सुरेशदादांचा ‘गळ’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 
 
सुरेशदादांचा ‘गळ’!
 
जळगाव, ४ मार्च
जळगाव महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे. राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. महापालिकेची सत्ता वर्षानुवर्षे आपल्या ताब्यात ठेवणारे शिवसेनेचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांना काहीही झाले तरी यंदाच्या टर्मला देखील महापालिका आपल्याच ताब्यात हवी आहे. त्यासाठी राजकीय तडजोडीची बेरकी चाल त्यांनी खेळली आहे. रणधुमाळीला केवळ सहा महिने बाकी असतानाच सुरेशदादांनी शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे जाहीर आवाहन मनपा संचालित नूतनीकृत जलतरण तलावाच्या लोकार्पणप्रसंगी केले. या आवाहनाला आवर्जून शहर विकासाचा भावनिक मुलामा द्यायलाही ते विसरले नाहीत.
 
 
स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना युती होण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे सुरेशदादा सांगत आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही दादांसोबत येण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. मनसेचे सदस्य सोबत आहेतच. मनपात भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर खाविआचे अस्तित्त्व काय राहील? हे अद्याप सुरेशदादांनी स्पष्ट केलेले नाही. प्रभाग रचनेची नवीन पध्दत जाहीर झाली आहे. त्यानुसार दोन ऐवजी चार सदस्यांचा मिळून एक प्रभाग असणार आहे. राज्यात सत्ता, जळगाव शहर मतदारसंघात स्वपक्षाचा आमदार असूनही महापालिकेत मात्र, भाजपच्या नगरसेवकांची कामगिरी प्रभाव पाडू शकलेली नाही. सत्ताधार्‍यांकडून पदोपदी कायमच होत असलेली जबरदस्त अडवणूक आणि इतरही अनेक कारणे यामागे आहेत.
 
 
राहता राहिला सुरेशदादांनी मांडलेला विकासाचा मुद्दा. शहराला २५ कोटी मिळाले खरे, पण राजकीय श्रेयवादाच्या लढाईत ते अखर्चितच आहेत. यासाठी एकमात्र ‘खाविआ’च जबाबदार असल्याचा भाजपचा आरोप आहे. पण भाजपमधील एक गट हा ७, शिवाजीनगरला जवळचा असल्याचे बोलले जाते. शिवसेनेचा प्रश्‍नच नाही. ते तर दावणीला बांधलेले आहेतच. विद्यमान महापौर ललित कोल्हे व त्यांचे सहकारी ‘मनसे’च्या तिकिटावर लढतील की नाही हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. सुरेशदादांनी ‘गळ’ टाकला आहे. येत्या काळात राज्यात भाजप-शिवसेना सोबत असले किंवा नसले तरी जळगाव महापालिकेत सुरेशदादांना युती हवी आहे. यात आपलाच (जळगाव महापालिकेचा) फायदाच होणार असल्याचे सूत्र सुरेशदादांचे आहे. आपल्या जागा वाढविण्यासाठी ते कुठलीही चाल खेळू शकतात. त्यात त्यांच्या गळाला कोण लागतं आणि कोण निसटतं याचे चित्र निवडणुकीच्या दीड-दोन महिने आधी पूर्णतः स्पष्ट होईल. आज महापालिकेत काहीही अस्तित्व नसलेल्या शिवसेनेला सोबत घेतल्यास भाजपला मात्र, काही जागांवर पाणी सोडावे लागेल. जळगाव मनपात भाजपचे विद्यमान १५ नगरसेवक आहेत. विजय गेही यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे, तर अन्य एक नगरसेवक स्वीकृत आहे. बहुमतासाठी भाजपला ३८ च्या पलीकडे जावे लागेल. ते कठीण नाही, पण अवघड मात्र नक्कीच आहे. पक्षाने जोर लावला तर चित्र बदलू शकते. राजकीय पटावरील प्याद्यांच्या चालीही बदलू शकतात. हे अवलंबून आहे केवळ सुरेशदादांच्या गळाला कोण लागतो यावरच?
@@AUTHORINFO_V1@@