघात सहन न झाल्याने २३ जून, १७६१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
 
नानासाहेबांच्या मृत्यूने मराठ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. पानिपताच्या युद्धाने आधीच अख्खा महाराष्ट्र होरपळून निघाला होता. त्यातच त्यांचा आधारस्तंभ असलेला पेशवा त्यांनी गमावला. या धामधूमीतच नानासाहेबांचा मुलगा माधवराव (प्रथम) हे पेशवा झाले. नानासाहेबांच्या अकाली जाण्याने अवघ्या १६व्या वर्षी त्यांना पेशवेपदाची आणि मराठी साम्राज्याची धुरा हाती घ्यावी लागली. केवळ ११ वर्ष शासनकर्ता म्हणून कारकीर्द गाजवलेल्या माधवरावांनी मराठा साम्राज्याचा अकल्पित असा विस्तार तर केलाच पण राज्यात सुसंघटनही आणले. त्यांची उमेदीची काही वर्ष गृहकलह संपविण्यातच गेली. पण तरीही ते पेशवे साम्राज्याचा सर्वोत्कृष्ट पेशवा मानले जातात.
 
माधवराव धार्मिक, सहिष्णू, कर्तव्यनिष्ठ होता. जनकल्याणासाठी तो सतत झटत असे. त्याच्यात बाळाजी विश्वनाथ यांच्यासारखी दूरदृष्टी, बाजीरावासारखी नेतृत्वशक्ती तसेच वडिलांसारखी शासकीय क्षमता होती. माधवरावांचे चुलते रघुनाथराव उर्फ राघोबा यांची कुटिल राजनीती जगजाहीर आहे. प्रचंड पराक्रमी असूनही त्यांनी आपली बरीच शक्ती सत्ता बळकावण्यासाठी डावपेच खेळण्यात खर्ची घातली. प्रसंगी ते मराठ्यांचा परमशत्रू निजामाला जाऊन मिळाले. त्यांनी माधवरावांची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण राक्षसभुवन येथील युद्धात माधवरावांनी निजामाला असा काही धडा शिकवला की, माधवराव हयात असेपर्यंत निजामाने डोके वर काढले नाही. ज्याच्या शौर्यापुढे इंग्रजही नतमस्तक होत असत, अशा हैदर अलीला अवघ्या चार मोहिमांमध्ये माधवरावांनी पराभूत केले. त्यानंतर माळवा, बुंदेलखंड येथे मराठ्यांचे साम्राज्य प्रस्थापित झाले. पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांचा जणू शक्तिपातच झाला होता. मात्र आता मराठा साम्राज्य सर्व शक्तिशाली सिद्ध झाले होते. परंतु, वारंवारच्या युद्ध मोहिमा, गृहकलह आणि राजयक्ष्मासारखा आतड्यांचा आजार यामुळे माधवरावांचे वयाच्या २७व्या वर्षी अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी रमाबाई या सती गेल्या. माधवरावांच्या मृत्यूनंतर खर्‍या अर्थाने मराठा साम्राज्याच्या अधःपतनाला सुरुवात झाली. माधवरावांचा लहान भाऊ नारायणराव याला पेशवेपदी बसविण्यात आले. पण चुलते रघुनाथराव यांच्या मनात अद्याप सत्तेची लालसा होती. त्यांना पेशवे व्हायचे होते आणि दरबारातील नाना फडणवीस आणि इतर मुत्सद्दी त्यांचे हे मनसुबे पुरेपूर जाणून होते. त्यांनी कधीच राघोबादादांच्या या इच्छेला समर्थन दिले नाही. त्यांना नेहमी विरोधच केला, पण माधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या या इच्छेने पुन्हा एकदा डोके वर काढले. त्यामुळेच त्यांनी गारद्यांना नारायणरावास धरावे, असा संदेश पाठवला. त्यांची पत्नी आनंदीबाईने त्या ‘ध’चा ‘मा’ करून नारायणरावाची गारद्यांकडून हत्या घडवून आणली.
 
वयाच्या नवव्या वर्षापर्यंत नारायणराव आपली आई गोपिकाबाई यांच्यासोबतच राहिल्याने संस्कृत, मराठी व्याकरण यात ते पारंगत झाले होते मात्र राजकारण, युद्धशास्त्र यात प्राविण्य मिळवण्यात ते अपयशी ठरले. अतिशय कमी वयात त्यांना पेशवेपद मिळाले असले तरी त्यांना या जबाबदारीची जाणीव कधीच झाली नाही. कर्तव्यनिष्ठता, विवेकबुद्धी, न्यायनिष्ठूरपणा याचा अभाव, अल्लडपणा हे त्यांचे दुर्गुण त्यांना भविष्यात त्रासदायक ठरले. नारायणरावाच्या हत्येनंतर शनिवारवाडा दुःखात बुडालेला असताना राघोबादादा मात्र आपल्याच कैफात होते. आता त्यांना दुसरा कोणीही प्रतिस्पर्धी उरला नव्हता. छत्रपती राजाराम यांनी त्यांचा मुलगा अमृतराव याच्याकरवी रघुनाथरावांकरिता पेशवेपदाची वस्त्रे पाठवून दिली. ज्या पदाच्या हव्यासापायी रघुनाथरावांनी इतके उपद्व्याप केले ते अखेर ३१ ऑक्टोबर, १७७३ रोजी त्यांना मिळाले, पण नियतीचा खेळ अजब असतो. ज्या नारायणरावांना त्यांनी पेशवेपदासाठी मारले, त्यांच्या निधनानंतर काही काळातच त्यांच्या पत्नीने पुरंदर येथे एका पुत्ररत्नाला जन्म दिला. लागलीच नाना फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांनी नारायणरावांच्या मुलाला सवाई माधवराव म्हणजेच माधवराव नारायण याला पेशवेपद मिळावे यासाठी हालचाल सुरू केली आणि वयाच्या अवघ्या ४०व्या दिवशी सवाई माधवराव पेशवे झाले. एवढ्या लहान वयात पेशवेपद मिळालेली त्या काळातील ही पहिली व्यक्ती ठरावी. १७७७ ते १७८२ पर्यंत पहिले इंग्रज-मराठा (अँग्लो-मराठा) युद्ध झाले. हरिपंत तात्या फडके, नाना फडणवीस, महादजी शिंदे, तुकोजीराव होळकर, विसाजी कृष्ण बिनीवाले यांच्या पराक्रमामुळे इंग्रजांचा पराभव झाला. सवाई माधवराव अल्पवयीन असल्यामुळे प्रशासकीय व्यवस्था नाना फडणवीस तर लष्करी व्यवस्था महादजी शिंदे बघत असत. याच काळात डिसेंबर, १७८२ ला सालबाईचा इंग्रज-मराठा तह झाला तर दिल्लीच्या बादशहाकडून वकील-ए-मुतालिकीच्या सनदा मराठ्यांना मिळाल्या. त्यानंतर महादजी शिंद्यांनी १७८८च्या युद्धात नजीबखान रोहिल्याचा नातू गुलामकादर याचे डोळे काढून त्याचा वध केला. रोहिल्यांतील नजीब खानाची समाधी मराठी फौजांनी उद्ध्वस्त केली. अशाप्रकारे त्यांनी पानिपतच्या युद्धाचा बदला घेतला. सवाई माधवराव यांनी वयाच्या २१ व्या वर्षी १७९५ मध्ये सोलापूरमधील खर्डा किल्ला निजामाकडून जिंकून घेतला. दुर्दैवाने सवाई माधवराव हेदेखील अल्पकालीन पेशवा ठरले. ऑक्टोबर १७९५ मध्ये एका अपघातात महालाच्या छतावरून कोसळून त्यांचा मृत्यू झाला. सवाई माधवराव हेदेखील नारायणरावाप्रमाणेच नाना फडणवीस यांच्या सल्ल्याने राज्यकारभार करीत असत. त्यांची स्वतः कधीच निर्णय घेतले नाहीत. त्यांच्या घराण्यातील इतर पेशव्यांप्रमाणे त्यांची कारकीर्द फारशी यशस्वी झाली नाही.
 
सवाई माधवराव निःसंतान असल्यामुळे महाराष्ट्राचा पुढील पेशवा कोण याबाबत चर्चा होऊ लागली. सात महिने उत्तराधिकार्‍याचा प्रश्न साचून राहिला. वंशपरंपरेनुसार रघुनाथरावांचा मोठा मुलगा बाजीराव द्वितीय यांना पेशवेपद मिळायला हवे होते. नाना फडणवीसांनी बाजीरावांचा लहान भाऊ चिमणाजी याला पेशवा बनविण्याचे ठरवले. त्याची नियुक्त वैध व्हावी, याकरिता सवाई माधवरावांची पत्नी यशोदाबाई यांना त्याला दत्तक घ्यावयास नाना फडणवीसांनी भाग पाडले. त्यानंतर त्याला पेशवेपदावर बसवले. पण अवघ्या काही महिन्यांत त्याच्याबरोबर झालेल्या राजकीय वितुष्टांमुळे नाना फडणवीसांनी त्याच्याचविरुद्ध षड्यंत्र करून त्याला बंदी केले आणि बाजीराव द्वितीय यास पेशवेपद मिळवून दिले. त्याचदरम्यान अंतिम इंग्रज-मराठा युद्ध झाले. इंग्रजांनी छत्रपतींकरवी दुसरा बाजीराव यांना पेशवेपदावरून पदच्युत केले. त्यानंतर चिमणाजी बनारसला जाऊन राहिला, जिथे १८३० मध्ये त्याचा मृत्यू झाला. बाजीरावाचा बहुतेक जीवनकाल हा बंदीवासात गेल्यामुळे त्याचे राजकारण, शिक्षण अपूर्णच राहिले. राज्यकारभाराचे ज्ञान नसल्याने त्याने अनेक चुकीचे निर्णय घेतले. डिसेंबर, १८०२ मध्ये त्याने इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार केला. त्याच सुमारास दुसरे इंग्रज-मराठा युद्ध झाले. तैनाती फौजेचा निर्णय चुकीचा असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आपली चूक सुधारली. त्यांनी गणपतराव पानसे यांना शुक्रवारपेठेत तोफा ओतण्याचा कारखाना काढून दिला. तसेच बापू गोखले यांना घोडदळ प्रमुख बनवले. इंग्रज-मराठा तिसर्‍या युद्धानंतर इंग्रजांनी छत्रपतींकरवी १८१८ मध्ये दुसर्‍या बाजीरावाचे पेशवेपद काढून घेतले. तरीही इंग्रज बाजीरावांच्या अखंड मागावर होते. बाजीराव आपल्या समर्थकांमार्फत इंग्रजांबरोबर गनिमी कावा वापरून लढा देतच राहिले. त्या दरम्यान अनेक सरदार जहागिरी मिळवण्यासाठी इंग्रजांना शरण गेले. अखेर जून १८१८ मध्ये अशीर गडाजवळ खानदेशात दुसरे बाजीराव इंग्रजांना शरण आले. मराठ्यांचे ते शेवटचा पेशवे ठरला. इंग्रजांच्या मासिक वेतनावर ते विठूर येथे राहू लागले. बाजीरावांना शरण आणून इंग्रजांनी मराठा साम्राज्याचे सार्वभौमत्व संपुष्टात आणले.
 
 
 
 
 
- रश्मी मर्चंडे 
 
@@AUTHORINFO_V1@@