लिथुआनिआच्या रोमुआ परंपरेतील स्त्री-शक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018   
Total Views |
बाल्टिक भाषांच्या अध्ययनातून हे स्पष्ट झाले आहे की, इण्डो-युरोपियनच्या प्राचीन भाषा या लिथुआनियन होत्या आणि सर्व बाल्टिक भाषा या भारताची प्राचीन भाषा- संस्कृतशी घनिष्ठतेने जुळल्या होत्या. १८७५ साली असे लक्षात आले की, बाल्टिक प्रदेशातील धार्मिक संकल्पनांची, इतर युरोपियन लोकांशी तुलना केली असता, अनेक प्राचीन वैशिष्ट्ये भारतातील वैदिक धर्माशी मिळतीजुळती आहेत. लॅटव्हिया व लिथुआनिआसारख्या छोट्या बाल्टिक देशांमधील भाषा फार कमी प्रसिद्ध होत्या, तसेच या क्षेत्रात बाल्टिक विद्वानांनी तुलनेने अलीकडेच संशोधन सुरू केले असल्यामुळे, बाल्टिक धर्मांवरचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन थांबले होते. आजही बाल्टिक धर्माचे आजच्या काळानुरूप सखोल संशोधन होणे बाकी आहे. बाल्टिक धार्मिक संकल्पनांमुळे, इण्डो-युरोपियन धर्माच्या प्राचीन अवस्था व रचना कशा निर्माण झाल्यात, हे समजून घेण्यास फार मदत होणार आहे. इंटरनॅशनल सेंटर ऑर कल्चरल स्टडीजने (आयसीसीएस) हे संशोधनकार्य लिथुआनियन व लॅटव्हिअन विद्वानांच्या मदतीने करण्याचे ठरविले आहे.
या संदर्भात, आयसीसीएसने आयोजित केलेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत, रोमुवा परंपरेच्या क्रिवे (सर्वोच्च महिला धर्मगुरू) इन्या तिनकुनेने यांनी मांडलेले विचार मननीय आहेत. ते थोडक्यात, त्यांच्याच शब्दांत इथे देत आहे :
रोमुवा परंपरेतील स्त्री-शक्तीचे स्थान प्रदर्शित करणारी ऐतिहासिक, पौराणिक, मानववंशशास्त्रीय तसेच समकालीन माहिती मांडण्यासाठी मी येथे आली आहे. रोमुवा हा देशी बाल्टिक धर्म आहे. प्राचीन युरोपच्या (आणि सर्व इण्डो-युरोपियन्सच्याही) वैश्विकधार्मिक संकल्पनेला प्रकट करणारी ही एक सातत्यपूर्ण आध्यात्मिक परंपरा आहे. रोमुवा धर्माच्या वैश्विक दृष्टिकोनात तुम्हाला स्त्री-शक्तीच्या महत्तेची अनेक स्थाने आढळून येतील.
रोमुवा परंपरेतील आध्यात्मिक स्त्री-शक्तीला प्रतिपादित करताना, आपल्याला प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ मारिया गिमबुटास यांच्या शास्त्रीय वारशावर भर देणे गरजेचे आहे. लिथुआनियन्सच्या दृष्टीने मारिया गिमबुटास या देवतेसमान आहेत. हजारो वर्षांपूर्वी सुप्त असलेली अनेक रहस्ये त्यांनी उघड केली म्हणून त्यांना हा मान मिळाला आहे.
मारिया गिमबुटास (१९२१-१९९४) या प्राचीन युरोपीय संस्कृतीच्या आघाडीच्या संशोधक व अधिकारी होत्या. या संदर्भात त्यांनी अनेक पुस्तकेदेखील लिहिली आहेत. त्याचे मूलगामी कार्य असलेले ‘ऑफ गॉडस् अ‍ॅण्ड गॉडेसेस’ (१९८२) हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी, पूर्व इण्डो-युरोपियन धार्मिक व्यवस्थेत स्त्री देवतांना असलेले मध्यवर्ती स्थान, यावर प्रकाश टाकला आहे. बाल्टिक संस्कृतीवर लिहिलेल्या ‘द बाल्ट्स’ (१९६३) या पुस्तकात त्यांनी दाखवून दिले आहे की, सर्व बाल्टिक देवतांचे दोन भिन्न उत्पत्तिस्थान आहे. त्यातील प्राचीनतर देवतेचे मूळ, प्राचीन युरोपच्या मातृसत्ताक देवतांमध्ये आहे. दुसरे मूळ, इण्डो-युरोपियन्स सोबत आलेल्या शूर, पितृसत्ताक देव-देवतांमध्ये आहे.
मारिया गिमबुटास यांनी केलेल्या संशोधनांनुसार, प्राचीन युरोपच्या मातृसत्ताक सिद्धांतावर, सर्वज्ञानी देवतांच्या सृजनशील शक्तीचा प्रभाव होता. उल्लेखनीय म्हणजे, अगदी २०व्या शतकापर्यंत लाइमा, रगना, गिल्तीने, लौमे आदी बाल्टिक देवतांनी जे विशेष गुण जपून ठेवले ते, अनेना, हेरा, हेकाते या ग्रीक देवतांच्या २५०० वर्षांपूर्वी नोंदविलेल्या गुणधर्मात आढळून येतात. प्राचीन युरोपातील स्त्री-भाव, जो प्रख्यात अमेरिकन पुरातत्त्वविद मारिया गिमबुटास यांच्या पुरातत्त्वीय संशोधनातून वर्णिलेला तसेच नोंदविलेला आहे, तो आजही लिथुआनियन गीतपरंपरेत, सुतारतिन्सच्या (सामूहिक लोकगीत) रूपात जिवंत आहे. त्याची आज अस्पर्श जागतिक वारसा म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकारच्या गीतात स्त्रीत्वाचे सार आहे. ज्याचा आधार सौहार्द आहे. तसेच ही गाणी दोन विरुद्ध शक्तींमधील सौहार्दावर आधारित आहेत. म्हणजेच, दोन स्वरमाधुर्याच्या विविध पद्धती व लय-ताल.
प्राचीन लिथुआनियन परंपरेनुसार, स्त्री देवतेला समान दर्जाचे स्थान प्राप्त आहे किंवा, बरेचदा त्या पुरुषी देवतांपेक्षा अधिक महत्त्वाच्या आढळून येतात.
प्राचीन काळापासून, मातृदेवता- सृष्टी आणि जीवनाची माता म्हणून पूजिली जात आहे. प्रेम, कर्तव्यातून गौणत्व तसेच देवता व तिच्या अपत्यांबाबत (म्हणजे स्त्रीदेवता व देव) गंभीर भावना आणि सजीव सृष्टी हे, समस्त बाल्टिक ऐतिहासिक काळापासून वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप राहिले आहे. आमच्या प्राचीन देवता झेमन्या (पवित्र पृथ्वीची देवता), लायमा (नियतीची देवता), गबजा (अग्नीची देवता), मेडिएना (वनदेवता), ऑस्टेजा (मधमाश्यांची देवता) आणि इतर या मातृदेवतेच्या मुली आहेत. तिच्या अपत्यांमध्ये सजीव गोष्टी तसेच लोकांचाही समावेश आहे. या सर्वांच्या अगदी आधीची म्हणजे देवांची माता, जिचा उल्लेख पहिल्या शतकात रोमन इतिहासकारांनी केला आहे, ती म्हणजे टॅसिटस. नंतर, मूल्यांचे परस्परसंबंध बदलल्यामुळे, पुरुष देव आणि त्यांच्यातील शौर्याचे गुणधर्म यांना अधिक महत्त्व प्राप्त होत गेले. तरीही, पवित्र पृथ्वीची देवता- झेमन्याचे महत्त्व मात्र कायम राहिले.
झेमन्या- ही देवता आपल्याला जन्म देते, पालनपोषण करते, पिकांना पिकविते. ती सर्वांची माता आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी, ती जणू माता असल्याप्रमाणे तिचे स्वागत केले जाते. भूमी म्हणून झेमन्या ही शुद्ध आणि सत्य आहे. तिला दुखवायचे किंवा तिचे मन मोडायचे नसते. झेमन्या जीवन प्रदान करणारी असल्यामुळे, कर्मकांडात सर्वात आधी तिला आहुती द्यायची असते. झेमन्याची शक्ती सपाट दगडांमध्ये असते असे मानले जाते. बरेचदा त्यांच्या पृष्ठभागावर खळगेही असतात. या खळग्यांमध्ये जे पावसाचे पाणी गोळा होते, ते जादूई शक्तीने भरलेले असते. पृथ्वी ही मृत्यूचीदेखील देवता आहे. असे मानले जाते की, आम्ही तिच्याकडून म्हणजे आईकडून येतो आणि म्हणून नंतर तिच्याकडेच जातो. प्रशियन-लिथुआनियन तत्त्ववेत्ता व्हायदुनास यांनी, पृथ्वीशी असलेल्या संबंधाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. लिथुनिअन्स लोक, त्यांच्या स्वत:च्या भूमीवर सर्वाधिक काळ राहिलेले लोक आहेत. पृथ्वीच्या शक्तीच्या बळावर जे लोक राहतात, ते अस्तित्वाची खोली अधिक सघनतेने अनुभवू शकतात. पृथ्वी आणि तिची सर्व निर्मिती यांचा आदर व्हायला हवा, त्यांचे संरक्षण व्हायला हवे. त्याच वेळी, आम्ही म्हणजे सर्व मानवांनी, स्वत:ला या पूर्णत्वरूपी जीवनाचा फक्त एक भाग समजला पाहिजे. अनेक सुटीच्या दिवशी, विशेषत: १५ ऑगस्टला, झोलिन्स म्हणून झेमन्याचा उत्सव साजरा केला जातो.
@@AUTHORINFO_V1@@