टी.व्ही.नसल्याने बालपणी खूप काही शिकता आले : हेमाताई अमळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |

विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महिला दिनी प्रकट मुलाखत


 
जळगाव :
आमचे बालपण आनंदात आणि खूप काही शिकण्यात गेले. कारण त्याकाळी टी.व्ही.नव्हता, असे प्रतिपादन ‘खान्देश महिला सक्षमीकरण’ पुरस्कारप्राप्त तसेच विवेकानंद प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्षा हेमाताई अमळकर यांनी आज प्रकट मुलाखतीत करीत सार्‍यांना गमती जमती सांगत आपल्या बालपणाची सफर घडवून आणली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांना बोलते केले.
 
 
दरवर्षी जगभरात ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरातील विविध क्षेत्रातील महिलांचे कौतुक करत आणि त्यांच्याप्रती सन्मान व प्रेम व्यक्त केले जाते. तसेच अर्थ, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थही हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने खूप काही सहज शिकवून जाणारा हा सुंदर उपक्रम झाला. व्यासपीठावर त्यांच्यासह एकात्मिक विकास प्रकल्प, यावल सहाय्यक प्रकल्प अधिकारी ए. एस. ठाकरे, प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, सेमी विभागाचे मुख्याध्यापक हेमराज पाटील हे होते.
 
 
या मुलाखतीचे वैशिष्टय म्हणजे शाळेतील इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थिनी आर्या रामटेके, साक्षी शिनकर, आर्या कुळकर्णी, पूर्वा पाटील, पलक ओझा, चैताली भोरटक्के या चिमुकल्या विद्यार्थिनींनी हेमाताई यांची मुलाखत घेतली.
 
 
आधी चौथीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘विद्यार्थ्यांनी बनविले शाळेचे नियम’ या हस्तलिखिताचे प्रकाशन हेमाताई अमळकर यांच्या हस्ते झाले. या हस्तलिखिताच्या मार्गदर्शक व प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रम प्रमुख संध्या देशमुख ह्या होत्या.
 
 
हेमाताईंच्या मुलाखतीत विद्यार्थ्यांनी हेमाताईंच्या बालपणाविषयी तसेच त्यांच्या सामाजिक कार्याविषयी प्रश्न विचारले त्यांच्या प्रश्नांची ताईंनी अतिशय साध्या सोप्या भाषेत उत्तरे दिली. तसेच बालपणातील गमती जमती सांगितल्या व बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ताईंनी सांगितले आमचे बालपण अतिशय आनंदात गेले फार गोष्टी शिकण्यात गेले, कारण आमच्या बालपणात टी.व्ही. नव्हता.
 
 
तसेच ताईंना विद्यार्थ्यांनी विचारले असता आपल्या मते शिक्षणाचे माध्यम कोणते असावे ? तेव्हा ताई म्हणाल्या की, जी आपली विचार करण्याची भाषा आहे तीच आपली शिक्षणाची भाषा असावी. तसेच ताईंनी मुलांना ‘आपण समाजाचे देणे कसे लागतो’ ते समजावून सांगितले व एकत्रित कुटुंबाचे महत्त्व सांगितले.
 
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संगीत शिक्षिका शितल सोनवणे यांनी विद्यार्थिनींसोबत ‘कोमल है कमजोर नहीं’ हे गीत सादर केले. तसेच सूत्रसंचालन स्मिता भामरे व प्रास्ताविक लिना जोशी तसेच आभारप्रदर्शन दीपश्री कोळी यांनी केले. प्राथमिक विभागाच्या समन्वयिका रत्नमाला पाटील व सर्व शिक्षिक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
 
@@AUTHORINFO_V1@@