जळगांव परिमंडळात ३१ हजार ७२७ ग्राहकांनीएक वर्षाचे वीज देयक थकविले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |
 

जळगांव परिमंडळात ३१ हजार ७२७ ग्राहकांनी

एक वर्षाचे वीज देयक थकविले

जळगांव - महावितरणच्या जळगांव परिमंडळातील ३१ हजार ७२७ ग्राहकांनी एक वर्षापासून वीज देयकांचा भरणा केला नाही. या ग्राहकांकडे ९७ कोटी १५ लक्ष रुपये वीज देयक थकीत आहे.

जळगांव परिमंडळातील ३१ हजार ७२७ ग्राहकांनी १ एप्रिल २०१७ पासून वीज देयकांचा भरणा केला नाही. त्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील २९ हजार ८८६ ग्राहकांकडे १९ कोटी १७ लक्ष रुपये वीज देयक थकीत आहे. सार्वजनिक पाणी पुरवठा १ हजार ३६१ ग्राहकांकडे ७६ कोटी ९८ लक्ष रुपये, सार्वजनिक सेवा ४५५ ग्राहकांकडे ४० लक्ष २५ हजार रुपये, पथदिव्यांच्या २५ ग्राहकांकडे ६५ लक्ष रुपयांची वीज देयके थकली आहेत. जळगांव मंडळातील १९ हजार ग्राहकांनी ६० कोटी ७ लक्ष रुपये, धुळे मंडळातील ४ हजार ४४३ ग्राहकांनी २३ कोटी ४७ लक्ष रुपये तर नंदूरबार मंडळातील ८ हजार २८४ ग्राहकांनी १३ कोटी ५९ लक्ष रुपये वीज देयक थकविले आहे.

जळगांव शहर विभागातील ८ हजार ३९४ वीज ग्राहकांनी एक वर्षापासून देयकांचा भरणा केला नाही. या विभागातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहक सर्वाधिक उदासिन असल्याचे दिसते. त्यांनी ११ कोटी ९ लक्ष रुपये वीज देयक थकविलेआहे. धरणगांव विभागातील १७० सार्वजनिक पाणी पुरवठा ग्राहकांनी सर्वाधिक १५ कोटी ३७ लक्ष रुपये थकविले आहेत.


महावितरणने थकबाकी वसूलीसाठी वीज पूरवठा खंडीत करण्याचा पवित्रा घेतला आहे. वीज बिल वसूलीच्यावेळी ग्राहकांकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिविगाळ, धक्काबुक्की, मारहाण असे अनुचित प्रकार कार्यक्षेत्रात घडत असल्याचे चित्र दिसते.  देयक भरण्यासाठी ग्राहकांना १५ दिवसाची मुदत दिली जाते.  साधारणपणे वीज सेवेचा उपभोगानंतर दीड महिन्यांनी वीज देयकाची मागणी केली जाते. तरी सुध्दा ग्राहक नियमित वीज देयक भरण्यात उदासिनता दाखवितात. महावितरणकडून नाईलाजास्तव थकीत देयकांच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहिम हाती घेतली जाते. त्यावेळी ग्राहक वसुली कर्मचाऱ्यांस वीज देयक भरण्यास विलंबाची विविध कारणे देऊन वाद निर्माण करतात. कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या/जनतेच्या रोषास सामोरे जावे लागते. ग्राहक व कर्मचारी दोहोंना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ग्राहकांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वादाचे प्रसंग उद्भवू नये यासाठी ग्राहकांनी नियमित वीज देयके भरुन सहकार्य करावे व तत्पर व दर्जेदार वीज सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता  ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@