नाणार प्रकल्प केंद्र सरकारचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |

मुख्यमंत्रीच निर्णय घेणार; उद्योगमंत्र्यांकडून पुन्हा तेच उत्तर

 
 
 
 
 
मुंबई : नाणार प्रकल्प हा केंद्र सरकारचा असून त्याबाबत मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हेच निर्णय घेतील असे उत्तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत दिले. मोठ्या प्रमाणात विरोध होत असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत लक्षवेधी विधानसभेत पार पडली. मात्र, केवळ दहा मिनिटांमध्ये ही लक्षवेधी उरकल्याने ही लक्षवेधी अधिक लक्षवेधी ठरली. मोठ्या प्रमाणात विरोध करत असलेले शिवसेनेचे नेतेही यावेळी अनुपस्थित होते.
 
नाणार प्रकल्पाबाबत लक्षवेधी काँग्रेसच्या आमदार हुन्सबानो खलिफे यांनी उपस्थित केली होती. नाणार परिसरात उभारल्या जाणा-या या प्रकल्पाला विरोध असतानाही हा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जात आहे. असे असतानाही या परिसरात दीड हजार मेगा व्हॅटचा औष्णिक प्रकल्पही आणला जात असून ही गंभीर बाब असल्याचे खलिफे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांना येथील ९७ टक्के लोकांचा विरोध आहे. अशावेळी हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली जाईल का असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, हा प्रकल्प केंद्र सरकारचा असून प्रकल्प रद्द करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असे पूर्वीचेच उत्तर देसाई यांनी दिले. हिवाळी अधिवेशनातही देसाई यांनी हेच उत्तर दिले असे सांगत त्यांच्या उत्तरावर खलिफे यांनी नाराजी व्यक्त केली.
 
.... तर मंत्रिपद सोडेन
  
दरम्यान, राजापुर येथील प्रांताधिकारी सामांन्यांवर मुजोरी करत असल्याचा आरोप आ. भाई जगताप यांनी केला. यावेळी मंत्रिपद सोडेन पण कोकणवासीयांवर अन्याय होऊ देणार नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@