बाल स्वयंसेवक ते मुख्यमंत्री एक खडतर प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 
 
प्रवाहात तर कोणीही पोहतो. मात्र, प्रवाहाच्या विरुद्ध पोहून यशस्वी होणे यात खरे कौशल्य असते. असेच एक व्यक्तिमत्त्व आहे, ज्याने खडतर प्रवास करून मुख्यमंत्रिपदापर्यंत भरारी घेतली आहे. विपरीत परिस्थिती, संघाचा नुसता उच्चार केला तर जिवाचे काही बरे वाईट होईल असे आजूबाजूचे वातावरण, अशाही परिस्थितीत आपल्या छोट्याशा गावात दोन-चार मित्रांना सोबत घेऊन शाखा लावायची आणि खेळ खेळायचे, इतरांमध्ये संस्कार रुजवायचे असे जे काम बाल स्वयंसेवक म्हणून केले, ती व्यक्ती लवकरच त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. अर्थातच त्या व्यक्तीचे नाव आहे विप्लव हिरूधन देव.
 
हा बाल स्वयंसेवक पाहता पाहता मोठा झाला, आधी दिल्लीच्या संसद भवन परिसरात या व्यक्तीने आपला प्रभाव प्रस्थापित केला. तेथील कामामुळे प्रभावित होऊन भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांच्याकडे अवघ्या तीन-चार वर्षांपूर्वी त्रिपुराची जबाबदारी सोपविली. भाजपाच्या जनसंपर्क अभियानाचे त्रिपुराचे प्रभारी म्हणून आधी त्यांच्याकडे दायित्व सोपविले गेले, नंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. आज या व्यक्तीची पक्षाने विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली असून, येत्या 9 मार्च रोजी त्रिपुराचे दहावे मुख्यमंत्री म्हणून ते शपथग्रहण करणार आहेत.
 
सध्या नागपूरला असलेले ज्येष्ठ प्रचारक बबनराव उर्फ रामचंद्र सहस्रभोजनी हे 1982 ते 1992 या दहा वर्षांच्या काळात त्रिपुरात विभाग प्रचारक म्हणून काम करीत असताना त्यांनी विप्लव देव यांच्यातील चुणूक हेरली होती आणि त्यांनी त्यांना विविध टप्प्यांवर अचूक मार्गदर्शनही केले.
ब्रह्मदेशात स्वयंसेवक म्हणून राहिलेले कालाचंद साहा हे तेथून मायदेशी परतल्यानंतर त्रिपुरा येथील उदयपूरजवळील जामगुडी गावातील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. विप्लव हा त्यांच्याच शाळेतील विद्यार्थी. वडील डॉ. हिरूधन देव हे जनसंघाचे कार्य करीत होते, नंतर त्यांनी भाजपाचे काम केले. तेही गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली विप्लव लहान असताना गावात शाखा भरवत असे. पुढे वडिलांवर हल्ला झाला, त्यात ते बेशुद्ध झाले. त्यांची प्रकृती खालावली. पुढे त्यांचे निधन झाले. घरी असलेल्या शेतीवर घराचा गाडा ओढणे कठीण जात होते. आई व तीन बहिणी अशा मोठ्या परिवाराची जबाबदारी आली होती. घराचा गाडा ओढता यावा म्हणून काही तरी काम करावे म्हणून तत्कालिन प्रांत प्रचारक गौरीशंकर चक्रवर्ती यांच्या सल्ल्यानुसार विप्लव यांनी दिल्ली गाठली. तेथील प्रांत प्रचारकांनी, इकडे तिकडे काम करण्यापेक्षा संघाच्या सुरुची साहित्य प्रकाशनामध्येच काम सुरू करण्याबाबत सुचविले. तेथे काम सुरू झाले.
 
पुढे त्यांचा ज्येष्ठ नेते गोविंदाचार्य यांच्याशी संपर्क आला. त्यांनी तीन महिन्यात विप्लवला वाहन चालविणे, संगणक हाताळणे आदी अनेक कामांमध्ये तरबेज केले. नंतरचे तीन महिने संसद भवन परिसरातील कामाची माहिती अवगत करून दिली. त्यावेळच्या धनबादच्या खासदार रीता बर्मा यांच्याकडे सहायक म्हणून काम मिळवून दिले. पुढे सतनाचे खासदार गणेश सिंग यांच्याकडे काम सुरू केले. विप्लव यांनी मग संसदेच्या कामात चांगला हातखंडा निर्माण केला, आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. पक्षभेद विसरून सार्‍यांचे काम ते करून देत असत. एव्हाना विवाह झाला होता, दोन अपत्येही झाली होती. त्यांच्या कामाचा आवाका, काम करण्याची उर्मी आणि आगामी त्रिपुराची विधानसभा निवडणूक या एकूणच पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शाह यांची विप्लव देव यांच्यावर नजर पडली. त्यांनी त्यांच्यातील गुण हेरले आणि भाजपाच्या जनसंपर्क अभियानाचे त्रिपुराचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली. सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांनी, रक्ताची होळी खेळली जाणार्‍या, त्रिपुरात पुन्हा जाऊ नये म्हणून आग्रह धरला. नंतर मात्र त्यांनाही या कामाचे महत्त्व पटले आणि देव यांनी पुन्हा त्रिपुरा गाठले. तीन वर्षे अथक परिश्रम घेतले, अनेक दौरे केले, दिवस-रात्र एक केली, 18 ते 20 तास काम केले, लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, केंद्र सरकारतर्फे सुरक्षा पुरविण्यात आली असल्यामुळे हल्ल्याबाबतची भीती कमी झाली होती. त्यांचा कामाचा धडाका पाहून स्थानिक लोकांमध्येही विश्वास निर्माण होऊ लागला, भीतीचे सावट दूर सारले जाऊ लागले, त्यांच्यात हिंमत निर्माण केली गेली आणि आज परिणाम सार्‍यांना दिसून आले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@