विवेकानंदांचे विचार अंगीकारून समाजहितासाठी पुढे या !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |

डॉ. आचार्य ‘अविनाशी पुरस्कार’ वितरण सोहळ्यात मीराताई कुलकर्णी यांचे आवाहन 

  
 
जळगाव, ४ मार्च
विवेकानंद केंद्राच्या कामाने प्रभावीत होऊन मी केंद्राला समर्पित झाली. केंद्राच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन माझी पुरस्कारासाठी निवड झाली. हा माझा सन्मान नाही तर विवेकानंद केंद्रामुळे निर्माण झालेल्या त्याग भावनेचा खर्‍या अर्थाने सन्मान आहे. विवेकानंदांचे विचार अंगीकारून देश आणि समाजहितासाठी सर्वांनी पुढे या, असे आवाहन विवेकानंद केंद्राच्या आसाम प्रांत संघटक मीराताई कुलकर्णी यांनी केले.
 
 
केशव स्मृती सेवासंस्था समूह आणि जळगाव जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.अविनाश आचार्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा डॉ. आचार्य ‘अविनाशी पुरस्कार’ वितरण सोहळा रविवारी हर्षोल्हासात पार पडला. या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. केशवस्मृती सेवासंस्था समूहाच्या पाठीवर दातृत्त्वाचा हात ठेवणारे वासुदेव महाजन व किरण महाजन, डॉ. प्रताप जाधव, पु.ना. गाडगीळ, डॉ. सुशील गुजर, डॉ. सुषमा पाटील व अरूण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच निवड समितीचे सदस्य सीए प्रकाश पाठक, माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील व सांगली येथील सहकार भारतीचे सतीश मराठे यांचेही आभार मानण्यात आले. त्यानंतर पुरस्कारार्थी दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर व सहकार्‍यांना संस्थात्मक स्तरावरील पुरस्कार (स्वरूप १ लाख १ हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह) पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते तर मीराताई कुलकर्णी यांना व्यक्तिगत स्तरावरील पुरस्कार (स्वरूप ५१ हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह) केशव स्मृती सेवासंस्था समूहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्रांचे वाचन प्रा. पूनम मानुधने यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी मीराताईंचे आई-वडील रघुनाथ कुलकर्णी व आशा कुलकर्णी यांचाही अनिल राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
 
मीराताई पुढे म्हणाल्या की, विवेकानंद केंद्राकडून संवेदनशील, शिस्त असलेले आणि संघटीतपणे काम करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे. समाजाला तोडण्याचे प्रयत्न पूर्वांचल प्रदेशातही सुरू आहे. त्यामुळे विवेकानंद केंद्राच्या अधिपत्याखाली विवेकानंद सेंटर फॉर कल्चरल डेव्हलपमेंट हे विशेष केंद्र चालवले जाते. त्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम चालते. त्यातून आपोआपच कार्यकर्त्यांची फळी तयार होत आहे, असेही मीराताईंनी सांगितले. आपल्या मनोगतात त्यांनी विवेकानंद केंद्राचे काम, आनंदालय संकल्पना, पूर्वांचल प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. गेल्या २१ वर्षांच्या प्रवासात आलेले चांगले-वाई अनुभवदेखील त्यांनी उपस्थितांना सांगितले.
 
पारधी समाज सुधारण्याचे शिवधनुष्य पेलले : प्रदीप वडनेरकर
पारधी समाज हा उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेला समाज आहे. काही रुढी-परंपरा आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडल्याने हा समाज विकासापासून दूर राहिला. हा समाज सुधारण्याचे शिवधनुष्य आम्ही संघाच्या प्रचारक मंडळींना सोबत घेऊन पेलले. कोणताही समाज सुधारायचा असेल तर नेतृत्त्व लागते आणि नेतृत्त्व तयार होण्यासाठी शिक्षणाची गरज भासते. त्यामुळे पारधी समाजातून नेतृत्त्व तयार होण्यासाठी या समाजातील मुलांना शिक्षण देण्याची गरज आम्ही ओळखली. त्यातून छात्रवासाची संकल्पना पुढे आली. छात्रवासातून समाजपरिवर्तन हा खूप कठीण प्रवास होता. परंतु, आज २० वर्षांनंतर आम्ही गुन्हेगार म्हणवल्या जाणार्‍या पारधी समाजात चांगले माणूस तयार केले. आज अनेक चांगल्या पदांवर या समाजातील मुले काम करत आहेत, याचा मनस्वी आनंद असल्याचे दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. मंडळातर्फे पारधी समाजासाठी चालवले जाणारे केशव आरोग्य रक्षक योजना, दीपावली महोत्सव, संस्कार केंद्र, सेल्फ एप्लॉयमेंट अशा उपक्रमांचीही त्यांनी माहिती दिली. तसेच मंडळाने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसाठी केलेले कार्य, सुरू असलेले उपक्रम यासोबतच शेती विकास, जलभूमी विकास प्रकल्पांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
 
 
कार्यक्रमात पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनीही मनोगत व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला श्रोत्यांनी अलोट गर्दी केली होती. त्यामुळे बालगंधर्व खुले नाट्यगृह तुडूंब भरले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@