म्यानमार - सर्वसाधारण माहिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2018   
Total Views |


सौजन्य : Nations Online Project


म्यानमारचे अधिकृत नाव 'म्यानमार प्रजासत्ताक संघ' (The Republic of the Union of Myanmar). पूर्वी 'बर्मा'* (भारतीय 'ब्रह्मदेश' म्हणत) म्हणून ओळखला जात होता. भौगोलिकदृष्ट्या म्यानमारचे अक्षांश ०९° ३२' उत्तर व २८° ३१' उत्तर व रेखांश ९२° १०' पूर्व व १०१° ११' पूर्व आहे. १९८९ मध्ये बर्माचे अधिकृतरित्या 'म्यानमार' असे व पूर्वीची राजधानी 'रंगून'चे 'यांगोन' असे नामांतर करण्यात आले. २००६ला 'नेपिडो' ही म्यानमारची राजधानी घोषित करण्यात आली.

म्यानमारचे क्षेत्रफळ ६.७७ लक्ष चौ.किमी असून पूर्व ते पश्चिम ९३६ किमी व उत्तरे ते दक्षिण २०५१ किमी पसरला आहे. त्याच्या उत्तर व ईशान्येला चीन (२२०४ किमी), पूर्व व आग्नेयला लाओस (२३८ किमी) व थायलंड (२१०७ किमी), पश्चिमेला बांगलादेश (२७१४ किमी) व भारत (१६४३ किमी) हे देश आहेत व दक्षिणेला अंदमान सागर व बंगालचा उपसागर आहे. म्यानमारला २२२८ किमीची किनारपट्टी लाभलेली आहे.

'बर्मी' ही म्यानमारची अधिकृत भाषा आहे. हा प्रमुखतः थेरवादी बौद्ध देश आहे. थेरवादी बौद्धमध्ये थुद्दम किंवा सुधम्म (संस्कृत- सुधर्म) निकाय** प्रचलित आहे. त्याव्यतिरिक्त श्वेगीन निकाय व द्वार निकाय सुद्धा अस्तित्वात आहेत.

म्यानमार शासनाने १३५ राष्ट्रीय वांशिक गटांना अधिकृतरित्या मान्यता दिली आहे; ज्यामध्ये बर्मन (किंवा बमर) ६८%, शान ९%, कारेन ७%, रखिन ४%, चायनीज ३%, भारतीय २%, मॉन २% व इतर ५% आहेत.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सन १६१२ला म्यानमारमध्ये (तेव्हाचा बर्मा/ब्रह्मदेश) दूत पाठवले. १८८६ला ब्रिटिशांनी म्यानमारचा आपल्या भारतावरील साम्राज्यात समावेश केला व १९३७ला स्वतंत्र वसाहतीचा दर्जा दिला. १९४८ला म्यानमार स्वतंत्र झाला.

*'बर्मा' हे नाव संस्कृतमधील 'ब्रह्मदेश' वरून उद्भवलेले आहे. 'ब्रह्मदेश' म्हणजे चराचराला व्यापलेली हिंदू देवता.

**निकाय- संप्रदाय, गट, संग्रह; एखाद्या बौद्ध संप्रदायाला किंवा बौद्ध सूत्रांच्या संग्रहाला हा शब्द वापरला जातो; मुख्यत्वेकरून थेरवादी बौद्ध भिख्खू विभागासाठी उपयोगात आणला जातो.
धार्मिक लोकसंख्या




सौजन्य : Census Atlas Myanmar- The 2014 Myanmar Population & Housing Census, Department of Population- Ministry of Labour, Immigration & Population with technical assistance from UNFPA, पृष्ठ २७


*२०१४ च्या जनगणनेत गणना केलेल्या लोकसंख्येवर आधारित टक्केवारी. (५०,२७९,९००)

**एकूण लोकसंख्येवर आधारित अंदाजे टक्केवारी म्हणजेच गणना केलेली व गणना न केलेली लोकसंख्या (५१,४८६,२५३). रखिन राज्यासंदर्भात गणना न केलेली लोकसंख्या लक्षणीय आहे, गणना न केलेली लोकसंख्या प्रामुख्याने इस्लामशी संबंधित आहे असे गृहित धरले आहे. गणना केलेल्या जनगणनेच्याआधी गोळा केलेल्या मॅपिंग माहितीवरून गणना न केलेली लोकसंख्या अंदाजे १,०९०,००० आहे व हा विश्वसनीय स्रोत ठरतो,

***०.१% पेक्षा कमी

गणना न केलेली लोकसंख्या विचारात घेतल्यास मुस्लिम लोकसंख्या २% वाढलेली दिसते. २२.४ लक्ष (२,२३७,४९५) मुस्लिम लोकसंख्येपैकी ११.२ लक्ष मुस्लिम रखिन राज्यात राहतात. तानीनथार्यी, यांगोन, मॉन व कायिन राज्यात ४.३% किंवा त्यापेक्षा जास्त मुस्लिम आहेत.

हिंदू लोकसंख्या गेल्या ४० वर्षापासून ०.५% च्या भोवती स्थिर आहे. देशात सर्वाधिक २.१% हिंदू बागो राज्यात राहतात व यांगोन व मॉन राज्यात १% हिंदू आहेत.

म्यानमारमध्ये बौद्धांनंतर ख्रिश्चन लोकसंख्या सर्वाधिक आहेत म्हणजेच अल्पसंख्यांकामध्ये बहुसंख्य आहेत. चिन राज्यात ते बहुसंख्य (८५.४%) आहेत. नव्वदच्या दशकापासून सैनिकी राजवट ख्रिश्चनांचे बळाने बौद्धधम्मात धर्मांतर करून चिन राज्यात बौद्धांची लोकसंख्या वाढवत असल्याचा आरोप आहे. त्यातील काही ख्रिश्चन भारतातील मिझोरम व मणिपूर राज्यात निर्वासित म्हणून राहत आहेत.३ कारेन ख्रिश्चन व शान बौद्ध म्यानमारच्या सैनिकी राजवटीविरुद्ध अधूनमधून सशस्त्र उठाव करत होते. ४

संदर्भ :

१. CSO- Central Statistical Organization, Ministry of Planning & Finance

२. The 2014 Myanmar Population & Housing Census- The Union Report: Religion, Census Report Volume 2-C, Department of Population- Ministry of Labour, Immigration & Population, Myanmar, July 2016, Page 5

३. गोडबोले, डॉ.श्रीरंग; बौध्द-मुस्लिम संबंध- आजच्या संदर्भात, तक्षशिला प्रबोधिनी प्रकाशन, २००९, पृष्ठ १०१

४. उपरोक्त, पृष्ठ १११

- अक्षय जोग 
@@AUTHORINFO_V1@@