ईशान्येतील भाजपच्या विजयानंतरही राजकीय धोका कायमच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर
केंद्रीय अर्थसंकल्प शेअर बाजाराच्या दृष्टिने अजून पर्यंत तरी निराशाजनक
मध्यमवर्गाला आयकर माफ मर्यादेचा नाही दिलासा!
आयात शुल्कवाढीमुळे खाद्य तेल महागले
 
 
ईशान्य भारतातील भारतीय जनता पक्षाच्या शानदार विजया नंतरही राजकीय धोका (पॉलिटिकल रिस्क) कायमच असल्याचे तज्ञांचे मत आहे. याचे कारण म्हणजे या वर्षभरात होणार्‍या कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढ चार महत्वाच्या राज्यातील विधानसभा निवडणुका होय. जरी भाजपाला त्रिपुरा, नागालॅण्ड व मेघालयात चांगले यश मिळाले असले तरी ती लहान राज्ये आहेत व त्यांच्या निकालांचा देशभरातील राजकीय वातावरणावर एकंदरीत फारसा परिणाम होण्याची शक्यता तज्ञांना वाटत नाही.
 
 
तसेच पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला ‘वन्स मोर’ मिळतो किंवा नाही हाच मुळात प्रश्न बाजाराला पडलेला आहे! या संपूर्ण वर्षभरात अनेक राजकीय हालचाली होणार असून नवी राजकीय समीकरणे तयार होणार आहेत. या समीकरणांची उकल निवडणुकीच्या निकालानंतरच होणार आहे. मोदी सरकारने आतापर्यंत सादर केलेल्या सर्व अर्थसंकल्पांमध्ये सर्वसाधारण व्यक्ती व मध्यमवर्गीयांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. आयकर माफीची मर्यादा गेल्या काही वर्षांपासून एका रुपयानेही वाढविण्यात आलेली नाही. तशातच या वर्षीच्या सरकारच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात शेअर बाजारातील एक वर्षानंतरच्या मिळकतीवर कर (एलटीसीजी) लावण्यात आलेला असून पूर्वीचा रोखे व्यवहार कर (सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स) मात्र कायमच ठेवण्यात आलेला आहे. ही दुहेरी कररचना शेअर बाजाराला मारक ठरणारी आहे.
 
 
सरकार जनतेकडून फक्त करच गोळा करते व या करांचा पैसा मात्र नीरव मोदीसारखे घोटाळे बाज परस्पर लाटत आहेत. घोटाळे करुन हे महाभाग खुशाल देशाबाहेर निघून जात आहेत हे चित्र मध्यमवर्गीयांच्या दृष्टिने फारसे समाधानकारक नाही. मग हा घोटाळा कुणाच्या काळात झाला यावरील राजकीय चर्चांशी त्यांना कुठलेही देणेघेणे नाही. तसेच या घोटाळ्याचे राजकीय भांडवल विरोधक करणार नाहीत हे शक्यच नाही. त्यामुळे सरकार ला संसदेत व संसदेबाहेरही मोठ्या विचित्र परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येणार आहे. यामुळे देशातील राजकीय धोका वाढणार आहे.
 
 
अर्थसंकल्पात जरी शेतकरी व गरिबांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या असल्या तरी त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात नोकरशाहीच्या दिरंगाईच्या ‘लाल फिती’ (रेड टेपिझम)चा सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे योग्य लाभार्थींपर्यंत या योजनांचे सर्व लाभ पोहोचतील याकडे राजकीय नेत्यांनी (विशेषत: सत्ताधारी पक्षाच्या) डोळ्यात तेल घालून पाहण्याची गरज आहे. त्यांना तात्पुरत्या उपाययोजनांवर विसंबून राहून चालणार नाही. जसजशी निवडणूक दिवसादिवसा ने जवळ येत जाईल तसतशी जनतेतील सध्याच्या सरकार विषयीची असंतोषा(ऍण्टी इन्क्यु बन्सी)ची भावना वाढणार नाही याची दक्षता सत्ताधार्‍यांना घ्यावी लागणार आहे.
 
 
२०१८ मध्ये राजकीय रिस्कमुळे बाजारात मोठे चढउतार पाहावयास मिळणार आहेत. जागतिक पातळीवरील चिंता व राजकीय अनिश्‍चिततेच्या परिणामी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सध्याच्या १० हजार ३०० बिंदूंच्या पातळीवरही टिकणार नसल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पानंतर सुमारे हजार बिंदूंपर्यंत घसरलेला निफ्टी आणखी गडगडण्याची भीतीही त्यांना वाटू लागलेली आहे. अजून किमान महिनाभर तरी बाजार सावरण्याची वाट पाहावी लागणार आहे.
 
 
सरकारने पाम तेलावरील आयात शुल्क ३० टक्क्यांनी वाढवून ४४ टक्के तर रिफाईंड पाम तेलावरील आयात शुल्क ४० टक्क्यांनी वाढवून ५४ टक्के इतके केले आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या किंमती वाढू लागलेल्या आहेत.
 
 
सरसू आणि पाम तेलाच्या किंमतीत अडीच टक्के वाढ झालेली आहे. सोयाबिन तेलाच्याही किंमती वाढलेल्या आहेत. तसेच हरभर्‍यावरील आयात शुल्क दुपटीने वाढवून ६० टक्के इतके केले आहे. हरभर्‍याच्या बाबतीत त्याच्या किंमती किमान हमी भावा(एमएसपी)पेक्षाही खूपच खाली गेल्या होत्या. त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. मध्य प्रदेशात तयार होणार्‍या काबुली चण्यावरही सरकारने ४० टक्के आयात शुल्क लावले आहे.
 
 
तशातच राजस्थान व मध्य प्रदेशातील खराब हवामानव अवकाळी पावसाचा फटका सरसूच्या उभ्या पिकाला बसला आहे. त्यामुळे सरसू तेलाच्या किंमती वाढू शकतात. कच्च्या खनिज तेलाच्या किंमती वाढू लागल्या असून ब्रेंट क्रूडचा दर ६४.५ डॉलर प्रति पिंप इतका झाला आहे. सोने-चांदीही चकाकली आहे.तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाही वाढलेला आहे.
शेअर बाजारातील घसरण सुरुच, दोन्ही निर्देशांकात मोठी घट
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराला लागलेली ओहोटी अजूनही कायमच असल्याचे चित्र आहे. आज सोमवारी बाजाराच्या सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये सकाळी मोठी घट झाली होती. सेन्सेक्स शुक्रवारच्या बंद ३४हजार ४६ बिंदूंवरुन आज सकाळी ३४ हजार ३४ बिंदूंवर उघडून ३४ हजार ३४ बिंदूंच्या तर निफ्टी बंद १० हजार ४५८ बिंदूंवरुन १० हजार ४२८ बिंदूंवर उघडून १० हजार ४२८ बिंदूंच्या उच्च पातळीवर गेला होता. पण सेन्सेक्स व निफ्टीने लगेच अनुक्रमे ३३ हजार ६५३ व १० हजार ३२४ बिंदूंचा तळ गाठला होता. दिवसअखेरीस सेन्सेक्स व निफ्टी हे अनुक्रमे ३३ हजार ७४७ व १० हजार ३५९ बिंदूंवर बंद झाले.
 
@@AUTHORINFO_V1@@