शिवस्मारक जगातील सर्वात उंच स्मारक !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |




पुतळ्याची उंची कमी केली नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. या स्मारकाची रचना व त्याची उच्नही ही योग्य गुणोत्तर प्रमाणात ठरवण्यात आली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय उपस्थित केला. या स्मारकामधील महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. या पुतळ्याचे डिझाईन आमच्या काळात मीच विशेष लक्ष घालून बनवले होते मात्र, आताचे सरकार छत्रपतींच्या पुतळयाची उंची ११२ फुटाने कमी करण्याचा कट रचत असल्याचा दावाही पाटील यांनी केला. दरम्यान, या स्थगन प्रस्तावावर उत्तर देताना वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या स्मारकाद्वारे जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार केला जाईल आणि पुतळयाची कोणतीही उंची कमी केली जाणार नाही असे आश्वासन दिले.
 
 
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवस्मारक हा तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाचा विषय आहे. २१० मीटरचा हा पुतळा तयार करण्याचा निर्णय झाला तो त्याच उंचीचा राहील यात शंका नाही. स्मारकाबाबत २००१ मध्ये निर्णय होऊनही प्रत्यक्ष कार्यादेश देण्यास २०१८ हे वर्ष उजाडले. याबद्दल मागच्या सरकारच्या वतीने मी जनतेची माफी मागतो. तुम्ही हा राजकारणाचा विषय केला तर तुमच्याकडे चार बोटे जातात. हा राजकारणाचा विषय होत नाही, असेही मुनगंटीवार यांनी विरोधकांना सुनावले. तसेच, हिम्मत असेल तर चर्चा करा. तुमच्या १५ वर्षात तुमच्या सरकारने छत्रपतींसाठी काय केले आणि आम्ही सत्तेवर आल्यावर तीन वर्षांत काय निर्णय घेतले, यावर चर्चा कराच, असे आव्हानही वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी केले.
 
 
सरकारच्या या स्पष्टीकरणानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्याने शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे आक्रमक झाले. आम्ही स्मारक करतो आहोत म्हणून यांच्या पोटात दुखत आहे. यांनी महाराजांच्या स्मारकासाठी काहीही केले नाही, अशी टीका करत, उद्या या विषयावर चर्चा ठेवा, आजचे कामकाज चालवा, अशी मागणी तावडे यांनी केली.
 
 
जगातील सर्वात उंच स्मारक उभारणार
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीच्या बाबतीत स्पष्टीकरण देताना तांत्रिक बाजू स्पष्ट केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, हे स्मारक जगातील सर्वात उंच स्मारक असेल अशी ग्वाही दिली. केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता होती परंतु तुम्हाला एक विटही रचता आली नाही. आमचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे व या जगातील सर्वात उंच स्मारक उभारणार आहे. या स्मारकाची उंची व रचना ही त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून योग्य गुणोत्तर प्रमाणात ठरवण्यात आलेली आहे. हे स्मारक पुढे ३००-५०० वर्षे टिकावे अशा दर्जाचे बनवायचे असल्यास पुतळ्याचा चौथरा आणि प्रत्यक्ष पुतळा यांचे गुणोत्तर ६०-४० असेच असायला हवे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
 
ही विरोधकांची कोल्हेकुई : आशिष शेलार
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचेच होणार असून त्यासाठीच्या आवश्यक परवानग्या सरकारने मिळविल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात सरकार आल्यानंतर सर्व परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करून स्माराकासाठीचा सल्लागार व कंत्राटदाराच्या नियुक्तीची प्रक्रिया ही पूर्ण होत आली आहे. आघाडी सरकारने १५ वर्षात जे केले नाही ते भाजप सरकारने ९०० दिवसात केले आहे. अशावेळी आपल्या हाताला काही लागत नाही म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आता कोल्हेकुई करत आहेत. यांनीच १९९९ मध्ये स्मारकाची घोषणा केली त्यानंतर २००१ मध्ये यांचे सरकार आले. २०१४ पर्यंत त्यांचे सरकार असताना काहीच केले नाही. आता स्मारकाबाबत नाहक वाद निर्माण करून स्मारकाला उशीर तर करण्याचा प्रयंत्न काँग्रेस राष्ट्रवादी कडून केला जात नाही ना ? अशा शब्दात मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार अॅड. आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली.
 
 
महसूलमंत्र्यांचे निवेदन
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या निवेदनात, पुतळा व चौथऱ्याचे गुणोत्तर साठास चाळीस असेल तर पुतळ्याची उंची २१० मीटर असेल असे स्पष्ट केले. त्यामध्ये पुतळा व भरावासह चौथरा यांची उंची अनुक्रमे १२१.२ मीटर व ८८.८ मीटर एवढी असेल. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समितीने सर्व तांत्रिक बाबी तपासून ही उंची प्रस्तावित केली होती. त्यास उच्चस्तरीय सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार सविस्तर नकाशे व आराखडा तयार करून त्या आधारे जागतिक स्तरावर खुल्या निविदा मागविण्यात आल्या आणि २१० मीटर उंचीच्या पुतळ्यासह प्रकल्पासाठी कंत्राटदाराला 'स्वीकृती पत्र' देण्यात आले आहे. जागतिक स्तरावरही पुतळ्याची उंची ही चौथऱ्यासहच मोजली जाते, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी नमूद केले.
@@AUTHORINFO_V1@@