भाषा आणि देवता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018   
Total Views |
 

 
 
ज्याप्रमाणे ‘भाषा’ हा सांस्कृतिक एकत्वाचा घटक आहे, तसेच ‘दैवते’ ही सांस्कृतिक विकासाचा घटक आहेत. विविध देवता या विविध सांस्कृतिक संकल्पनांच्या निदर्शक असतात. त्यामुळे राजकीय व सांस्कृतिक महत्त्वाकांक्षेतून जे नकारात्मक भाषिक अस्मितांचा खेळ मांडला जात आहे, त्यावर उपाय म्हणून बहुभाषिक लोकदैवतांचे बहुभाषिकत्व आवर्जून ठसविण्याची वेळ आली आहे.
 
गेल्या आठवड्यात मुंबई विद्यापीठाचे लोककला अध्यासन आणि अन्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात जाण्याचा योग आला. प्रत्येक समाजात ‘अभिजन’ व ‘बहुजन’ असे दोन घटक असतात. समाज चालविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे अभिजनांनी मानलेले असते. हा वर्ग बुद्धीने काम करतो व सर्व समाजाचे हित केवळ आपल्यालाच कळते, अशी त्याची भावना असते. त्यासाठी या वर्गाने कायदे, रूढी, परंपरा, तत्त्वज्ञाने अशी विविध हत्यारे तयार केलेली असतात व त्या आधारावर हा वर्ग बहुजनांवर राज्य करत असतो. बहुजन वर्ग हा भावनाशील असतो. त्याच्या प्रतिक्रियाही भावनिक असतात. अभिजनांबद्दल त्याच्या भावना दोन प्रकारच्या असतात. एका प्रकारे कोणत्याही व्यवस्थेशी जुळवून घेत असताना त्याची भावनिक कोंडी होत असते. त्यामुळे प्रचलित परिस्थितीवरचा राग त्याच्या मनात असतो, पण तरीही त्याला अभिजनांसारखे बनायचे असते. त्याचे त्याच्या मनात सुप्त आकर्षण असते. बहुजनांच्या प्रेरणा अधिक नैसर्गिक असतात. त्यात बराच भावनिक भाबडेपणा असतो. त्याचा वापर करून अनेक भावनिक प्रतिकांच्या साहाय्याने बहुजनांना प्रेरित केले जाते. जोवर लोकशाहीची संकल्पना प्रत्यक्षात उतरली नव्हती, तोवर धार्मिक प्रतिके, सरंजामशाही याच्या आधारे लोकमानसावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असे. पण, लोकशाहीत हे स्वरूप बदलले आहे. बहुजनांना आपल्या हक्काची जाणीव झाली आहे. तरीही बहुजनांच्या ऐहिक आकांक्षा व भावनिक आवश्यकता यात अनेकदा सुसंवाद असत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांच्या आश्वासनात या दोन्हींची खैरात केलेली असते.
 
भाषा व त्या आधारे तयार झालेली संस्कृती ही समाजाचे समूहमन तयार करते. भूतकाळाचे संचित, वर्तमानातील संवाद व भविष्यातील स्वप्ने यांनी समाजमनाला आकार दिलेला असतो. त्यामुळे भाषिक जपणूक ही सांस्कृतिक जपणुकीसाठी महत्त्वाची बनते. त्यामुळे समाज एकसंध राहाण्यासाठी ‘भाषा’ हा महत्त्वाचा दुवा मानला गेला. युरोपमध्ये तर राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे ‘भाषा’ हे महत्त्वाचे माध्यम बनले. लोकभाषांचे हे सामर्थ्य ओळखून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींनी भाषावार प्रांतरचनेला महत्त्व दिले. इंग्रज गेल्यानंतर लोकभाषेत व्यवहार व्हायचे असतील, तर भाषावार प्रांतरचनेमुळे त्यात सुकरता येईल, हा त्यामागचा विचार होता. परंतु, भारताला स्वातंत्र्य मिळताना धार्मिक आधारावर झालेल्या फाळणीला तोंड द्यावे लागले. भाषावार प्रांतरचना केली, तर धर्माप्रमाणेच भाषा हेही अलगतेचे एक कारण बनू नये म्हणून नेहरू व पटेलांनी भाषावार प्रांतरचना करण्यात चालढकल सुरू केली. त्याचा परिणाम प्रथम आंध्रमधल्या व नंतर महाराष्ट्रातील संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झाला. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर ‘अतिरेकी भाषाभिमान’ हा चिंतेचा विषय बनू लागला आहे. एका बाजूने स्थानिक भाषेत शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्था बंद पडत असताना राजकीय कारणासाठी व सांस्कृतिक साम्राज्यवाद जोपासण्यासाठी भाषिक अभिनिवेशाला खतपाणी घातले जात आहे. अभिजनांची प्रमाण भाषा व बहुजनांची लोकभाषा असाही नवा संघर्ष त्यातून उत्पन्न झाला आहे. आपला भाषिक अभिमान जोपासण्यासाठी इतर भाषांकडे शत्रुत्वाने पाहिले जात आहे. मध्यंतरी महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्नाटकातील एका कार्यक्रमात कन्नड गीत गायले, हा जणू काही त्यांचा अपराध झाला असे समजून त्यांच्यावर एका विशिष्ट वर्गातून टीका करण्यात आली. वास्तविक राज्यसीमेवरील प्रदेशात लोकांच्या सोयीसाठी प्रशासनाने बहुभाषिक धोरण स्वीकारायला हवे. पण ते न करता राज्याचीच भाषा अट्टाहासाने लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. म. गांधींनी लोकहितासाठी भाषावार प्रांतरचनेची संकल्पना मांडली. तिने आता भाषिक साम्राज्यवादाचे विकृत स्वरूप धारण केले असून ते राज्यकर्त्या अभिजनवर्गाचे राजकीय हत्यार बनले आहे व त्याचा वापर करून भाषिक तेढ वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत.
 
या वातावरणात देशाची एकात्मता टिकवायची असेल तर केवळ घटनात्मक तरतुदी सांगून उपयोगी नाही. त्याकरिता लोकसंस्कृतीवर आधारित नवे मार्ग शोधावे लागतील. लोकसंस्कृतीवरील चर्चेत एक मुद्दा प्रकर्षाने समोर आला, तो म्हणजे राज्य सीमाप्रदेशातील सर्व लोकदैवतांचे भक्त बहुभाषिक आहेत. त्यामुळे तेथील लोककलांचे आविष्कारही बहुभाषिक आहेत व ते सहजपणे एका भाषेतून दुसर्‍या भाषेत बदलत असतात. ज्याप्रमाणे ‘भाषा’ हा सांस्कृतिक एकत्वाचा घटक आहे, तसेच ‘दैवते’ ही सांस्कृतिक विकासाचा घटक आहेत. विविध देवता या विविध सांस्कृतिक संकल्पनांच्या निदर्शक असतात. त्यामुळे राजकीय व सांस्कृतिक महत्त्वाकांक्षेतून जे नकारात्मक भाषिक अस्मितांचा खेळ मांडला जात आहे, त्यावर उपाय म्हणून बहुभाषिक लोकदैवतांचे बहुभाषिकत्व आवर्जून ठसविण्याची वेळ आली आहे. भारतामध्ये अनेक प्रकारच्या विविधता असूनही लोकमनामध्ये जी सांस्कृतिक एकत्वाची जाणीव आहे, त्यामुळे या विविधतांचे वेगळेपणात रुपांतर झाले नाही. पण, आता राजकीय स्वार्थासाठी आपली वेगळी मतपेढी तयार करण्यासाठी वेगळेपणाच्या अस्मिता जोपासल्या जात आहेत. त्यावर मात करायची असेल तर लोकसंस्कृतीतून निर्माण झालेले एकात्मतेचे भावबंध पुन्हा जागविण्याची आवश्यकता आहे. एखादी संकल्पना बहुजनांच्या संस्कृतीत बहरली की, त्याची दखल अभिजनांना घ्यावीच लागते. एकेकाळी पुरोगामीपणा व आपण कसे हिंदूंच्या विरोधात आहोत, असे सांगणे हा अभिजनांच्या अभिमानाचा विषय होता. परंतु, जसा बहुजनांमध्ये हिंदुत्वाबद्दल अभिमान उत्पन्न झाला तसे अभिजनांचे मुकुटमणी शशी थरूर यांनाही ’व्हाय आय एमए हिंदू?’ हे पुस्तक लिहावेसे वाटले. त्याचप्रमाणे जेव्हा एकात्म बहुजनवादी लोकसंस्कृतीचा प्रभाव निर्माण होईल तेव्हा छोट्या छोट्या अस्मितांचे प्रश्न निर्माण करून समाज विभाजित करण्याचे जे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण सुरू आहे त्याला आळा बसेल.
 
 
 
 
- दिलीप करंबेळकर 
 
@@AUTHORINFO_V1@@