पूर्वांचल प्रदेशात महिलांना आदर आणि सन्मानाचे स्थान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
विवेकानंद केंद्राच्या आसाम प्रांत संघटक व खान्देशकन्या मीराताई कुलकर्णी यांचे अनुभव कथन
 
जळगाव
 
पूर्वांचल प्रदेश हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथील लोक अतिशय साधे-सरळ असून ते लोकांना आपलं मानणारे, स्वीकारणारे आहेत. ते कधीही महिला आणि पुरूष असा भेद करत नाहीत. या प्रदेशात सर्वत्र महिलांना प्रचंड सन्मानाचे स्थान आहे, अशा शब्दात विवेकानंद केंद्राच्या आसाम प्रांत संघटक मीराताई कुलकर्णी यांनी अनुभव कथन केले.
 
 
केशव स्मृती सेवासंस्था समूह आणि जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे आयोजित डॉ. आचार्य ‘अविनाशी पुरस्कार’ वितरण सोहळ्यानिमित्त मीराताई रविवारी जळगावात आल्या होत्या. कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या.
यावेळी केशव स्मृती सेवासंस्था समूहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, यवतमाळ येथील दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर, सीईओ गजानन परसोडकर, संचालक डॉ. मनोज पांडे, शैलेश देशकर, विश्‍वास श्रीपालकर उपस्थित होते.
 
 
भरतदादा अमळकर यांनी प्रास्ताविक मांडले. सूत्रसंचालन माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव स्वप्निल चौधरी यांनी केले.
मीराताई पुढे म्हणाल्या, महाविद्यालयीन जीवनापासून मी विवेकानंद केंद्राच्या कामाने प्रभावीत झाली होती. १९९७ पासून विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली.
 
 
आसाममधील गोलाघाट येथे पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून माझी नियुक्ती झाली. तेथील केंद्राच्या शाळेत मी शिक्षिका आणि अकांउंट्सचे काम केले. नंतर टप्प्याटप्प्याने मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. २००३ मध्ये चहाच्या मळ्यात काम करणार्‍या मजुरांच्या मुलांसाठी आनंदालय प्रकल्प सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
पारधी समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ
विकासापासून कोसो दूर असलेल्या पारधी समाजाच्या उन्नतीसाठी झटणार्‍या दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे १९९७ पासून नि:स्वार्थपणे काम सुरू आहे. गेल्या २० वर्षाच्या काळात मंडळाने पारधी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्या. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठीही मंडळाचे काम सुरू आहे. शेती विकास, कृषीपूरक उद्योग, शेती ओलिताखाली आणण्यासाठी जलभूमी विकास प्रकल्पही राबवले जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर यांनी अनुभव मांडताना सांगितले.
 
 
आपत्कालीन परिस्थितीत अनोळखी व्यक्तीची मदत
अनुभव सांगताना मीराताईंनी २००९ मध्ये घडलेला एक किस्सा सांगितला. त्यांना दिब्रूगडहून एका शाळेत जायचे होते. ती शाळा ब्रह्मपुत्रेच्या दुसर्‍या काठावरील गावात होती. त्यामुळे नावेतून दीड ते दोन तास प्रवास; नंतर बसने पुन्हा दोन ते अडीच तासांचा प्रवास करून तेथे पोहचावे लागत असे. त्या नावेतून दुसर्‍या काठावर पोहचल्या. तेव्हा त्यांना कळाले की काहीतरी अनुचित प्रकार घडल्याने तेथे कडकडीत बंद आहे. त्यामुळे वाहनेही बंद होती. अशा परिस्थिती परत जाणेही शक्य नव्हते. त्यावेळी एका अनोळखी वाहन चालकाने त्यांना मदत केली. रात्रभर त्या त्यांच्याकडेच थांबल्या. दुसर्‍या दिवशी परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या. तेव्हा त्या अनोळखी कुटुंबीयांनी भेटवस्तू देऊन त्यांना निरोप दिला, अशी आठवण मीराताईंनी सांगितली.
@@AUTHORINFO_V1@@