स्मार्ट सिटी नाशिकला मिळणार हेल्थ टुरिझमची जोड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : सर्वच प्रकारच्या आरोग्य उपचारपद्धती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने नाशिकला ‘नाशिक वेलनेस हब’ साकारला जाणार आहे. याकरिता नाशिक इगतपुरी, त्र्यंबकेश्वर जिल्ह्यातील पर्यटनाचे प्रवेशद्वार असलेल्या सुवर्णत्रिकोणात नाशिक वेलनेस हबकरिता शंभर एकर जागा येत्या महिन्याभरात निश्‍चित केली जाणार आहे. या नवीन प्रकल्पामुळे नाशिकच्या वैभवात भर पडणार असून त्याद्वारे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
 
राज्यात गेल्या काही वर्षात महाबळेश्‍वरला मागे टाकत नाशिकने निसर्गसौंदर्य आणि आल्हाददायक वातावरणात एक नंबर मिळविला आहे. यातून नाशिकच्या पर्यटनाला वेग आलेला असतानाच येणार्‍या काळात नाशिकला हेल्थ टुरिझमची जोड मिळणार आहे. जिल्ह्याचे पश्‍चिम प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या भागातील निसर्गसौंदर्य व आल्हाददायक वातावरण यामुळेच या भागातील पर्यटन व्यवसायाला चालना आणि अधिक वेग मिळवून देण्याच्या उद्देशाने आता ’नाशिक वेलनेस हब’चा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.
 
 
नाशिकच्या या सुवर्णत्रिकोणात शंभर एकर जागेवर २०२० पर्यंत वेलनेस हब साकारला जाणार असल्याचा विश्वास पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय सहसंचालक आशुतोष राठोड यांनी व्यक्त केला. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून आशियामधील सर्वोत्तम सोयीसुविधा व उपचारपद्धतीच्या दृष्टीने व्यापक असे वेलनेस हब नाशिकमध्ये उभारले जाणार आहे. परिणामी येणार्‍या काळात नाशिक जिल्ह्याच्या पर्यटनाचा सुवर्णत्रिकोण अधिक विकसित होण्यास मोठी मदत मिळणार आहे. ’वेलनेस हब’ मुंबईपासून अगदी जवळ ठरणार असल्यामुळे मुंबईकरांसमवेत विदेशी पर्यटकांनादेखील हे वेलनेस हब आकर्षित करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.
 
जीवनातील कायम असलेल्या ताणतणावाचे व्यवस्थापन करत नैराश्यावर मात करता यावी, स्मरणशक्ती वृद्धिंगत व्हावी तसेच विविध आजारांवर आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, ऍक्युप्रेशर, ऍक्युपंक्चर, बॉडी मसाजसह ध्यानधारणा, योगा केंद्रासह विविध प्रकारच्या आरोग्याशी संबंधित सुविधा वेलनेस हबद्वारे पर्यटकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सुमारे शंभर एकर जागेवर उभे राहणारे वेलनेस हब हे देशातील पहिले हब ठरणार आहे. एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये वेलनेस हब अद्याप कुठेही अस्तित्वात नाही. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पी.पी.पी.) तत्त्वावर हे हब साकारले जाणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले.
 
 
पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित पीपीपी तत्त्वानुसार विकसित केल्या जाणार्‍या नाशिक वेलनेस हबमध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य उपचार पद्धती व सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहेत. वैद्यकशास्त्रानुसार उपचाराच्या आयुर्वेदापासून वॉटरथेरपीपर्यंत सर्वच पद्धतींचा नागरिकांना या ठिकाणी लाभ घेता येणार आहे. या नियोजित वेलनेस हबमुळे नाशिकच्या कृषी, पर्यटन, निसर्ग पर्यटन, धरण पर्यटनासह धार्मिक पर्यटनाला आपोआप अधिक चालना मिळणार आहे. यातून पर्यटकांचा नाशिककडे असणारा ओघ अधिक वाढणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@