आठवड्याभरात विनानिविदा कचरा प्रक्रिया मशीन्स खरेदी करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |

पर्यावरण मंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती
औरंगाबाद कचरा प्रकरण...
 
 
 

 
 
मुंबई : औरंगाबादमध्ये गेल्या २० दिवसांपासून निर्माण झालेला कचरा प्रश्न गंभीर असून कचऱ्याच्या शास्त्रशुद्ध विघटनासाठी लागणारी मशीन्स विनानिविदा प्रक्रिया खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. याचा सर्व खर्च शासन उचलणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादेत निर्माण झालेला कचरा प्रश्न हा दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत आहे. या प्रकरणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी स्थगन मांडत यावर चर्चा करण्याची विनंती केली. मात्र, तालिका सभापतींनी स्थगन फेटाळत सरकारला अर्थसंकल्पापूर्वी निवेदन सादर करण्याचे आदेश दिले. याचवेळी रामदास कदम यांनी कोणत्याही निविदा न काढता कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मशीन्स खरेदी करणार असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. आठवड्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून लवकरच कचरा प्रश्न सुटणार असल्याचे कदम म्हणाले. या प्रकरणी निर्णय घेण्यात उशीर झाल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच औरंगाबाद महानगरपालिकेला कचरा प्रकरणी तीन वेळा नोटीसा बजावल्याचेही त्यांनी सांगितले.
 
सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार :
 
कचरा प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णायाविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिची पर्यावरण मंत्र्यांनी दिली. तसेच मशीन्स येईपर्यंत खदानात कचरा टाकण्यात येणार असून गरज पडल्यास आपण स्वत: त्या ठिकाणचा दौरा करू असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शेजारच्या गावासाठीही पाच कोटींचा विकासनिधी देणार असल्याचे ते म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@