मी खरा पाटील आहे, पाठीमागून बोलणार नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |

 


 
 
 
चंद्रकांतदादा पाटील यांनी ठणकावले 
 
महसूलमंत्र्यांनी धमकावल्याचा कपिल पाटील यांचा कांगावा
 

 मुंबई: कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांवर ‘मी खरा पाटील आहे, मी पाठीमागून बोलणार नाही, जे आहे ते समोर बोलेन’ अशी खास कोल्हापुरी शैलीतील प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दै. ‘मुंबई तरूण भारत’शी बोलताना दिली. तसेच, आपण अपशब्द वापरल्याचा कपिल पाटील यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. मात्र, विचारधारा ही सर्वोच्च स्थानी असून, त्याविरोधात उगाचच कोणीही उठून काहीही बोलू लागल्यास ते सहन करणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

दरम्यान, याआधी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले की, शिवसेनेचे विधानपरिषद गटनेते अनिल परब यांनी विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन कायम ठेवावे अशा स्वरूपाच्या मांडलेल्या प्रस्तावावर अनुमोदन देण्यासाठी आपण बोलत होतो. मात्र, आपल्या बोलण्यातील काही वाक्यांमुळे महसूलमंत्री व विधानपरिषद सभागृह नेते चंद्रकांत पाटील अतिशय संतापले व हरामखोर तुला बघतोच, तू बाहेर ये, तुला बदडून काढतो, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला धमकावले, असा आरोप कट्टर भाजपविरोधक मानले जाणारे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला.

 

विधीमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर विधानभवन येथील वार्ताहर कक्षात येऊन अधिकृत पत्रकार परिषद घेत कपिल पाटील यांनी हा आरोप केला. प्रशांत परिचारक यांचे निलंबन कायम ठेवावे या अनिल परब यांच्या प्रस्तावावर अनुमोदन देणारे भाषण करत असतानाच कपिल पाटील यांनी विषय भलतीकडे नेत विषयाचा संबंध थेट सरकारच्या विचारधारेशी जोडला. यामुळे संतप्त होत, कपिल पाटील यांनी प्रशांत परीचारक यांचे निलंबन रद्द झाल्यास सभागृहात घातक परंपरा सुरू होईल. कारण, त्यांनी जे शब्दप्रयोग केले, ती परंपरा या देशामध्ये ज्यांची आहे, ते सत्तेवर असतील, तर प्रश्न अधिक गंभीर होईल असे विधान करत याचा संबंध भाजपच्या विचारधारेशी जोडला. यामुळे चंद्रकांतदादा पाटील भलतेच संतप्त झाले होते. कामकाज स्थगित झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी आक्रमक होत हरामखोर, तुला बघतोच. तू बाहेर ये. तुझी औकात काय आहे? तुला बदडून काढतो अशी धमकी दिल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला. तसेच चंद्रकांत पाटील यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी जरी मला मारले असते, तर मी मार खाल्ला असता. कारण मी गांधीवादी आहे, अशीही पुस्ती कपिल पाटील यांनी यावेळी जोडली.

 

काय आहे प्रकरण?

प्रशांत परिचारक यांचे वक्तव्य म्हणजे शहिदांचा अपमान असल्याचे मत ऍड. . अनिल परब यांनी व्यक्त केले. तसेच हे वक्तव्य म्हणजे राष्ट्रद्रोहाप्रमाणे असल्याचे सांगत त्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी त्यांनी सभागृहापुढे केली. त्यापूर्वी, कायद्यानुसार सभागृहात ठराव पारित झाल्याने पुढील एक वर्ष तरी यावर कोणतीही कारवाई करता येणार नसल्याचे सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कपिल पाटील यांनीदेखील यावेळी बोलताना परीचारक यांना पुन्हा बोलावल्यास घातक परंपरा सुरु होईल असे म्हटले. तसेच सभागृहाच्या प्रथा आणि परंपरेला छेद देणार्‍या विचारधारेचे लोक इथे बसलेले आहेत, अशी टीकादेखील त्यांनी केली. यानंतर सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी आक्रमक होत हा मुद्दा विचारधारेशी जोडू नये, असे सांगितले. प्रत्येक वेळी कोणतीही गोष्ट विचारधारेशी जोडून दिशाभूल करू नये, असे आक्रमक होत त्यांनी पाटील यांना सुनावले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

@@AUTHORINFO_V1@@