अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील समायोजन घोटाळ्याची एसआयटी चौकशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |




शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई : अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील विशेष शिक्षक- परिचर यांना राज्यातील प्राथमिक शाळेत सामावून घेण्याबाबत झालेल्या नियुक्त्यांमध्ये घोटाळा झाला असून, या प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. तसेच यामध्ये कोणीही दोषी आढळल्यास त्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनदेखील त्यांनी यावेळी दिले.


राज्यात २००९ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक अपंग युनिट बंद झाल्यानंतर शासनाने टप्प्याटप्प्याने ५९५ शिक्षकांचे राज्यातील जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील रिक्त पदांवर संबंधित शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश दिले होते. मात्र या समायोजनाच्या नियुक्त्यांमध्ये घोळ झाल्याचा दावा लक्षवेधीद्वारे उपस्थित करण्यात आला होता.


तत्कालिन सरकारच्या कारकिर्दीत काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये आणि मंत्रिमंडळासाठी सादर करण्यात आलेल्या आकडेवारीच्या टिप्पणीत तफावत असून या नियुक्त्या करताना ग्रामविकास खात्याचे पत्रक दाखवायचे आणि नियुक्ती करायचे असे प्रकार यापूर्वी झाले असल्याचे तावडे म्हणाले. या नियुक्त्या ६ जिल्ह्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. परंतु शिक्षण संचालक आणि ग्रामविकास अवर सचिव यांच्यामार्फत जे परिपत्रक वितरित करण्यात आले आहे ते परिपत्रक बोगस असल्याची शंका येत आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात येईल, अशी घोषणा तावडे यांनी केली. या प्रकरणाची अतिशय सविस्तर व सखोलपणे चौकशी व्हावी आणि या प्रकरणात गुंतलेल्या दोषींना कठोर शासन व्हावे, ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे या एसआयटी मध्ये राज्य सरकारचा प्रशासकीय अधिकारी, पोलिस उपमहानिरिक्षक, शिक्षण आयुक्त, ग्रामविकास खात्याचे उच्च अधिकारी आदींचा समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@