जळगावकर तापाने फणफणले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |

 
 
जळगावकर तापाने फणफणले
वातावरणातील बदलाचा परिणाम; बालकांचे प्रमाण अधिक
 
जळगाव, ५ मार्च
मागील आठवड्यापासून उन्हाचा कडाका वाढला होता. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.
सकाळी-सकाळी ढगाळ वातावरण आणि दुपारी कडक उन्ह असे विचित्र वातावरण सध्या आहे. वातावरणातील या बदलामुळे साथीचे आजार बळावले आहेत.
वातावरणातील बदलामुळे विषाणूंची संख्या वाढल्याने सर्दी-तापाचे रुग्ण वाढले आहेत. बालकांचे प्रमाण अधिक आहे.शहरातील जिल्हा रुग्णालयासह महापालिकेचे तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची उपचारासाठी गर्दी होत आहे.
 
 
सर्दी, तापासोबतच गोवर आणि कांजण्या या रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे, अशी माहिती डॉ. विजय घोलप यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.
दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वातावरण विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच सर्दी, ताप, खोकला या विषाणूजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. लहान मुलांना याचा अधिक त्रास होत असल्याचेही डॉ. विजय घोलप यांनी सांगितले.
गोवर, कांजण्यांपासून असा करा बचाव
लहान मुलांमध्ये गोवर व कांजण्या या आजारांचीही साथ सध्या जोरात सुरू आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती पुरेशी नसल्याने त्यांना कुठल्याही आजाराची लगेचच लागण होते. यासाठी त्यांना सकस आहार द्यावा. मोसंबी, संत्री यासह ऊसाचा रस, लिंबूपाणी हे रसयुक्त पदार्थ सेवन करायला द्यावे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी सकाळी किंवा रात्री दुधात ओले खजूर, जायफळ, सुकामेवा किंवा हळद घाललेले दूध दिल्यास फायदा होईल, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सुचवले
आहे.
सकस आहार आणि नियमित व्यायाम हवा
या बदलत्या वातारणात स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी, सकस व ताजे अन्न खावे, नियमित व्यायाम करावा. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. गोवर आणि कांजण्या हे संसर्गजन्य आजार असल्याने मोठ्या व्यक्तींनादेखील याची लागण होवू शकते. त्यासाठी रात्री झोपताना हळद, जायफळ घातलेले दूध प्यावे. त्यामुळे विषाणूंपासून बचाव होईल, असा सल्लाही डॉ. घोलप यांनी दिला.
 
@@AUTHORINFO_V1@@