अब्जाधीशांच्या संख्येबाबत भारत जर्मनीच्या पुढे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 
अब्जाधीशांच्या संख्येबाबत भारत जर्मनीच्या पुढे !

भारत यादीत तिसरा, तर जर्मनी पाचवा, चीन मात्र पहिल्या क्रमांकावर
‘रिलायन्स’चे मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत अब्जाधिश
लोकसंख्येच्या प्रमाणात श्रीमंतांची संख्या कमीच
आनंद, समाधान हा खरा मूळ मुद्दा, केवळ पैसा नव्हे.
अब्जाधिशांच्या संख्येच्या बाबतीत भारताने जर्मनीला मागे टाकीत यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. जर्मनी ही एके काळची राजकीय महाशक्ती असून त्याने जगावर दोन महायुद्धे लादली होती. दुसर्‍या महायुद्धात या देशाचे अपरिमित नुकसान होऊन शिवाय त्याचे दोन तुकडे (पूर्व व पश्‍चिम जर्मनी) असे झाले होते. कालांतराने सोव्हिएत रशियाच्या पतनाच्या वेळी ह्या दोन्ही भागांचे पुन्हा एकत्रीकरण झाले असून तो आर्थिक महाशक्तीं पैकी एक देश बनलेला आहे. अशा या देशाला अब्जाधिशांच्या संख्ये च्या बाबतीत भारताने मागे टाकले आहे.
 
 
भारताने ही अभूतपूर्व कामगिरी केली असली तरी लोकसंख्येच्या प्रमाणात ती पुरेशी नाही. अजूनही देशात दारिद्रय रेषेखाली जेवढे लोक (सुमारे ३० ते ३५ कोटी)आहेत तेवढी या जर्मनीची लोकसंख्या(अवघी ८ कोटी!)ही नाही! पण केवळ डोकी मोजून काम भागत नाही, त्यामध्ये ‘काय साठवलेले आहे?’ याला अधिक महत्व आहे. लोकांमध्ये ‘जेवढी उद्योजकता जास्त तेवढी त्यांची संपत्तीही जास्त’ हे समीकरण विसरुन चालणार नाही. भारता मध्ये याबाबतीत लोकसंख्येच्या प्रमाणात उद्योजकतेचे प्रमाण खूपच कमी आहे. यामागे अर्थातच अनेक कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख म्हणजे सतत वाढत जाणारी लोकसंख्या व त्या प्रमाणात लोकांना मिळणारे रोजगार अपुरे असणे हे होय.
 
 
हे ‘गरीब पुराण’ फार झाले ! आता या ‘हरदासां(म्हणजेच या लक्ष्मीदास अब्जाधिशां)ची कथा मूळ पदावर आणू’ या! आपल्याला हे जाणून घ्यायचे होते की भारत व जर्मनीत किती अब्जाधिश आहेत ते? एका आकडेवारीनुसार भारतात १३१ तर जर्मनीत ११४ अब्जाधिश आहेत. त्यामुळे भारताने जर्मनीला अब्जाधिशांच्या यादीत मागे टाकीत तिसरा क्रमांक मिळविला आहे. जर्मनीत यावर्षी अब्जाधिशांची संख्या अवघ्या ५ ने वाढली आहे. त्यामुळे त्याला यादीत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
 
 
‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारता तील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांना २०१८ मधील जगातील अब्जाधिशांच्या यादीत १९ वे स्थान मिळाले आहे. यावर्षी यादीत ४३७ अब्जाधिश नव्याने सामील झाले असून याबरोबरच जगातील एकूण अब्जाधिशांची संख्या २६९४ इतकी झालेली आहे.
आपला शेजारी देश चीनने यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. चीनच्या अब्जाधिशांच्या संख्येत तब्बल २१० ची भर पडून त्यांची एकूण संख्या ८१९ झाली आहे. याचे कारण म्हणजे चीनची वेगाने होणारी आर्थिक प्रगती होय. अर्थात चीनच्या भारतापेक्षाही जास्त व प्रचंड लोकसंख्येचाही विचार केला पाहिजे. मात्र दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येच्या बाबतीत चीन हा भारतापेक्षा(सुमारे ९ कोटी) बराच पिछाडीवर आहे.
 
 
यादीत दुसरे स्थान अमेरिके ला मिळाले आहे. या देशात नवे १९ अब्जाधिश यादीत समाविष्ट झाले असून एकूण अब्जाधिश ५७१ इतके आहेत. ज्याने भारतावर दीडशे वर्षे राज्य केले तो इंग्लंड यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या देशात नव्या २९ अब्जाधिशांसह एकूण ११८ अतिश्रीमंत लोक आहेत. शिवाय विजय माल्यासारखे ‘भगोडे’ व देशातून स्थलांतरित झालेले अनेक अब्जाधिशही इंग्लंड आणि अमेरिकेत स्थायिक झालेले यादीत समाविष्ट झाले आहेत. यादीतील सहावे स्थान स्वित्झर्लंड या जगाचे नंदनवन मानल्या जाणार्‍या देशाने मिळविले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या देशातील बँकांमध्ये विदेशातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर जमा झालेला पैसा होय. हा पैसा ‘दस नंबरी’ लोकांनी गोळा केलेला बहुधा ‘दोन नंबरचा’ असल्याचा संशय आहे! अन्यथा केवळ पर्यटनावयर अवलंबून असलेल्या या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा होणे अशक्यच होते. हा देश आंतरराष्ट्रीय राजकारणापासून अलग राहिलेला तटस्थ देश म्हणून बर्‍याच काळा पासून प्रसिद्धही आहे. या देशात तसे ८३ अब्जाधिश आहेत.
 
 
रशिया या साम्यवादी देशात ७१ अब्जाधिश असून यादीत तो सातव्या तर ५१ अब्जाधिशांसह फ्रान्स हा आठव्या स्थानावर आहे. तर ब्राझिल व कॅनडा हे प्रत्येकी ४९ अब्जाधिशांसह यादीत संयुक्तपणे नवव्या क्रमांकावर आहेत.
 
 
अर्थात एखाद्या देशात किती अब्जाधिश आहेत यावर त्या देशाचे खरे मूल्यमापन करणे योग्य नव्हे. मूळ मुद्दा म्हणजे देशातील किती लोक ‘आहे त्या स्थितीत आनंद व समाधान’ मानण्यासह आपली आर्थिक स्थिती वाढविण्याचाही प्रयत्न करीत आहेत किंवा नाहीत हा होय.
 
 
मोठ्या हिकमतीने दरोडा टाकूनही मिळाले अवघे शंभर रुपयेच !
बंगलोर येथे चोरट्यांनी मोठ्या हिकमतीने एका उद्योगपतीच्या घरावर दरोडा टाकला व तेथील लॉकरसारखी २५ किलोग्रॅम वजनाची अवजड तिजोरी घेऊन ते पसार झाले खरे. पण तिजारी फोडल्यानंतर तिच्यामध्ये अवघे १०० रुपयेच निघाल्याने त्यांना ‘कपाळावर हात मारण्याची’ वेळ आली होती! त्यामुळे त्यांना ‘डोंगर पोखरुन निघाला उंदीर’ (खोदा पहाड निकला चुहा) या म्हणीची चांगलीच प्रचिती आली. या चोरांनी प्रथम घराबाहेरील सुरक्षा रक्षकांवर हल्ला करुन त्यांना दोरखंडांनी बांधून टाकले होते. नंतर त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू धुंडण्यास सुरुवात केली. पण त्यांना लॉकरशिवाय दुसरे काहीही आढळले नाही. मग त्यांनी तोच महतप्रयासाने उचलून पलायन केले. पण अखेर त्यांच्या पदरी निराशाच आली.
 
@@AUTHORINFO_V1@@