जळगाव वैद्यकीय शिक्षण परिसर असेलभारतातले पहिले एकत्रित मेडिकल हब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 
जळगाव वैद्यकीय शिक्षण परिसर असेल
भारतातले पहिले एकत्रित मेडिकल हब
मुंबई, ४ मार्च
राज्यपालांच्या अभिभाषणात जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा झाली. त्यामुळे जळगावकर आनंदले असले तरी हा प्रकल्प केवळ वैद्यकीय महाविद्यालयापुरता मर्यादित नाही. भारतातला पहिला एकीकृत वैद्यकीय शैक्षणिक परिसर असा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यात अलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, दंत चिकित्सा आणि फिजिओथेरपी अशा सर्व प्रकारच्या उपचार पद्धतींची वैद्यकीय महाविद्यालये असतील.
 
 
याच २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासूनच पाहिले ऍलोपॅथी महाविद्यालय सुरू होणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. सध्या प्रत्यक्षात स्वतंत्र इमारतीचे बांधकाम झालेले नसल्याने जळगाव येथील शासकीय जिल्हा नागरी रुग्णालयातच हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. नवीन वैद्यकीय शैक्षणिक परिसरातील जागेत पहिल्या इमारती बांधून होताच पुढील दोन ते तीन वर्षात हे वैद्यकीय महाविद्यालय त्या जागेत स्थलांतरित होईल. १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयाची इतर सर्व पूर्वतयारी अतिशय जोरात सुरू आहे. ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉ. खैरे हे या प्रकल्पातील या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) असणार आहेत. जळगाव - जामनेर राज्य महामार्गावर चिंचोली शिवारात एकूण ११० एकर जमीन या प्रकल्पासाठी चिन्हांकित केली गेली आहे. त्यातील ३५ एकर ही अगदी राज्य महामार्गाला लागून, तर उर्वरित जमीन दुसरीकडे आहे. हा प्रकल्प एकूण बाराशे ते चौदाशे कोटींचा आहे. यातील जवळपास ११० कोटी रुपये पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात येत आहेत.
 
 
आधी ऍलोपॅथी, नंतर दंत चिकित्सा होणार सुरू
पहिल्या अलोपॅथी महाविद्यालयानंतर लगेच दंत चिकित्सा महाविद्यालय सुरू केले जाईल. त्यानंतर आयुर्वेदिक आणि फिजिओथेरपी एकत्र आणि नंतर होमिओपॅथी महाविद्यालय सुरू होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण खात्यातील उच्च पदस्थांकडून देण्यात आली.
 
 
पूर्ण शासकीय मालकी
या वैद्यकीय शैक्षणिक हबची संपूर्ण मालकी सरकारची असेल तसेच संचालनाही सरकारकडून होईल, असे सांगितले गेले. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्वस्तात सर्व प्रकारचे वैद्यकीय शिक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर रुग्णांनाही सर्व प्रकारच्या वैद्यकीय प्रणालींचे उपचार स्वस्तात उपलब्ध होतील. सर्व प्रकारच्या वैद्यकीय प्रणाली एकत्र असलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याने जळगावचे नाव देशभरात झळकणार आहे. त्याचबरोबर देशभरातून रुग्ण येथे येण्याची शक्यता असल्याने भविष्यात जळगाव हे मेडिकल डेस्टिनेशन म्हणून उदयाला येईल, अशी धुरिणांची अपेक्षा आहे.
@@AUTHORINFO_V1@@