कापसाची गरज भागविण्यासाठी चीनची भारताकडे धाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |
 
 
 
कापूस उत्पादनात भारत लवकरच पोहोचेल क्रमांक एकवर
 
 

मुंबई : कापूस लागवडीचे नियोजन चुकल्याने चीनमधील कापूस उत्पादनावर परिणामझाला आहे. ३५० लाख गाठी (एक गाठ म्हणजे १७० किलो कापूस) एवढे कमी उत्पादन झाल्याने चीनने यंदा ६०० लाख गाठींची गरज भागविण्यासाठी बफर स्टॉकमधील कापूस बाहेर काढला असून त्याचा वापर वाढवला आहे. सोबतच चीनने आशियाई देशांकडे कापूस आयातीसाठी चौकशी सुरू केली आहे. परिणामी भारताने चीनमध्ये सुमारे पाच लाख गाठींची निर्यात केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरांमध्ये घसरण होणार नाही तर दर वाढतील, अशी माहिती बाजार विश्लेषकांनी दिली. दरम्यान, जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश अशी चीनची ओळख मागे पडली असून, भारत उत्पादनात जगात क्रमांक एकची जागा यंदा घेईल, अशी माहिती बाजारपेठ विश्लेषकांनी दिली आहे.

मागील दोन वर्षे चीनने संरक्षित साठ्यावर भर दिला. कापूस लागवड नियोजन (क्रॉप प्लॅनिंग) केले. त्यातच तेथील यंगत्से नदीच्या खोर्यातील भागात कापूस उत्पादनावर परिणामव मर्यादा आल्या आहेत. आजघडीला तेथील संरक्षित साठा एक कोटी गाठी एवढा आहे. संरक्षित साठ्यासह देशांतर्गत वापरासंबंधी चीनला आयातीवर अवलंबून राहण्याची वेळ आली असून, चीन पुढील सात ते आठ महिन्यांत सुमारे २० ते २५ लाख गाठींची आयात करेन, असे संकेत जाणकारांनी दिले आहेत.

 

शिलकी गाठी १० लाखांनी कमी होणार

मुंबईतील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकानजीकच्या कॉटन बिल्डींगमध्ये नुकतीच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची (सीएआय) बैठक पार पडली. त्यात यंदाच्या कापूस हंगामासंबंधी अंदाज व्यक्त करण्यात आला असून, शिलकी गाठींचे प्रमाण १० लाख गाठींनी घटेल, असे म्हटले आहे. भारताची यंदा देशांतर्गत गरज ३२० लाख गाठी एवढी असेल, तर उत्पादन ३६० लाख गाठी एवढे होईल. यापैकी ५५ लाख गाठींची निर्यात अपेक्षित आहे. आयातही ३५ ते ४० लाख गाठींपर्यंत होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची माहिती या असोसिएशनचे सदस्य अनिल सोमाणी यांनी दिली.

 

३६ लाख गाठींची निर्यात

देशातून आशियाई देशांमध्येच गाठींची निर्यात झाली असून, बांगलादेशात सर्वाधिक १४ लाख गाठींची निर्यात झाली. त्यापाठोपाठ पाकिस्तानमध्ये सुमारे नऊ लाख गाठी गेल्या आहेत. तसेच चीन, तुर्की, व्हिएतनाम, इंडोनेशिया येथेही निर्यात झाली आहे. अलीकडे रुपया डॉलरपेक्षा थोडा कमकुमत झाल्याने निर्यातीला थोडी चालना मिळाली, परंतु किडक्या कापसाची रुई बहुराष्ट्रीय कंपन्या नाकारत असल्याचे सांगण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@