शहरात नाशिकच्या धर्तीवर कचर्‍याचे संकलन होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 

एकाच कंपनीला कामाचा ठेका देण्याचा महापालिकेचा विचार 

 
 
 
जळगाव :
घनकचरा प्रकल्पास राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरातील कचर्‍याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून संकलन करणे आणि संकलित झालेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणे या कामाचा ठेका एकाच कंपनीला देण्याचा महापालिकेचा विचार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली.
 
 
नाशिक महापालिकेच्या धर्तीवर जळगावात हा प्रयोग महापालिका राबवणार असून त्यासाठी आयुक्तांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. जळगाव महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पासाठी ३०.७५ कोटी रुपयांचा डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) तयार करण्यात आला असून त्याला नुकतीच राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेकडून आता पुढील हालचालींना गती देण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी जैन इरिगेशन कंपनीने खासगी तत्त्वावर शहरातील प्रमुख व्यापारी संकुलांसह भाजीपाला बाजार व बाजारपेठेतील ओला कचरा संकलित करण्याची तयारी दर्शवली होती. तसा प्रस्तावही जैन इरिगेशनने महापालिका प्रशासनाला दिला. संकलित केलेल्या ओल्या कचर्‍यावर ते प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करणार होते. हे खत स्वत: वापरू, असे त्यांनी प्रस्तावात सुचवले होते.
 
 
परंतु, महापालिकेकडून यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला नाही. त्यामुळे हा विषय मागे पडला होता. आता घनकचरा प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने शहरातील कचर्‍याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून संकलन करण्यासाठी जैन इरिगेशन कंपनीला विचारणा करण्यात येणार आहे. त्यांनी पुढाकार दर्शवला तर संपूर्ण शहरातील कचरा संकलित करण्यासाठी त्यांना ठेका देण्याची महापालिकेची तयारी आहे.
नाशिकमध्ये उत्तम नियोजन
नाशिक महापालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी एकाच ठेकेदाराला ठेका दिला आहे. ठेकेदाराच्या घंटागाड्या वर्गीकृत कचरा संकलित करतात. जीपीएसच्या माध्यमातून त्यावर ठेकेदाराचे नियंत्रण असते. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचार्‍यांना केवळ निरीक्षणाचे काम करावे लागते. जळगावातही अशाच प्रकारे नियोजन करता येईल का? यावर विचार सुरू आहे. सध्या शहरात काही प्रभागांमध्ये महापालिकेद्वारे तर काही प्रभागांमध्ये ठेकेदाराद्वारे कचरा संकलित व वर्गीकृत केला जातो. त्यामुळे अनेक मर्यादा येत असल्याने ‘नाशिक पॅटर्न’ राबवण्याचा विचार आहे.
@@AUTHORINFO_V1@@