तीन राज्ये, पाच खासदार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
स्वतंत्र भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात ईशान्य भारतातील राज्यांच्या निवडणुकींकडे कुणाचेच लक्ष नसायचे. 2018च्या निवडणुकीने मात्र केवळ भारताचेच नाही, तर जगाचेही लक्ष वेधून घेतले आहे. याचे श्रेय नरेंद्र मोदींनाच द्यावे लागेल. त्रिपुरातील कम्युनिस्टांची सत्ता निर्णायकपणे उलथवून तिथे आता भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आहे. त्रिपुरात 1978 ते 2018 या 40 वर्षांच्या काळात 1988 ते 1993 ही पाच वर्षे सोडली, तर उर्वरित काळात कम्युनिस्टांचेच सरकार होते. यावरून भाजपाच्या या विजयाची महत्ता लक्षात येईल. भाजपाच्या या विजयाला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काडीचेही महत्त्व न देत म्हटले की, त्रिपुरा, नागालॅण्ड व मेघालय ही तीन राज्ये केवळ पाच लोकसभा सदस्य निवडून देतात. ममता बॅनर्जींचा हा उसना आव, त्या किती धास्तावल्या आहेत, हेच दर्शवितो. कारण त्रिपुरातील 70 टक्के लोकसंख्या बंगाली आहे आणि त्रिपुरा व बंगालमधील बंगालींचे एक भावनिक नाते आहे. भारताच्या राष्ट्रीय राजकारणाचा विचार केला, तर ममता बॅनर्जी खूप काही चूक बोलल्या असे नाही. 545 सदस्यांच्या लोकसभेत ही तीन राज्ये केवळ पाच सदस्य पाठवितात. लोकसंख्येचा विचार केला, तर त्रिपुराची लोकसंख्या 36 लाख 71 हजार, नागालॅण्डची 19 लाख 80 हजार व मेघालयची 32 लाख 11 हजार इतकी आहे. नागपूर जिल्ह्याचीच लोकसंख्या 46 लाख 53 हजार आहे. त्यावरून ही राज्ये किती लहान आहेत, हे लक्षात येईल. त्यामुळे 9 कोटी 14 लाख लोकसंख्येच्या बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी, या विजयाला काडीचीही किंमत न देणे आपण समजू शकतो. आकारमान किंवा संख्येच्या बळावरच प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित होत नसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे क्षेत्रफळ किती होते? आजच्या भाषेत बोलायचे, तर ते तीन ते चार जिल्ह्यांपुरतेच असेल. पण, म्हणून त्यांच्या उत्तुंग कारकीर्दीची उंची आणि महत्त्व थोडेतरी कमी होते का? तसेच या त्रिपुरा-विजयाचे आहे. देवीच्या शक्तिपीठांपैकी एक पीठ- त्रिपुरसुंदरीचे मंदिर असलेल्या या लहानशा राज्यातील भाजपाचा विजय अनेक पैलूंनी, भारताच्या राजकारणात एक निर्णायक वळणिंबदू ठरणार आहे. याची कल्पना कॉंग्रेस, कम्युनिस्ट, तृणमूलसहित सर्व पक्षांना आहे. आपले धास्तावलेपण ते प्रकट करत नसतील, पण आतून ते पार कोसळले आहेत, हे नक्की! लवकरच निवडणुका होणार्‍या कर्नाटकातील कॉंग्रेसच्या एका खासदाराने म्हटले- ‘‘आमचा खेळ आता आधीच संपलेला दिसत आहे.’’
त्रिपुरात संघाचे व संघाच्या प्रेरणेने बर्‍याच वर्षांपासून कार्य सुरू आहे. हे कार्य, त्या राज्यात भाजपा सत्तेत यावी म्हणून आहे का? तसे समजणे चूक ठरेल. या देशात, कम्युनिझम नावाचा भारताबाहेरील अराष्ट्रीय विचार रुजविण्याचे जे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत, तो विचार समूळ उखडून फेकणे, हे संघाचे एक लक्ष्य आहे. त्याची एक पायरी म्हणजे तिथे राष्ट्रीय विचाराच्या भाजपाचे सरकार येणे ही आहे. 26 डिसेंबर 1925 रोजी भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. (संघाची स्थापना 1925च्या विजयादशमीला झाली) तेव्हापासून ही विचारसरणी भारतात रुजविण्याचे भरकस प्रयत्न झालेत आणि त्यात त्यांना केरळ, बंगाल व त्रिपुरा या राज्यांत यश मिळाले. बंगालमधील कम्युनिस्ट राजवट, ममता बॅनर्जींनी उखडून फेकली (आता त्या कम्युनिस्टांच्याच तोडीसतोड वागत आहेत, हा भाग वेगळा!). केरळमध्ये आलटून पालटून कॉंग्रेस व कम्युनिस्ट आघाडीची सत्ता येते. त्रिपुराच केवळ अभेद्य राहिले होते. त्रिपुरात असे मानले जायचे की, माणिक सरकारला हरविणे अशक्य आहे. माणिक सरकारचा पराभव आणि तोही, ज्याला पाच वर्षांपूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात केवळ 1.5 टक्के मते मिळाली होती, अशा भाजपासारख्याने करावा, ही अभूतपूर्व घटना नाही काय? आता उरले आहे केरळ. तिथला राजकीय हिंसाचार तर शहारे आणणारा आहे. कम्युनिस्टांच्या या हिंसाचारापुढे महात्मा गांधी, शांतिदूत जवाहरलाल नेहरूंचा कॉंग्रेस पक्षही तिथे हतबल आहे. या राज्यातून हा लाल दहशतवाद उखडून टाकणे, हेच आता पुढचे लक्ष्य असले पाहिजे. जिथे संघ-भाजपाचे काम करणे म्हणजे, मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखे असतानाही, तिथे लाखो कार्यकर्ते आपल्या विचारसरणीवर आजही ठामपणे उभे आहेत. त्यांना या त्रिपुरा-विजयाने किती हिंमत आली असेल! त्यांचा आत्मविश्वास किती दुणावला असेल! कम्युनिस्टांचा केरळात पराभव होऊच शकत नाही म्हणून, निव्वळ नाइलाजाने ‘विळा-हातोड्या’ला मतदान करणार्‍या बहुसंख्य मतदारांच्या मनात एक आशेचा किरण उगवला नसेल काय? या प्रश्नांची उत्तरे शोधली की, त्रिपुरा-विजयाचे किती महत्त्व आहे, हे लक्षात येते.
केवळ बाह्य साधनांनीच आत्मविश्वास, हिंमत वाढते असे नाही. सर्वसाधनयुक्त असूनही, बरेच वेळा अपयश पदरी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. बंगालचाच विषय आहे म्हणून बांगलादेशचे उदाहरण घेऊ या. पाकिस्तानी पाशवी अत्याचाराच्या विरोधात पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) मुक्तिवाहिनीने जे आंदोलन केले, त्याचा इतिहास अभ्यासणायोग्य आहे. काय होते या मुक्तिवाहिनीच्या कार्यकर्त्यांजवळ? फक्त जिद्द, हिंमत, आत्मविश्वास! पाकिस्तानच्या शक्तिशाली पॅटन रणगाड्यांसमोर ही 20-22 वर्षांची तरुण मुले-मुली, स्वत:च्या अंगावर बॉम्ब बांधून उडी घेत. त्यांच्या शरीराचे तुकडे होत, पण त्याच वेळी बॉम्बस्फोटामुळे रणगाडाही उद्ध्वस्त होत होता. कुठून आली ही हिंमत? त्रिपुरातील भाजपाच्या विजयाने केरळमधील समस्त भाजपा-संघ कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, हिंमत कितीतरी पटीने निश्चितच वाढली आहे. याचीच धास्ती कम्युनिस्टांना आहे. दुसर्‍या विचाराला केवळ थाराच नाही, तर त्या विचाराच्या व्यक्तीला जगातूनच नष्ट करणारी ही अमानवीय, पाशवी विचारसरणी आता केवळ केरळ राज्यात उरली आहे. त्रिपुरातील कम्युनिस्ट पक्ष कार्यालयावर पक्षाच्या नावाचा मोठा फलक आहे. त्यात एकाही भारतीय नेत्याचा फोटो नाही. जगभरातील जितके म्हणून कम्युनिस्ट नराधम, क्रूरकर्मे असतील, त्यांना तिथे स्थान आहे. 5 फेब्रुवारीला ‘द न्यू यॉर्क रीव्ह्यु ऑफ बुक्स’ नावाच्या वेबसाईटवर, एक परीक्षण आले आहे. त्याचे शीर्षक आहे- ‘हू किल्ड मोअर : हिटलर, स्टॅलिन ऑर माओ?’ (कुणी जास्त मारले : हिटलर, स्टॅलिन की माओने?) या तिघांनी आपल्या कार्यकाळात ज्या कोट्यवधी नागरिकांच्या हत्या केल्या, त्या हत्यांवर आधारित संशोधनात्मक पुस्तकांचे हे परीक्षण आहे. कम्युनिस्टांच्या पोलादी पडद्यामुळे रशिया व चीनमधील नरसंहाराचा नेमका आकडा कुणालाच कळला नाही. परंतु, काही संशोधकांनी परिश्रमपूर्वक व जीव धोक्यात घालून, काही माहिती गोळा केली व ती या पुस्तकांच्या रूपात प्रकाशित केली आहे. माओने केलेेल्या नरसंहाराचा काय अंदाज असेल? 3 ते 4 कोटी! स्टॅलिनही माओच्या फार मागे नाही. ही पुस्तकेही मुळातून वाचली पाहिजे. म्हणजे मग लक्षात येईल, लेनिनचा पुतळा मशीनने नाही, तर दुसर्‍या कुठल्या तरी िंनद्य पद्धतीनेच तोडायला हवा होता! इतकी भयानक ही कम्युनिस्ट विचारसरणी आहे. या विचारसरणीचे किती कोडकौतुक होते आम्हाला? आमचे साहित्यिक, विचारवंत, सतत अक्कल पाजळणारे दरबारी पत्रकार, शैक्षणिक बुद्धिवंत, शास्त्रज्ञ... सर्वच्या सर्व या कम्युनिस्ट विचारसरणीच्या अधीन झालेले आहेत. भारताच्या वैचारिक व सांस्कृतिक क्षेत्रावर याच लोकांनी कब्जा केला आहे. त्याला शंभर टक्के इंदिरा गांधी जबाबदार आहेत, हेही लक्षात ठेवले पाहिजे. अशी ही घातक विचारसरणी केरळमधूनही उखडून फेकली पाहिजे. एकदा का केरळ राज्यही कम्युनिस्टविहीन झाले की, मग या कम्युनिस्ट विचारसरणीला पोसणारे जे अस्तनीतील, विद्यापीठातील, सांस्कृतिक क्षेत्रातील साप आहेत, त्यांची वाफ होण्यास काही वेळ लागणार नाही. म्हणून, जरी ही तीन राज्ये केवळ पाच खासदार निवडून देत असतील, तरी या विजयाचे असे हे इतके महत्त्व आहे, ममताबाई!
श्रीनिवास वैद्य
8446017838
@@AUTHORINFO_V1@@