राज्यातील रस्त्यांवरील ९९ टक्के खड्डे भरले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |



सा. बां. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विधानसभेत दावा

मुंबई : राज्यातील कमी रुंदीच्या रस्त्यांवर वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रस्ते खराब होत आहेत. मात्र, तरीही राज्यात असलेल्या ८९ हजार १२५ कि.मी.लांबीचे राज्य महामार्ग, प्रमुख रस्ते, जिल्हा मार्गांवरील ९९.१८ टक्के रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आले असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला.

विरोधी व सत्ताधारी पक्षांनी विधानसभा नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, यातील काही खड्डे हे भरण्याच्या पलीकडे असून या रस्त्यांच्या बळकटीकरणासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. एकूण ५६ हजार ४७७ कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी मंत्रालयात वॉर रुम सुरु करण्यात आली होती तसेच मोबाईल ॲप देखील तयार करण्यात आले होते. हायब्रिड ॲन्युटीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला असून या माध्यमातून १० हजार कि.मी. लांबीचे रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतमाला प्रकल्पांतर्गत राज्यात ६५ हजार कि.मी.चे रस्ते तयार करण्यात येणार आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

गूळ हवाय की नको ?

नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षांकडून बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजीत पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना पाटील यांच्या ‘जनतेला भेटवस्तू द्या’ अशा आशयाच्या विधानावर टीका केली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना पाटील यांनी माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. जनतेशी संवाद साधा असेच मी त्यावेळी सांगितले होते. आता कुठेही कोणाकडेही जाताना आपण काहीतरी घेऊन जातोच. मी दरवर्षी आमच्याकडचा गूळ आपणा सर्वांना देतो. उद्याही देणार आहे. त्यावरही तुम्ही भेटवस्तू दिली म्हणून आक्षेप घ्याल. आता मी गूळ तरी देऊ की नको? त्यावर अनेक सदस्यांनी ‘द्या’ असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
@@AUTHORINFO_V1@@