पुण्याची माणसं कष्टाळू, अजित पवारांकडून सुनील देवधरांची प्रशंसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
महाराष्ट्र विधीमंडळातही त्रिपुरा निवडणुकीचीच चर्चा

 
मुंबई :  त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाची चर्चा देशभर अद्यापही सुरूच असून या विजयाचे शिल्पकार ठरलेले भाजपचे त्रिपुरा प्रभारी सुनील देवधर यांचीही मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत आहे. आज तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही देवधर यांची प्रशंसा करण्याचा मोह आवरता आला नाही. अजित पवार टीका करत होते महाराष्ट्र राज्य सरकार व मंत्र्यांवर मात्र, त्रिपुरातील निकालाचा उल्लेख होताच, आमच्या पुण्याची माणसं कष्टाळू असतातच, असं म्हणत अजितदादांनी सुनील देवधरांची प्रशंसा केली.
 
 
कापसावरील बोंडअळी व राज्यात काही भागात झालेली गारपीट या विषयावर अजित पवार यांनी आज विधानसभेत सुमारे तासभर भाषण केलं. यावेळी पवार यांनी अनेकवेळा राजकीय टीकाटिप्पणीही केली. समोर बसलेल्या भाजप मंत्र्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, तुम्ही निवडून आलात, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेहेरबानी आहे हे लक्षात घ्या. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 'ही तुमचीही मेहरबानी आहे' असा उलट टोला अजित पवार यांना लगावला. यावर, तुम्ही मोदींचे नाव न घेता निवडणूक लढवून दाखवाच, असे आव्हान भाजप मंत्र्यांना केले. यावेळी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत त्रिपुरातही भाजपचे कार्यकर्ते नव्हते मात्र मोदींच्या नावावर त्रिपुरात भाजप विजयी झाला, असा मुद्दा अजित पवारांनी मांडला.
 
 
याचवेळी त्रिपुरातील सुनील देवधर यांचे नाव भाजप मंत्र्यांकडून घेण्यात आले. यावर अजित पवार उत्तरले, हो, सुनील देवधर खाली काम करत होतेच. आमची पुण्याची माणसं कष्टाळू असतातच. पण, अंतिम चेहरा मोदी यांचाच तर होता. अजितदादांच्या या स्पष्टीकरणावर महाजन यांनी नापसंती दर्शवली. यावर, अहो, चेहरा पाहूनच लोक आकर्षित होतात, हे मी तुम्हाला सांगायला हवं का? असा प्रतिटोला अजित पवार यांनी महाजन यांना लगावला. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@